Login

अफेअर लग्नानंतरचे (भाग ९)

लग्नानंतर आपल्या जोडीदाराने अफेअर केले तर दुसऱ्याला त्याची काहीही चूक नसतांना शिक्षा भोगावी लागते.
"हे बघ लग्नानंतर अफेअर तर चुकीचेच आहे, ते  कुणीच मान्य करणार नाही पण अगं फक्त मुली त्याला बळी पडतात असं नाही गं."


" नीरज अरे तसेच आहे.. मुलं आईवडिलांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करतात आणि मग त्याच्या पसंतीच्या मुलीशी ते अफेअर चालू ठेवतात. पण मग त्याच्यात त्या बायकोची काय चूक? शेवटी कुणाला भोगावं लागतं तिलाच ना?"


"हे बघ  ते मुलीला भोगावं लागतं, मुलीला भोगावं लागतं बंद कर आता..." यावेळी निरजचा आवाज जरा वाढला.


"मग नाही तर काय तुम्हा पुरुषांना काही फरक नाही पडत रे. बाईला काय सोसावं लागत.."

"माझ्या मनाला विचार ना..कोणाला सोसावं लागत. तुला  माहीत आहे मला पंधरा वर्षाचा मुलगा आहे . लग्न होऊन सोळा वर्षे झाली. ह्या वर्षात काय काय भोगावं लागलं मला. अगं वर्षभर माझी बायको चांगली वागली असेल माझ्यासोबत. काय कमी आहे तूच सांग ना...घर आहे , नोकरी आहे ,मूलगा आहे पण नाही..
तिचे किती अफेअर आहेत बाहेर माहीत नाही
तुला. फक्त स्त्री नाही गं  पुरुष पण सोशिक असतो. फरक एवढाच तुम्ही बोलून दाखवता आम्हाला  बोलता येत नाही."

"काय!!!नीरज अरे मग तू तिच्याशी का बोलत नाही या विषयावर."


"काय बोलणार ती म्हणते,  माझे आयुष्य आहे मी कसही जगणार त्यावर बंदी घालणारा तू कोण?"

"मग आता हे कुठपर्यंत चालणार असं?"

"संपल सगळं"

"का?"


"संपलं सगळं ... आता येतांना मी सह्या केल्या डिव्होर्स पेपरवर."

"काय?"

"हो...अगं तुम्ही बायकाच नाही नात टिकविण्याचा प्रयत्न करत, आम्ही पुरुष पण करतो. आम्हाला सुद्धा तुमच्या सारख्या भावना आहे, मन आहे, आम्हाला पण दुःख होते."

"पण असं काय झाल नीरज?"

"ती  रात्री उशिरा यायची पार्टी करून. एरवी ठीक आहे गं पण परेश आजारी असतांना देखील तिला काही काळजी नसायची."

हे ऐकूण नीलमला  फार वाईट वाटलं, पण ती तरी काय करणार? तिच्याकडे शब्दच नव्हते बोलायला.

"चल जावू या का घरी? मुलं वाट बघत असतील."


दोघे उठले आणि घरी जायला निघाले.दोघांच्या मधला संवाद जणू आता हरवला होता. दोघे एकमेकांचा विचार करू लागले होते.


काही वेळात घर आले. इथे दोन्ही मुलांच्या मस्त्या चालू होत्या.आई टिव्ही बघत बसली होती.

" जेवण करून आलात की करायचे आहे? बराच वेळ लावला तुम्ही दोघांनी."

"हो आई...नाही..म्हणजे जेवण नाही केले. गप्पा गप्पांमध्ये कधी वेळ गेला काहीच कळलं नाही."


"तुम्ही जेवण करा, आम्ही निघतो..चल परेश."


आई आणि नीलम काही बोलणार या आधी परेश ओरडला..

"पप्पा थांबा ना..मला नाही यायच घरी. मला पूर्वी सोबत राहायचं आहे."


"परेश अरे आता लहान आहेस का तू?"

"नीरज... अरे, बस ना तू पण, खेळू दे मुलांना. मी जेवण बनवते." आई खुर्चीवरून उठत म्हणाली,

"आई अगं नको बनवू..आम्ही पिझ्झा मागवतो."


पिझ्झ्याचं नाव  ऐकल्याबरोबर दोघे मुलं खुश झाले..

मग पिज्जा मागवला आणि सगळ्यांनी खाल्ला..

आता संध्याकाळ झाली होती, नीरज आणि परेश घरी जायला निघाले.


"पूर्वी चलते का आमच्या घरी. मला नाही करमणार तुझ्याशिवाय."

लगेच पूर्वी पळत आली आणि त्याला मिठी मारली.


"दादा .... माझा दादा.."


इकडे आईने देखील दोघांकडे बघितलं.

कसे बसे पूर्विनी परेशला सोडलं आणि ते घरी गेले.


नीलम टिव्ही बघत सोफ्यावर पडली होती.आई तिच्या बाजूला बसली.


"नीलम... अगं ए नीलम एक विचारू का?"


"अगं विचारू का म्हणते?आता मी नाही म्हटलं तर विचारणा नाही  का तू."


"नाही विचारणार."


"नको विचारू मग."

नीलम सोफ्यावर बसली आणि आईचा हात हातात घेवून म्हणाली

"अगं विचारना ..तुझा हक्क आहे तो. तुला जे वाटते ते विचार ."

"मला ना नीरज एकदम चांगला मुलगा वाटला. परेश म्हटला आम्हला माझी आई सोडून गेली."

"आई  लहान मुलांना काय  विचारते?"

"अगं तसं नाही. मी म्हटलं त्याला आईला का नाही आणलं सोबत? तर तो बोलला ते."


"बरं मग आता?"


"आता काय..करून टाक त्याच्याशी लग्न."


"अगं आई आता माझा लग्नावर भरवसा नाही राहिला,  मी त्या लग्नाची शिक्षा अजूनही भोगते आहे. काय चूक होती तू सांग ना मला?"

"बाळा सगळे पुरुष सारखे नसतात. तसं  असतं तर आमचा संसार झाला नसता.तुझे बाबा मरेपर्यंत आपल्या जवळ होते.त्याचा किती जीव होता तुझ्यात आणि माझ्यात."

"मान्य आहे ..पण आई आजकाल खूप जमाना बदलला गं."

"तू मला एक सांग तू आहेस का तयार लग्नाला."

काय निर्णय घेईल नीलम?
वाचू या पुढच्या भागात.
क्रमशः