Login

अफेअर लग्नानंतरचे ( भाग १० अंतिम)

लग्नानंतर आपल्या जोडीदाराने अफेअर केले तर दुसऱ्याला त्याची काहीही चूक नसतांना शिक्षा भोगावी लागते.
"आई उगाच डोक्याला ताप देवू नकोस प्लिज." असे बोलून नीलम  उठून गेली.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे काम सुरू झाले. नीरज आणि नीलमच्या वागण्यात काहीही बदल झालेला नव्हता. मात्र आईच्या डोक्यातून तो विचार काही निघत नव्हता.


एक दिवस आईने नीरजचा मोबाईल नंबर नीलमच्या मोबाईल मधून घेतला आणि त्याला कॉल केला.


बेल गेली, नीरजने फोन उचलला,
"हॅलो....कोण बोलतंय?"


"मी, नीलमची आई."

"ओहह! बोला ...काही अडचण आहे का?"

"नाही नाही ...पण मला भेटायचं आहे तुला."


"काही विशेष?"

"हो...तुला आता वेळ असेल तर येतो का घरी?"

"आता तर ऑफिस मध्ये आहे. ऑफिस सुटलं की येतो नीलम सोबत."

"नाही नको..ती नसतांना ये..."

तो हसला आणि म्हणाला,
"बरं येतो आता."

तो घरी निघून गेला, दरवाजावरची  बेल वाजली. आई धावतच गेली, दरवाजा उघडला,

"ये ना आत."
नीरज आत गेला,खुर्चीवर बसला.

"पाणी देवू."

"नाही नको...सांगा ना काय अर्जंट काम आहे."

"अरे काही नाही मला वाटते की तू नीलम सोबत लग्न करावं."

"काय?"

"हो..तू तिला चांगला ओळखतो, समजून घेतो आणि मी बघितलं ती खुश असते तुझ्यासोबत."


"आई खरच सांगू का? मला पण ती खूप आवडते पण मी काही बोलायला गेलो तर मी एक चांगली मैत्रीण गमावेल अशी भीती आहे मला म्हणून मी शांत बसलोय."


"काही नाही तू बोल तिच्याशी हवं तर घरी येवून बोल मी सपोर्ट करते तुला."

काही वेळ ते दोघे बोलले त्यानंतर तो परत ऑफिस मध्ये निघून गेला.

त्या दिवशी संध्याकाळी नीरजने मुलाला विचारलं,

" परेश अरे आपण आता दोघं आहोत घरात अजून कुणी म्हणजे कुणी तिसरं आलं तर चालले तुला."


" हो पप्पा चालेल ना...का नाही चालणार? नीलम अँटी येणार आहे का?"

" काय?"

" मला कळत पप्पा सगळं, अहो लहान नाही मी आता. पूर्वी खूप मस्त आहे,मलाही बहीण भेटेल."


आता फक्त नीलम काय बोलणार ह्यामुळे नीरज चिंतेत होता. त्याच दिवशी तो नीलमच्या घरी गेला.


दारावरची बेल वाजली , नीलमने दरवाजा उघडला.


" नीरज तू ,....आता...ह्यावेळी. काही अर्जंट काम आहे का?"


" आधी आत येवू."

नीलमने डोक्याला हात मारला आणि म्हणाली,

" अरे ...ये ना..आत."

तो घरात गेला आणि गेल्याबरोबर तिचा हात पकडला आणि म्हणाला,

" नीलम आय लव यू, आय लाईक यू अँड आय वॉन्ट टू मॅरी यू. प्लिज नाही म्हणू नको."

तेवढ्यात पूर्वी आली आणि नीरजच्या जवळ गेली. नीरज ने तिला उचलला. लगेचच आई पण बाहेर आली,

" नीलम अगं स्वार्थी नको होऊस, जरा बघ लेकिकडे. काय उत्तर देणार आहेस ती मोठी झाल्यावर कुठे आहेत बाबा म्हणून. अगं तिला का शिक्षा देतेस."


"आई बस..."
नीलम खूप जोरात ओरडली.

पूर्वी थोडी घाबरली आणि म्हणाली,

"आई तू तर म्हणते नेहेमी मोठ्यांच ऐकायचे आणि तू कुठे ऐकते आजीचे."


"दोन दिवस वेळ द्या फक्त मला." एवढं बोलून ती निघून गेली.

नीरज पण निघून गेला.


नीलमच्या सारखं तेच ते डोक्यात येत होते की काय करावे? आता लग्न करावे का? आणि केले तर खरच आपण सुखी राहू?


दोन दिवस झाले हॉलमध्ये विचारात मग असलेल्या नीलमला बघून आई  तिच्या जवळ गेली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,

" बाळा अगं एवढा विचार नको करू, हे बघ जे काही नशिबात लिहल आहे ते थोडीच बदलणार. पण लग्न केलं नाही तर मग पश्चाताप होण्यापेक्षा करून बघ ना. सगळे पुरुष काही सारखे नसतात."

" आणि पवन आला तर ?"

आई हसली आणि म्हणाली,

" अगं जो सात- आठ वर्ष झाले आला नाही अजूनही तो येईल असं वाटत तुला."

" बरं ठीक आहे, मी तयार आहे लग्नाला."

तेवढ्यात दारावरची बेल वाजली, दार उघडले तर बाहेर पवन होता. तो घरात आला आणि पेढ्याचा बॉक्स उघडला आणि आईच्या हातावर ठेवला.आई म्हणाली,

" काय झालं? कसले पेढे हे?"

" सासूबाई होणार ना तुम्ही माझ्या."

नीलामच्या चेहऱ्यावर स्माईल आणि ती लाजली.

काही दिवसात दोघांचे लग्न झाले. दोघांचा सुखी संसार सुरू झाला. नीरजच्या बायकोने दुसरे लग्न केले नाही आणि नीलमच्या नवऱ्याचा अजूनही काहीच पत्ता लागला नव्हता आणि त्याचा परत कधी फोनही आला नाही.

खरच  लग्नानंतरचे अफेअर आजच्या जमान्यात प्रमाण वाढले आहे. सर्वांना स्वातंत्र्य हवे आहे पण स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळेच नसले तरी काहीजण त्याचा गैरफायदा घे आहेत. एकमेकांच्या भावना कुणी समजून घेण्याची तसदी आता घेत नाही त्याच बरोबर कुणी कुणाच्या मनाचा विचारच करत नाही, माणूस खूप स्वार्थी होत चालला आहे कदाचित यामुळे डिव्होर्सचे प्रमाण भयंकर वाढले आहे.आपल्याला आपल्या जोडीदाराने  समजून घेतले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते पण जेव्हा समजून घेण्याची वेळ आपल्यावर येते तेव्हा आपण घेतो का समजून? हे नक्की आपल्या मनाला विचारा.