Login

अफेअर लग्नानंतरचे (भाग ८)

लग्नानंतर आपल्या जोडीदाराने अफेअर केले तर दुसऱ्याला त्याची काहीही चूक नसतांना शिक्षा भोगावी लागते.
"अगं त्याची चिंता नको करू तू बाळा... तसही मला कुणी नाही मला तुमची सोबत होईल, ये तू बरं का."

"मावशी संध्याकाळी आम्ही निघतो, कारण मी राहायच्या हिशोबाने नव्हते आले. ऑफिसमध्ये  जावून कधी जॉईन करायचे तसे ठरवते."


"मी तेच म्हणते बाळा..तू आईला आणि बाळाला कुठे सोबत नेशील. तू जाऊन ये ऑफिसला."


'थँक्यू मावशी तुमची खूप मदत झाली."

"अगं मदत कसली आपण शेजारी आहोत एवढं तर आपण एकमेकांसाठी करूच शकतो, नाही का?"

फ्रेश होऊन नीलम तिच्या ऑफिस मधे गेली. तिथे तिने तिच्या सरांना सगळं सांगितलं. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं.

त्यावर सर म्हणाले,
"तुला जेव्हा जॉईन करायचे तेव्हा कर, काहीही प्रॉब्लेम नाही."

"सर मी साधारण पंधरा दिवसांनी जॉईन करते कारण आता मला पैश्यांची खूप गरज आहे. "

"काही हरकत नाही पण  मग तुझे बाळ?"

"आई आहे ना."


"बरं ठीक आहे."

मग नीलम घरी आली आणि संध्याकाळी तिच्या घरी निघून गेली.

"आई, अगं मला असे वाटते की त्याच्या गावच्या घरी जाऊन येऊ का?"

"नीलम, अगं मला तुझी तळमळ समजते. पण काही उपयोग होणार नाही असे मला वाटते."

"पण अगं माझे कपडे, कागदपत्र सगळं त्यांच्याकडे आहे, आता कसं मिळेल मला?"

"विसर आता सगळं... काय दुर्बुद्धी सुचली आणि बाई मी त्याच्याशी तुझे लग्न लावून दिले."

आणि आई रडायला लागली.


"आई... अगं त्यात तुझी काय चूक? मला तर माझीच चूक वाटत आहे."


निलमच्या मनात हजारो प्रश्न होते म्हणून ती गावी गेली मात्र तिकडचं सगळं विकून ती म्हातारी सासू सुद्धा गायब झाली होती.


आता मात्र एकही धागा त्यांच्या जवळ नव्हता पवनचा. ती निराश होऊन परत आली.


एवढी पुर्ण स्टोरी सांगून मग नीलम काहीच बोलली नाही.. काही वेळ निरव शांतता होती. तिच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं..

नीरज तिच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला,

"नीलम त्याच्या जवळच्या नातेवाईकांना नाही विचारपूस केली का तू?"

"विचारलं ना, पण कुणालाच काही माहीत नाही असे उत्तर मिळायचे आणि  मी पंधरा दिवस झाल्यावर मी पुण्यात आले."

"नीलम ....अगं किती सहन केलं. आता पूर्वी सात वर्षाची आहे ना."


"हो रे....तीच वय वाढलं पण मी त्याच ऑफिस मध्ये आहे आणि त्याच एक रूममधे त्याची वाट बघत बसली आहे. असेच दिवस निघून गेले आणि मग तू आला त्या ऑफिसमधे आणि माझा एक चांगला मित्र बनला."

"पण निलम तू त्याची पोलिस कंप्लेंट का नाहीस केली."

"अरे करून काय उपयोग त्याला नको होती मी, मी सोड रे पण या इवल्याश्या जीवाची काय चूक. तिला बाबा काय असतात याचा अर्थही माहीत नाही. माझी काही चूक असती तर मी माफी पण मागितली असती. पण काय चुकलं, तो असा वागला माझ्याशी हे तरी माहिती पाहिजे ना."

"हो ना...असे कसे निष्टुर असतात ना माणसं."


"काय माहीत रे... देवालाच माहीत काय झाले?आता मला विसर पडला होता. किती दिवस रडायचं ना मी ह्या गोष्टी वरून."

"पण एक अजून प्रश्न."


"विचार ना.."

"तू त्या दिवशी आत्महत्येचा का प्रयत्न केला?

"हे बघ आता  सात वर्ष झाले माझा नवरा माझ्या सोबत नाही. पूर्वीचं काही दुखलं खुपलं मी आणि आई होतो. ती झाल्यापासून तिला फक्त आम्ही दोघीच माहीत आहे.दुसरं कुणी म्हणजे कुणीच माहीत नाही. तीच नाव काय ठेवायचं त्यापासून तिला कोणत्या शाळेत घालायचं ते सगळं मी ठरवलं आणि त्या दिवशी मला कुठून तरी फोन आला की, बस झाले तुझे नाटक... मी तुला सोडणार नाही. तुझे जीवन जगणं मुश्कील करून टाकेल आणि मुलीला घेवून जाईल. तू नाही दिलेस तर कोर्टाची पायरी चढेल आणि खूप शिव्या दिल्या मला आणि म्हणाला मला जगायचा काहीही अधिकार नाही."


"कोण होता तो? "

"माहीत नाही पण कदाचित पवन असेल.पण त्या दिवशी मी खूप विचार केला. माझे काहीच डोकं चालेना.आता पूर्वी माझ्यापासून लांब जाईल मग माझ्या जगण्याचा काय उपयोग ह्या विचाराने मी ते पाऊल उचलला."

"तुला वाटते तू योग्य केले?"

"माहीत आहे ते चुकीचे होते..पण..."


"अगं पण तिचा एकमेव सहारा आहेस तू आणि तू पण अशी वागली तर काय करणार ती आणि आई."


"हो...नंतर कळलं मला, पण आईला ह्यातलं काही सांगू नको."

"नाही सांगत..सांगायचं असत तर आधीच सांगून मोकळा झालो असतो."


"अगं पण तो पवन आहे कशावरून? दुसरं कुणी फायदा घेवू शकतो.हा विचार कसा नाही आला तुझ्या मनात."


"असू शकतो. पण त्यात तू त्या दिवशी लग्नाचं विचारलं, तेव्हा तुझा पण खूप राग आला मला. मी त्या दिवशी बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. पण खर सांग शोभलं का तुला? अरे मग तुझ्यात आणि पवन मध्ये काय फरक झाला तू सांग ना....लग्नानंतर अफेअर कितपद योग्य आहे. अशा माणसांनी लग्नच करू नये असे मला वाटत. जीच्यासोबत तुम्ही लग्न करता त्या मुलीची काय चूक असते तू सांग ना."


नीलम जे बोलत आहे ते खरंच बरोबर आहे का? नीरज त्याची बाजू काय मांडतो वाचूया पुढच्या भागात.
क्रमशः
©® कल्पना सावळे