अफेअर.. अंतिम भाग

तिचं अफेअर
अफेअर.. भाग ४


शाळेच्या गेटटुगेदरमध्ये नव्याने झालेली भेट समिताचे आयुष्य परत बदलून गेली.

"समिता, ओळखलंस मला?" आकाश वेळात वेळ काढून तिच्याजवळ आला होता.

"तुला कशी विसरणार? तू तर फारच प्रसिद्ध होतास मुलींमध्ये." समिता हसत म्हणाली.

"प्रसिद्ध असून काय फायदा? जे हवं ते मात्र कधीच मिळालं नाही." समिताकडे बघत आकाश म्हणाला.

"काय हवं होतं?"

"समिता.. तू किती वेगळी दिसते आहेस आता? शाळेत त्या दोन वेण्यांमध्ये किती फनी दिसायचीस. आणि आता?? सुंदर.. त्याशिवाय दुसरा शब्द नाही." विषय बदलत आकाश म्हणाला.

"काहीही.. एवढीही छान नाही दिसत मी." समिता ओढणी नीट करत म्हणाली.

"ते म्हणतात ना.. लैलाला बघा.. मजनूच्या नजरेने. तसं स्वतःला माझ्या नजरेने बघ."

"तुझं लग्न नाही का झालं? आज फूल फ्लर्ट करतो आहेस ते." समिता म्हणाली.

"इतके दिवसांनी तुला बघून रहावलं नाही. म्हणून बोलून गेलो. तुला राग आला असेल तर सॉरी." आकाश जायला वळला.

"आकाश... राग नाही आला मला." समिताचे बोलणे त्यांच्या नवीन नात्याची सुरूवात होती जणू. प्रितेशने नाकारलेले सुख तिला आकाश भरभरुन देत होता. प्रितेशला ते समजलं होतं. पण तो जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत होता. या सगळ्यात प्रतिकचे मोठे होणे कोणाच्याच लक्षात आले नव्हते. आपल्या घरातली परिस्थिती ही इतर सामान्य घरासारखी नाही हे त्याला समजत होते. आईबद्दल चाललेली कुजबुज त्याला ऐकू यायची. वडिलांबद्दल जग जी सहानुभूती दाखवायचे त्यामुळे त्याच्या प्रेमाचा काटा त्यांच्याबाजूने झुकत होता. कळत नकळत तो समिताचा राग राग करायला लागला होता. ज्या गोष्टीसाठी समिता प्रितेशसोबत रहात होती, ते कारणच कुठेतरी डगमगू लागलं होतं. परत एकदा पुढे काय? हा प्रश्न तिच्या पुढे पडला होता.


"बाबा, बाबा.. लागला माझा रिझल्ट." प्रतिक आनंदाने ओरडत होता.

"बघू.." बाजूला बसलेल्या समिताने उत्साहाने विचारले.

"आधी बाबांना दाखवतो.." तिच्याकडे न बघता प्रतिक म्हणाला.

"प्रतिक, का रे वागतोस सतत असा? काय मिळतं माझं मन दुखावून तुला?" न राहवून समिताने विचारले.

"हे मला विचारतेस? कधी तरी स्वतःला विचार. कशी राहतेस? बाहेर काय काय बोलतात तुझ्याबद्दल.." प्रतिक तिरस्काराने म्हणाला. त्याचे ते शब्द समिताला ऐकवले गेले नाहीत.

"काय बोलतात माझ्याबद्दल?"

"बोलायला लावू नकोस.." प्रतिक आत जात म्हणाला.

"नाही.. आज मला याचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे." समिता म्हणाली.

"आता बोललंच पाहिजे का?" प्रितेश या दोघांचं बोलणं ऐकून मध्ये बोलला.

"हो.. कारण आज हे जे काही सुरू आहे ना.. याला तू जबाबदार आहेस." समिता रागाने म्हणाली.

"स्वतःच्या वागण्याचे खापर बाबांवर नको फोडूस.." प्रतिक परत बोलला.

"हो का?? खूप मोठा झालास ना? मग ऐक.. हा जो तुझा सज्जन बाबा आहे ना.. याच्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे. लग्न करून सुद्धा त्याला बायकोला सुख द्यायचं नव्हतं. मग काय करायला पाहिजे होतं मी? स्वतःच्या इच्छा आकांक्षा मनात ठेवून फक्त वरवर हसत रहायला हवं होतं? काय चुकलं सांग ना माझं? तुला आईवडिलांचं दोघांचं प्रेम मिळावं म्हणून लोकांची बोलणी खात, स्वतःचा मानसन्मान गुंडाळून ठेवून इथे रहात आले तरी मीच चुकीची? आणि तुला जर हे वाटत असेल तर मग मी इथे राहण्यात काहीच अर्थ नाही." समिता तिथून उठत म्हणाली.

"कुठे चाललीस तू आई?" प्रतिकने विचारले.

"तिथे.. जिथे कधीतरी कोणीतरी मला माणूस म्हणून समजून घेईल.. मी हे शहर सोडते आहे."

"समिता, आतताईपणाने निर्णय नको घेऊस. आजच प्रतिक दहावी पास झाला आहे. त्याचा दिवस खराब नको करूस." प्रितेश म्हणाला.

"जिचं अख्खं आयुष्य तू खराब केलं आहेस.. तिला तू हे सांगतो आहेस? आणि तसंही मी असले काय आणि नसले काय? तुमचं आयुष्य छान सुरू असणार आहे."

"कुठे जाणार तू? त्या आकाशकडे?" छद्मीपणे प्रितेशने विचारले.

"तसं ही मी तुला सांगण्याची गरज नाही. तरीही तुला सांगते आहे. कधी ना कधी ही वेळ येणार हे माहित होतंच मला.. म्हणून मी एका संस्थेत राहण्याची सोय केली आहे. आणि पुढची बुद्धी तो देईल तशी."


समिता आपली बॅग भरून बाहेर आली. प्रतिक सुन्नपणे उभा होता. समिता त्याच्याजवळ गेली. तिने त्याचे दोन्ही हात हातात घेतले.

"मोठा झाला आहेस.. फक्त एक गोष्ट सांगेन.. तुझ्या इच्छेखातर कधीच कोणाला वेठीला धरू नकोस. खास करुन आपल्या जोडीदाराला.. कारण तुझी एक इच्छा.. पण समोरच्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते." प्रतिकच्या चेहर्‍यावर हात फिरवून समिता निघाली.. एका नवीन आयुष्याकडे.



स्त्रीचे अफेअर.. स्त्रीचं शील म्हणजे काचेचे भांडे.. वगैरे वगैरे. एवढं ठासून सांगितलं असतं की तिचं वाकडं पाऊल म्हणजे तिचीच चूक असणार हे डोक्यात फिट्ट असतं. खरंच असं असतं का? हे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.


या कथेचा वापर कोणत्याही पद्धतीने करण्यास तसेच व्हिडिओ बनवण्यासाठी वापरण्यास मनाई आहे. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all