अगं हे सगळं तुझंच तर आहे.... भाग १

Self Respect
स्वाभिमान..... एका गृहिणीला ज्यात सर्वात जास्त तडजोड करावी ती गोष्ट म्हणजे स्वाभिमान! कमावती असो किंवा नसो.... सुगरण असो की नसो.... मॅनेजर असो की हाऊस किपिंग लेडी..... स्वाभिमान नावाची मौल्यवान गोष्ट सगळ्यांकडे असते.... कुणी त्याचा दागिना बनवून तोऱ्यात गळ्यात मिरवतं.... तर कुणी लॉकर मध्ये जपून ठेवतं.... इतकं जपून की वेळ आल्यावर तिचं तिलाच सापडत नाही.... आणि सोबत ती ही हरवून जाते....कायमची.... आपल्या अस्तित्वाला.... आपल्या असणाल्या.....

हीच गोष्ट मी या गद्य-पद्य लेखातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा!



कथा तिची आणि त्याची.....

'तो' नेहमी म्हणायचा, "अगं हे सगळं तुझंच तर आहे. तुला नोकरीची काय गरज.... आपल्याकडे सगळं काही आहे. आणि जे काही आहे ते तुझंच तर आहे.... कशाला जीवाचे हाल करून धावपळ करून जॉब ला जातेस. सगळं काही सोड. आणि आराम कर. मी आहे ना.... मी करेल ना सगळं मॅनेज."

'ती' सुद्धा फसली....
नोकरी सोडून घरी बसली.
धुणी भांडी.... केरवारा....
पै पाहुणे, याचा डब्बा... त्याचं आजारपण....
ती सगळं सगळं पाहू लागली....
हळूहळू सगळ्यांना तिच्या असण्याची सवय लागली.... जबाबदाऱ्या वाढल्या... ती मात्र कमी पडू लागली...


ही अशीच काहीशी अवस्था असते नाही, प्रत्येक वर्किंग वूमन ची. करिअर की फॅमिली... हा यक्षप्रश्न त्या प्रत्येकीला सतावतो, जीला 'आम्ही ब्रॉड माईण्डेड आहोत हं... तू कर तुला हवं ते...' असं म्हणणारी जवळची (?) माणसं भेटतात.

आधी ही माणसं 'आम्ही कसं तुला सपोर्ट करतोय करिअर साठी....' हे पटवून देतात. मग हळूहळू, 'आम्ही तुला सपोर्ट करतोय ना.... त्या बदल्यात थोड्या अपेक्षा ठेवल्या तर काय बिघडलं?' म्हणत घरातलही तिनेच करावं म्हणून मागे लागतात.

मग हळूच लागते 'बाळाची चाहूल....', 'आम्ही आहोत गं सांभाळायला तू नको काळजी करु' म्हणणारे बाळ झालं की अचानक 'आम्हाला नाही जमत बाई..... आम्ही आमची सांभाळली... आता तुम्ही तुमची सांभाळा.....' म्हणायला लागतात. तिची दमछाक.... तिची घालमेल.... दिसत जरी असली तरी कानाडोळा करतात...

आणि मग सुरु होतो इमोशनल ड्रामा....'बाळ महत्वाचं की करिअर?'..... आणि मग एक दिवस ती तिलांजली देते आपल्या करिअरची.... आपल्या लहानपणापासून पाहिलेल्या, जपलेल्या, जगलेल्या स्वप्नांची..... आता ती असते पार्ट टाइम आई.... आणि फूल टाइम कामवाली बाई..... एक ओव्हरटाईम करणारी बिनपगारी एम्प्लॉयी...

🎭 Series Post

View all