अफेअर.. भाग ३

तिचं अफेअर
अफेअर.. भाग ३


"मालवून टाक दीप.. चेतवून अंग अंग.."

"समिता.. समिता.." प्रितेशचा आवाज ऐकून समिताने रेडिओ बंद केला.

"काय रे.. काय झालं?"

"काय गाणी लावली आहेस? अगं प्रतिक घरात आहे. त्याच्या मनावर काय परिणाम होईल?" प्रितेश चिडून म्हणाला.

"याला रोमँटिक गाणी म्हणतात." प्रितेशच्या शर्टची बटणं काढत समिता म्हणाली. प्रितेशने डोळे बंद करून घेतले.
"तू तर असा लाजतो आहेस जणू दुसर्‍या कोणाच्या तरी बायकोसोबत आहेस." त्याच्या ओठांवर हलकेच ओठ ठेवत समिता म्हणाली. प्रितेशने हाताची मूठ घट्ट केली.

"समिता, प्रतिक येईल आता.."

"मी त्याला आईकडे पाठवले आहे. रात्री आणायला जाऊ. मी तुला आज एकही संधी देणार नाहीये. दोन वर्षांचा झाला प्रतिक आता. अजून किती दूर राहू मी तुझ्यापासून?" प्रितेशला बिलगत समिता म्हणाली.

"समिता.. ऐक माझं.." प्रितेश तिला दूर करायचा प्रयत्न करू लागला.

"अजिबात नाही.. मी आता नाही राहू शकत. अजून किती कंट्रोल करायचे मी स्वतःला? माझ्यापण काही इच्छा आहेत ना? आणि स्वतःच्या नवर्‍याकडेच आले आहे ना?" समिताने मिठी घट्ट केली.

"समिता, मला हे सगळं जमणार नाही." प्रितेश न हलता म्हणाला.

"म्हणजे?"

"समिता.. मला तुझ्याजवळ यायला जमणार नाही."

"भलत्या वेळी भलती मस्करी करु नकोस." समिता गंभीरपणे म्हणाली.

"मी मस्करी करत नाहीये." प्रितेशचे बोलणे ऐकून समिताला गांभीर्य जाणवले. तिचा सगळा उन्माद विरून गेला.

"तुझं बाहेर कुठे अफेअर आहे?"

"नाही.."

"मग??"

"मला संन्यास घ्यायचा आहे.. म्हणजे.. मला प्रतिक हवा आहे. पण हे संसारसुख.." प्रितेश बोलताच समिता खवळली.

"तू संन्यास घेणार.. आणि मी काय करू? मी कुठे जायचं? बोलताना काही विचार करशील की नाही?"

"मी गेले कितीतरी दिवस विचारच करतो आहे. मला नाही वाटत तुझ्याबद्दल काही. तुझ्याबद्दल असं नाही.. पण कोणाबद्दलही मला काहीच वाटत नाहीये."

"यात माझा काय दोष?? मी काय करायचे?" गेले काही दिवस चालणारी ही कुतरओढ समिताला सहन होत नव्हती. "आणि संन्यास म्हणजे? तू घर सोडून जाणार आहेस?"

"नाही.. तुला चालणार असेल तर आपण एकत्रच राहू. पण मला आता तुझ्याशी नवर्‍यासारखे संबंध ठेवता येणार नाहीत." स्वतःचा निर्णय सुनावत प्रितेश निघून गेला. समिता मात्र तिथेच रडत बसली. तिचं अख्खं जगच उलटेपालटे झाले होते. प्रतिकच्या जन्मापासूनच त्याचे बदलले वागणे तिला जाणवत होतेच. पण त्याचे एवढे विपरित परिणाम होतील असं तिला वाटलं नव्हतं. पुढे काय? हा एकच प्रश्न तिच्या डोक्यात पिंगा घालत होता. प्रतिकवर प्रितेशचे असलेले प्रेम तिला दिसत होतेच. पण तिचं काय? तिच्या शारीरिक, मानसिक गरजा आता कधीच पूर्ण होणार नव्हत्या का? विचार येताच तिला परत रडू फुटले. डोळ्यातले अश्रू गालावर जाणवताच समिताने डोळे पुसले. तिचा सर्व भूतकाळ तिला डोळ्यासमोर दिसत होता.

दिवस उलटत होते. प्रतिक मोठा होत होता. प्रितेशने स्वतःला प्रतिक आणि आपल्या नोकरीत गुंतवून घेतले होते. समिता जणू त्याच्या आयुष्यात नव्हतीच. समिताने एकदा दोनदा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण प्रितेश त्याच्या निर्णयावर ठाम होता. हे दुःख समिता कोणालाच सांगू शकत नव्हती. माहेरी भावाचे लग्न होणार होते. आणि तिच्याशी कसाही वागला तरी प्रितेश बाहेरच्या जगात अगदी चांगला वागत होता. त्यामुळे तिच्या बोलण्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. तिच्या या वैराण जगात आकाश जणू प्रेमाची बरसात करायला आला होता.


🎭 Series Post

View all