अफेअर.. भाग २

तिचं अफेअर
अफेअर.. भाग २


"हे बरं आहे.. स्वतःची इच्छा असेल तेव्हा मी पळत पळत यायचं. आणि माझी इच्छा असेल तेव्हा तू घरी पळून जायचं." आकाश समितावर चिडला होता.

"काल खूपच उशीर झाला होता. समजून घे ना." समिता त्याची माफी मागत म्हणाली.

"आणि आज?? आजचं काय?" आकाश घड्याळ बघत म्हणाला.

"मला उशीर झाला तरी त्या दोघांना काय फरक पडतो? त्या दोघांच्या जगात तशी ही मी उपरीच आहे." समिता दुःखीपणे म्हणाली. तिचं बोलणं ऐकून आकाश तिच्याजवळ गेला.

"तुला एवढं एकटं वाटतं तर, दे सोडून त्यांना. तशी ही तू कमावतेस. तुला गरज काय या बंधनाची?" समिताचे डोळे पुसत आकाशने विचारले.

"मी त्यांना सोडून आले तर.. तू येशील तुझ्या बायकोला सोडून माझ्याकडे?" समिताने विचारताच आकाश दोन पावलं पाठी गेला. ते बघून समिता हसली.

"बघितलंस.. तुझी तुझ्या बायकोला सोडायची इच्छा देखील नाही. आणि तू मला सांगतो आहेस, घर सोडायला."

"माझ्या आणि तुझ्या परिस्थितीत किती फरक आहे. माझे माझ्या बायकोशी संबंध आहेत.. तुझे ते ही नाहीत." समिताच्या बोलण्याने दुखावलेल्या आकाशने तिला सुनावले.

"ते संबंध नाहीत.. म्हणूनच तर तुझं इतकं ऐकते आहे. असं नाही वाटत तुला?" आपले कपडे ठिक करत समिताने विचारले.

"म्हणजे ?? तुला माझी गरज फक्त शारिरीक आहे?" आकाशने विचारले.

"नाही रे.. किती गैरसमज करुन घेशील? सध्या माझा जवळचा, हक्काचा माणूस तूच तर आहेस. तू नसतास तर कधीची कोलमडून गेले असते मी." आकाशच्या पाठीवर गाल घासत समिता म्हणाली. "कधी कधी ना मला स्वतःची लाज वाटते. म्हणजे रश्मी..."

"आता रश्मीचं काय??"

"हेच.. तिला जेव्हा आपल्याबद्दल समजेल तेव्हा तिला काय वाटेल? खूप अपराधी वाटतं मला."

"हो?? मग सोडून दे उद्यापासून भेटणं." खांदे उडवत आकाश म्हणाला.

"काय??"

"तुला अपराधी वाटतं आहे ना? मग नको भेटूस मला." आकाश अजूनही तसाच बोलत होता.

"तसं नाही रे.. कसं सांगू तुला? अडकले आहे मी सगळीकडून. जाऊ देत.. नको ना तो अप्रिय विषय परत. जायच्या आधी एकदा मिठीत घे ना.. परत किती दिवसांनी भेटू.. काय माहित?" समिता म्हणाली.

"म्हणूनच तर म्हणतो, एकटी रहा.. मग कधीही भेटता येईल." आकाश म्हणाला. यावर काहीच न बोलता ती फक्त त्याच्या मिठीत गेली.

"ही बातमी वाचलीस?" बसमध्ये शलाकाने समिताला विचारले.

"कोणती गं?" आपल्याच विचारात असलेल्या समिताच्या तोंडून निघून गेले.

"तिच गं.. बायकोचं बाहेर अफेअर होतं म्हणून नवर्‍याने तिला डिव्होर्स दिला." शलाका समिताकडे बघत होती.

"नवर्‍याने डिव्होर्स दिला चांगली गोष्ट आहे. पण तिचं अफेअर का होतं, ते समजलं का?" समिताने प्रश्न विचारताच शलाका गांगरली.

"तू पण काहीही बोलतेस? काही काही बायका असतातच अश्या. आता आपणच बघ ना.. नाही म्हटलं तरी पस्तिशी ओलांडली की. आता या वयात कशाला हवी ही अशी लफडी?" शलाका बोलत होती.

"लफडं.. कसा विचित्र शब्द आहे ना?"

"विचित्र कसला? खरं तेच सांगणारा शब्द आहे. तुला सांगते.. मला ना या बायकांची मानसिकताच समजत नाही. घरदार असतं, संसार असतो सुखाचा.. मुलंबाळं असतात. तरी यांना बाहेर शेण खायचं असतं. बरं ते करताना आपण कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त करत असतो, याचंही सुखदुःख त्यांना नसतं." शलाकाची गाडी नुसती धावत होती. समिता उठली, हे बघून शलाका थांबली.

"काय गं? तू का अशी अचानक निघालीस?"

"बोलताना तुझं भान सुटलं. पण माझं नाही. माझा स्टॉप आला. तुझा कधीचाच येऊन गेला." पर्स खांद्याला अडकवत समिता म्हणाली. ती जाताच शलाकाने नाक मुरडले..

"आली मोठी शहाणी.. एवढं बोलले तरी नाकावरची माशी ही हलली नाही."


आकाशच्या आणि समिताच्या नात्याला असेल का काही भविष्य? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all