अगं हे सगळं तुझंच तर आहे.... भाग २

Self Respect
कारण खेळणाऱ्या हसऱ्या बाळाला घेऊन सगळेच बसतात...... पण रडायला लागलं की तिच्या हातात टेकवतात.....

बरं, जेवण लेट झालेलंही चालत नाही... आणि भुकेने रडलेलं बाळही.... आता तिने काय करायचं? काय आधी पुरं करायचं? काहीच तिला सुधरत नाही..... आणि एक वेळ अशी येते की आपलं अस्तित्व सुद्धा तिला गवसत नाही...

ऑफिस मध्ये ५० जणांची टीम सांभाळणारी ती, घरी सगळ्यांच्या नजरेत आळशी, मूर्ख, धसमुसळी, बेजबाबदार कधी होते तिचं तिलाही समजत नाही....  आणि तेव्हा तिच्यातल्या आतल्या तिला काय वाटत असेल हे कुणालाही उमजत नाही...

शाळेत बोर्डात येणारी ती.... 'किती मूर्ख आहेस गं' म्हणून हिणावली जाते, वक्तृत्व स्पर्धेत पहिली येणारी ती....असंख्य बक्षिसे मिळणारी ती, जेव्हा आपल्या दोन ओळींच्या भावना सुद्धा न अडखळता बोलू शकत नाही तेव्हा तिच्या मनाला काय वाटत असेल हो .....


लग्नाआधी, नोकरी असताना ती आई वडिलांना हक्काने काही बाही घेऊन देते......तिच्या स्वतःच्या कमाईच्या पैशाने... आई वडिलांची पेन्शन असतेच तरीही...
पण लग्नानंतर बऱ्याचदा येतं त्यावर बंधन...


खरा खेळ सुरु होतो जॉब सोडल्यावर.... आईवडील आपले पेन्शनचे पैसे तिने  तिला देऊ करतात...... कारण  ऑनलाईन पैसे भरणं.... रिचार्ज करणं... एखादी ट्रिप प्लॅन करणं... बिल भरणं या सर्व गोष्टी ती करते ना त्यांच्यासाठी...... आधी स्वतःच्या आणि नंतर त्यांच्याच पैशाने....

अगदी तसंच.... जसा तो करायचा त्याच्या आई वडिलांसाठी.... पण त्याच्या स्वतःच्या पैशाने....

तिने नोकरी सोडली की हळूहळू त्याच्या नजरेत तिचं आईवडिलांवर खर्च करणं खुपायला लागतं.... काही विघ्नसंतोषी माणसं कान भरायला सुरवात करतात... ती माहेरचं का बघते.... तिचा काय संबंध....

मग हाही सुरु होतो... तू का करतेस.... त्यांची बिलं तू का भरतेस..... त्यांचं त्यांना सांग ना....तुझ्या आईवडिलांना त्यांचं त्यांचं करु दे ना....

मग तीही हेच म्हणते...... प्रत्युत्तर म्हणून.... पण तो अपमान ठरतो..... अवमान ठरतो.... त्याचा.... त्याच्या नवरेशाहीचा.... आणि पूर्वापार चालत आलेल्या फालतू रीती रिवाजांचा..... एका पुरुषी अहंकाराचा....

उठता बसता मग हे माझं घर आहे....
माझ्या पैशावर जगतेस.... 
हा बेड.. ही गादी...ही उशी.... सगळं माझ्या पैशाचं आहे... ज्यावर तू लोळतेस...
किराणा सुद्धा माझ्या पैशाने येतो... ज्यावर तू जगतेस....

ती ही मग उत्तरते.....
असेल घर तुझं.... त्याला घरपण मी देते...
या बेड गादी उशीला..... बिछाना मी बनवते....
तू आणलेल्या किराण्याचा स्वयंपाकसुद्धा मीच बनवते....
चार भिंतीना तुझ्या.... घराचं रुपडं मी देते....

🎭 Series Post

View all