Login

अफेअर लग्नानंतरचे ( भाग १)

लग्नानंतर आपल्या जोडीदाराने अफेअर केले तर दुसऱ्याला त्याची काहीही चूक नसतांना शिक्षा भोगावी लागते.
दहा वाजले तरीही नीलम तिच्या रूमच्या बाहेर आलेली नव्हती. तिला ऑफिसमधल्या एकानेही बघितलं नव्हत. सर्वाचा चहा झाला, ब्रेकफास्ट झाला तरीही आज नीलम कशी बाहेर आली नाही म्हणून नीरज हा तिच्या ऑफिसमधला तिचा कलिग याने दरवाजा वाजवला. पण दरवाजा तीने उघडला नाही. ती दरवाजा उघडत नाही म्हणून पिकनिकला आलेला ऑफिस मधला प्रत्येक जण तिथे धावत आला आणि एकमेकांच्या मदतीने दरवाजा अक्षरशः तोडला.


दरवाजा तुटता बरोबर नीरज आत धाडकन पडला. काही जण आत आले आणि त्याला उचललं आणि सगळ्यांची नजर नीलम वर पडली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. क्षणाचा विलंब न करता तिला उचलून गाडीत टाकले आणि रस्त्याने पहिले जे हॉस्पिटल होते त्या हॉस्पिटल मध्ये तिला नेले.


"डॉक्टर साहेब प्लिज नीलमला वाचवा...नीलम ला वाचवा..." नीरज घाबरून बोलला.

"अहो पण काय झाले? तुमची कोण आहे ती? हे तर आत्महत्येचे प्रकरण वाटते आहे.पोलिस कंप्लेंट करावी लागेल." डॉक्टर बोलले.

"हो तुम्ही करा कंप्लेंट पण ट्रीटमेंट सुरू करा प्लिज."


"हे बघा तुम्ही सांगू नका आम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही. सिस्टर चला पेशंट आत घ्या."


डॉक्टरांनी नीलमला आत नेले आणि इकडे रिसेप्शन वर असलेल्या मॅडमनी पोलिस कंप्लेंट केली. नीलम बाहेर येत नाही तो पर्यंत पोलिस माहितीसाठी आले.

पोलिसांनी जे तिथे नीलमच्या सोबत होते त्यांची चौकशी सुरू केली. विचारपूस करणार तोच आतून सिस्टर बाहेर आल्या..


" नीलमला रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांचा रक्तगट  'ए पॉझिटीव' आहे आणि आमच्याकडे त्या गटाचे रक्त उपलब्ध नाही. तुम्ही कुणी इच्छुक असाल तर पुढे या प्लिज."

नीरज लगेच म्हणाला,

" सिस्टर माझे आहे."

सिस्टरने त्याला आत नेले. तेवढ्यात बाकीचे जे त्यांच्या सोबत आले होते त्यापैकी एक जण म्हणाला,

" हे बरं आहे राव ज्याच्यामुळे हे कृत्य झाले तोच मदतीसाठी पुढे आला."

पोलिसांनी ते ऐकले , मग त्यांनी जो हे बोलला त्याला ताब्यात घेतले.


" काय बोललास ते जरा सविस्तर सांग. तू चल आमच्यासोबत पोलिस स्टेशनला"

" साहेब...अहो साहेब काही विशेष नाही मी तर असाच टाईमपास करत होतो."

" ती बाई तिकडे मरणाच्या दारात उभी आहे आणि तुला टाईम पास सुचतोय."

पोलिसांनी  त्याची कॉलर पकडली.

केशव आता मात्र घाबरला होता.

" काही नाही साहेब...मी असाच बोललो."

"चला घ्या रे ह्याला सोबत...विचारपूस करू पोलिस स्टेशन मध्ये."


तिकडे नीरजने रक्त दिले. नीरज बाहेर येवून बसला.

त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. केशव त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, " यार पोलिसांना सांग ना प्लिज ते मला पोलिस स्टेशन मध्ये घेऊन जाणार आहेत."


" हे बघ तू शांत हो काहीही होणार नाही तुला. तू जा.. नीलम शुद्धीवर आली की बघतो मी."

केशव पोलिस स्टेशनला गेला.


साधारण दोन चार तास उलटून गेले.बरोबर संध्याकाळचे पाच वाजले होते, डॉक्टर बाहेर आले.


" डोन्ट वरी...शी विल बी फाईन. तुम्ही भेटू शकता."

निरजने सुटकेचा श्वास टाकला.

इकडे पोलिस स्टेशन मध्ये केशवला विचारपूस सुरू झाली होती. केशवने माहिती सांगितली की,


" नीरजचे अफेअर आहे नीलम बरोबर...म्हणजे त्याचे प्रेम आहे तिच्यावर तिला एक मुलगी आहे. तिचे प्रेम नाही नीरजवर. म्हणजे... असेलही कदाचित."

"हे काय बोलतो.....कधी आहे, कधी नाही. माहीत नव्हत काही तर कशाला उगाच वेळ फुकट घालवला आमचा,चल जा ...निघ इथून."


हॉस्पिटलमध्ये नीरज नीलम जवळ गेला. त्याला बघितल्यावर नीलमने नजर दुसरीकडे फिरवली.

"नीलम, अगं चुकलो मी.... प्लिज मला समजून घे."

नीलमने त्याच्याकडे पाठ फिरवली.

"नीलम, अगं माझे काहीतरी ऐकूण घे..मी तसा नाही आहे जशी तू समजते. अशी टोकाची भूमिका घ्यायच्या आधी थोडा तरी विचार करायला हवा होता. स्वतःचा नाही पण मुलीचा. ती फक्त सात वर्षाची आहे."

ती काहीच बोलली नाही.

आता मात्र नीरज उठला आणि निलमला हलवून जरा जोरात बोलला,

" ऐकते ना...अगं मी वेडा आहे का? तुझ्याशी बोलतो आहे मी."

"नीरज तू जा इथून प्लिज. मला काही बोलायचे नाही.."


"नीलम.. प्लिज.,अगं चुकलो मी.."
"नीरज प्लिज..."

तेवढ्यात सिस्टर तिथे आल्या आणि म्हणाल्या,

"सर तुम्ही जा..त्यांना आराम करू द्या."

" हो..हो...."

म्हणत नीरज तिथून उठला.


"मॅडम बरं वाटत आहे ना आता?"

" हो ठीक आहे."

" मॅडम एक विचारू का?"


"हो विचाराना."

"सर कोण होते?....म्हणजे ते खूप घाबरले होते जेव्हा तुम्ही इथे ऍडमिट झाला तेव्हा."

"तो माझ्या सोबत ऑफिस मध्ये आहे ...बाकी  रिलेशन असे काही नाही."

"बरं."

काय झाले असेल त्या दोघांमध्ये ? नीलम का बोलत नव्हती नीरज बरोबर चला वाचूया पुढच्या भागात.