Login

अफेअर लग्नानंतरचे (भाग ४)

लग्नानंतर आपल्या जोडीदाराने अफेअर केले तर दुसऱ्याला त्याची काहीही चूक नसतांना शिक्षा भोगावी लागते.
पूर्वी आणि नीलम आधीच पोहचले होते. काही वेळात परेश आणि नीरज आले. परेशला खूप इच्छा होती की त्याची पण एक लहान बहीण असावी पण ती त्याची इच्छा कधीच पूर्ण नाही झाली. पण जेव्हा त्याने पूर्विला बघितले तेव्हा मात्र त्याला खूप आनंद झाला.तो कुणाशी न बोलता  पूर्विजवळ गेला.


" हाय...पूर्वी..."

पूर्वीने आईकडे बघितलं....


"अगं दादा आहे तो.." आणि नीलम हसली.

पूर्वी लगेच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली,

" दादा .... चल आपण तिकडे खेळू."

दोघांची मैत्री व्हायला क्षणही लागला नाही. दोघे खेळायला निघून गेले.


" नीलम आता सांग बरं काय तुझ्या आयुष्याची कहाणी."


"आधी सांग काय घेणार आहेस खायला?"


"नाही मुलांना येऊ दे मग खाऊ."

तेवढ्यात निलमची आई पण तिथे आली म्हणाली,

"अगं मला थोडं काम होत म्हणून आले होते मैत्रिणीला भेटायला पण तिचे येणं कॅन्सल झाले, मुलांना घेऊन जाऊ का घरी तशी मी एकटीच आहे, मला बोर होईल घरी."

"हो जा ना..आई माझी काहीही हरकत नाही."

आई मुलांना घेवून घरी गेली.

"बरं ऐक आता...माझे आठ वर्षापूर्वी लग्न झाले. मी तेव्हाच पहिल्यांदा पवनला भेटले होते. त्यावेळी त्याने मला पहिल्याच भेटीत पसंद केले. खरं तर मी गावाकडची आणि तो पुण्यातला म्हणून मला वाटत नव्हत की, तो मला पसंद करेल. पण म्हणतात ना...लग्नाची गाठ ही स्वर्गात बांधली जाते. अगदी तसेच झाले माझ्या आयुष्यात पण माझा ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही राहिला आता."


"नीलम,  अगं माझाही नाही."

"हो ना... ऐक पुढे."

आणि नीलम भूतकाळात शिरली,

लग्न होऊन नीलम सासरी आली. साधारण ती पंधरा दिवस सासरी राहिली आणि मग ती पुण्यात आली.

काही दिवसानंतर...

"पवन, अरे मला इथे येऊन एक महिना झाला मला असं वाटते मी नोकरी शोधायला पाहिजे."

"हो... अगं मला ही तसचं वाटत होत पण मला वाटलं तू म्हणशील अजून महिना पण नाही झाला लग्नाला."


"अरे तसं नाही रे...पण मी घरी बसून काय करू ना...आपला संसार सुरू झाला,आपल्याला फिरायला पण जायचं आहे. एकाच्या पगारावर कसं होणार ना."


"अगं मला तुझा पैसा नकोय...माझ्या जवळ आले की जावू आपण..."


"अरे तुझा पैसा  आणि माझा पैसा काही वेगळे आहेत का? माझा एक मित्र आहे त्याला सांगितलं आहे मी, उद्या सांगेल तो कुठे काम असेल तर."


"बरं बाई तुला जे वाटेल ते कर तू."


संध्याकाळी नीलमने मस्त जेवण बनवलं आणि जेवण करून दोघे झोपी गेले.


दुसऱ्या दिवशी पवन ऑफिसेला निघून गेला आणि मग थोड्या वेळाने निलमच्या मित्राचा कॉल आला की, तिला आजच इंटरव्ह्यूला बोलावलं आहे.


नीलमने लगेच तयारी केली आणि ती इंटरव्ह्यूला  गेली. तिथे तिचा इंटरव्ह्यू एकदम मस्त गेला आणि तिला नोकरी मिळाली ते ही  पवनच्या पगाराच्या पेक्षा जास्त पगाराची.


संध्याकाळी नीलमने जेवण बनवलं नाही तिने ठरवलं  की नवऱ्याला मस्त पार्टी द्यायची.


पवन  संध्याकाळी घरी आला. आज तो खूप थकलेला दिसत होता.


"नीलम अगं चहा ठेव बरं...खूप थकलो गं आज मी."


"का? आज खूप काम होत का?"

"हो ना...अगं ती ....काही नाही सोड."

"का काय झालं?"

"चहा दे  पटकन किती प्रश्न विचारते."
आज पहिल्यांदा पवन नीलमवर चिडून बोलला.

पण नीलमला ह्या गोष्टीचे काही वाईट वाटले नाही कारण ऑफिस मध्ये काय तान असतो हे तिलाही माहीत होते.ती काहीच बोलली नाही , ती सरळ  किचनमध्ये गेली आणि चहा केला.

तिने गरमागरम चहाचा कप त्याच्या हाती दिला. त्याने  एका दमात चहा पिला.


"अहाहा!!! काय मस्त केला गं चहा, एकदम फ्रेश केलं तू मला. चल आता सांग मला जेवायला काय केलं."


"आज काही नाही बनवलं मी."

"का उपवास आहे का आज?"


"नाही रे ...आज तुला पार्टी आहे माझ्याकडून."


"ऐ बाई अजून काहीच नाही केलं तू...गंमत नको करू तू ,अगं संध्याकाळचे सात वाजले. "


"अरे...ऐक तर."


"हे बघ त्या दिवशी आपण बाहेर जेवलो...मी एवढा श्रीमंत नवरा नाही गं...मला नाही झेपणार एवढा तुझा खर्च."


तिकडे पवन बोलत होता...पण जणू नीलम काहीच ऐकत नव्हती. तिच्या मनात एकच विचार चालू होता...

एवढ्या छोट्या गोष्टीवरून पवन किती बोलत होता. त्याने एका शब्दाने जरी म्हटलं असतं की नाही जायचे तरीही बस होते. तसही मीच खर्च करणार होते. त्याने काहीच विचारलं नाही की कशाबद्दल पार्टी ? काय झाले? काहीच नाही.

तेवढ्यात त्याने तिला हलवलं,

"अगं मी तुझ्याशी बोलतोय आणि तू  कुठे हरवली."

सांगेल का नीलम काय झाले, तिला काय वाटले ? जातील का ते पार्टी करायला?
वाचूया पुढच्या भागात
क्रमशः
©® कल्पना सावळे