आज सुमेधाबाई फार आनंदात होत्या. आज त्यांच्या मुलाला—सुजॉयला—प्रमोशन मिळालं होतं. स्वतः आजारी असतानाही त्या स्वयंपाकघरात जाऊन त्याच्या आवडीचं जेवण आणि खास त्याच्यासाठी शीरा बनवत होत्या. कारण सुजॉयला आईच्या हातचा शीरा फार आवडायचा. लहानपणी जेव्हा तो खूप आनंदी असायचा, तेव्हा तो आईकडून हमखास शीरा करून घ्यायचा.
शीरा बनवून त्या भांड्यात काढून ठेवतच होत्या, तेवढ्यात बाहेर कारच्या हॉर्नचा आवाज आला. सुमेधाबाईंनी पटकन दरवाजा उघडला. समोर सुजॉयची पत्नी भव्या, तिची आई मधुबाई आणि लहान बहीण सुनीती उभ्या होत्या. सगळ्यांना एकत्र पाहून सुमेधाबाईंना आश्चर्य वाटलं, पण त्या काहीच बोलल्या नाहीत.
तेवढ्यात सुजॉयही कार पार्क करून आला आणि येताच आईच्या गळ्यात पडला. सुमेधाबाईंनी त्याचं मनापासून अभिनंदन केलं आणि सगळ्यांना घरात घेतलं. सर्वांना हॉलमध्ये बसवून त्या पटकन स्वयंपाकघरात गेल्या आणि घरकाम करणाऱ्या कमलाला सगळ्यांना पाणी देण्यास सांगितलं.
पाणी दिल्यानंतर सुमेधाबाईंनी स्वतःच्या हातचा गरमागरम शीरा एका वाटीत घालून सुजॉयसाठी आणला. चमच्याने शीरा घेऊन त्याच्या तोंडाकडे नेत त्या म्हणाल्या —“बाळा, आज खूप आनंदाचा दिवस आहे. तुझं स्वप्न आज पूर्ण झालं. यासाठी तू खूप मेहनत घेतलीस. म्हणून आज तुझ्या आवडीचं जेवण आणि खास तुझ्यासाठी हा शीरा केला आहे. चल, तोंड गोड कर.”
सुजॉय काही बोलणार किंवा शीरा खाणार, भव्या मध्येच म्हणाली, “अहो सासूबाई , हे काय करताय? सुजॉय हे खाणार नाही. आणि स्वयंपाक करण्याआधी विचारयचा तरी .आम्ही सगळे बाहेर पार्टी करून आलो आहोत. सुजॉयने आधीच जेवण केलं आहे.”
हे ऐकून सुमेधाबाईंचा हात तसाच थांबला. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने सुजॉयकडे पाहिलं. तेव्हा सुजॉय म्हणाला— “हो आई , प्रमोशनच्या आनंदात भव्या आणि सुनीती पार्टी मागत होत्या, म्हणून बाहेरच जेवायचं ठरवलं.”
हे ऐकून सुमेधाबाई वाटी घेऊन परत स्वयंपाकघराकडे जाऊ लागल्या, तेवढ्यात सुजॉयने त्यांना थांबवलं. “आई , शीरा कुठे नेतेस? माझ्या पोटात एवढी तरी जागा आहे की मी तुझ्या हातचा शीरा खाऊ शकतो. तुझ्या हातचं गोड तोंडात पडलं नाही, तर मला वाटणारच नाही की मी काहीतरी मिळवलं आहे.”
असं म्हणत त्याने आईच्या हातातून वाटी घेतली आणि दोन-तीन चमचे शीरा पटकन खाल्ला. हे पाहून सुमेधाबाईंचं मन तृप्त झालं; पण भव्या मात्र चिडली. त्या वेळी ती काही बोलली नाही, पण रात्री खोलीत गेल्यावर ती सुजॉयशी भांडायला लागली.
“येता-येता सुनीतीने तुम्हाला गोलगप्पे खायला सांगितलं, तेव्हा तुम्ही म्हणालात पोटात जागा नाही. मग इथे आईच्या हातचा शीरा खायला जागा कुठून आली? माझ्या कुटुंबाची हीच का कदर?”
हे ऐकून सुजॉयलाही राग आला. “मी तुझ्या कुटुंबासोबतच पार्टीला गेलो होतो, माझी आई घरी एकटी होती. तेव्हा तुला त्याचं काही वाटलं नाही. आईनी आजारी असतानाही माझ्यासाठी शीरा बनवला , हे तुला दिसत नाही का? फक्त दोन-तीन चमचे खाल्ले, तर त्यात काय चूक आहे? आई आनंदी झाली ना!”
“वा! तुमच्या आईची काळजी आहे, पण माझ्या बहिणीच्या भावना काहीच नाहीत? तुमच्या आईने एवढं तरी समजून घ्यायला हवं की एकुलताएक मुलगा-सून आहेत. त्यांच्या आनंदातच आनंद मानावा. पण नाही, मध्येच अडथळा आणायचाच.”
हे सगळं बोलणं बाहेर सुमेधाबाईंना ऐकू येत होतं. त्यांचं मन फार दुखावलं. त्या कधीच मुलगा-सुनेच्या आयुष्यात हस्तक्षेप करत नव्हते. पण तरीही काही लोक समजून घ्यायलाच तयार नसतात. एवढं प्रेम दिलं तरी भव्याला कायम तक्रारच असायची. भव्याची तिचीच बाजू घ्यायच्या, कधी मुलीला समजावत नव्हत्या.
एखादी गोष्ट झाली की भव्या नेहमी म्हणायची—“एकुलताएक मुलगा-सून आहेत, आईने थोडा विचार करायला हवा. आमच्या आनंदाचा विचार करायला हवा.” पण नाही, त्यांना स्वतःशिवाय कुणाचीच काळजी नाही, असं ती म्हणायची.
मागच्या महिन्यात भव्यानी घरी किटी पार्टी ठेवली होती. तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलावलं होतं. पण त्या दिवशी कमलाला घरचं महत्त्वाचं काम निघालं आणि ती आली नाही.तिला बाकीचे कामं, घर सजवणं,स्वतःचा आवरून घ्यायचं होतं.मग भव्यानी सुमेधाबाईंना सगळं नाष्टा करायला सांगितलं. एवढ्या लोकांसाठी नाष्टा करणं त्यांना शक्य नव्हतं, म्हणून त्या म्हणाल्या, “भव्या नाष्टा बाहेरून मागव. उगाच स्वतःला त्रास कशाला?”
ते ऐकून भव्या म्हणाली —“सासूबाई, मी तुमची एकुलतीएक सून आहे. माझ्या आनंदासाठी एवढंसुद्धा करू शकत नाही का? माझ्या मैत्रिणींना बाहेरचं कसं चालेल?”
सुमेधाबाई शांतपणे म्हणाल्या—“इतक्या लोकांचं स्वयंपाक माझ्याकडून होणार नाही. बाहेर किटी कर किंवा महाराज बोलाव.”
तरी भव्या रुसली आणि तीन दिवस त्यांच्याशी बोलली नाही.
काही दिवसांनी भव्या तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाणार होती. त्या दिवशी सुमेधाबाईंची तब्येत बरी नव्हती. संध्याकाळी सुजॉय घरी आल्यावर तो म्हणाला—“आईची तब्येत ठीक नाही, आपण कसं जायचं?”
तेव्हा भव्या मुद्दाम म्हणाली— “थोडीशी तब्येत खराब आहे. कमला आहे ना घरी. मुला-सुनेच्या आनंदात आई अडथळा कशाला आणतील?”
शेवटी सुमेधाबाईंनीच त्यांना जाण्यास सांगितलं. पण अर्ध्या तासातच कमलाचा फोन आला—सुमेधाबाईंची तब्येत खूपच बिघडली होती. सुजॉय तात्काळ घरी आला, त्यांना रुग्णालयात नेलं. बीपी कमी झालं होतं. उपचारांनंतर त्यांना घरी आणलं.
पण भव्या मनात राग धरूनच होती. दुसऱ्या दिवशी सुजॉय ऑफिसला गेल्यावर ती थेट सुमेधाबाईंच्या खोलीत जाऊन ओरडली— “तुम्हाला लाज वाटत नाही का? आमच्या आनंदात अडथळा आणता. दोन तासांत तब्येत कशी काय बरी झाली?”
सुमेधाबाई शांतपणे म्हणाल्या— “भव्या, मला खरंच बरं नव्हतं.”
पण भव्या चिडली. “थोडं थांबता आलं नसतं का? माझ्या नवऱ्याला सतत फोन लावता.”
तेवढ्यात सुमेधाबाई ठामपणे म्हणाल्या— “बस भव्या, जर तो माझा एकुलताएक मुलगा आहे, तर हे लक्षात ठेव—मीसुद्धा त्याची एकुलती एक आई आहे.”
तेवढ्यात सुजॉय, त्याची सासू आणि सुनीती तिथे उभ्या होत्या. भव्यानी रडत सुजॉय सांगितलं—“आज ठरव, या घरात ह्या राहतील की मी.”
तेव्हा सुजॉय ठामपणे म्हणाला— “ठीक आहे. मग तूही तुझ्या आईला भेटणार नाहीस आणि मीही माझ्या आईला भेटणार नाही. नाहीतर आई इथेच राहील, आणि तू माझ्यासोबत राहायचं ठरवलंस तर वेगळं घर घेऊ भाड्यानी. पण माझ्या पगारातून आईला खर्च मी देणारच.
किंवा तू नीट राहायला सुरुवात कर.”
किंवा तू नीट राहायला सुरुवात कर.”
हे ऐकून भव्या आणि तिची आई गप्प झाल्या. आरामाची सवय लागलेली माणसं असं आयुष्यं स्वीकारू शकत नाहीत. काही वेळातच भव्यानी डोळ्यातले अश्रू पुसले आणि चहा-नाश्त्याची तयारी करायला गेली.
तो दिवस आणि आजचा दिवस—त्यानंतर भव्याने कधीच सुमेधाबाईंना त्रास दिला नाही.
"समजूतदारी असेल तरच नाती टिकतात."
समाप्त.
©®निकिता पाठक जोग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा