हे सगळं तुझंच तर आहे.... भाग ३(अंतिम)

Self Respect

एवढं सगळं ऐकून तो तरी कसा गप्प राहील....

तुझं हे  शहाणपण तुझ्याजवळच ठेवायचं....
मी काय करायचं.... ते मला नाही हा शिकवायचं....
जमत असेल तर राहायचं.... नाहीतर चलतं बनायचं....
जमत नसेल तर निघायचं.... माझ्या घरातून कायमचं....
मी आहे म्हणून तू आहेस.... हे नाही हा विसरायचं....

दुखावते मग ती...
हक्क नकोच असतो हो तिला, त्याच्या घरावर...
हवा असतो तो फक्त आपल्या माणसांवर...
थोडा आपलेपणा हवा असतो....
थोडा मायेचा ओलावा हवा असतो.....
आजारी पडल्यावर काळजीने गालावर फिरणारा हात हवा असतो...
केलेल्या कामाचं कौतुक नको....
पण पोचपावती तरी द्या रे....
तिचं मन ओरडून सांगत असतं...

"पोचपावती द्यायला असा काय मोठा तीर मारतेस....
सगळ्याच बायका करतात.... तसं तू पण करतेस...."
हा समस्त पुरुषवर्गाचा डायलॉग मग तिला ऐकवला जातो
.....


चिडून कधी तीही म्हणते, "हो का? मग तुही कमवून आणतोस.... बाकीच्या पुरुषांसारखा.... त्यात काय मोठी गोष्ट. कशाला स्वतःचं कौतुक एवढं करतोस?"


अगं आई गं... बाई बाई गं... एवढा मोठा अपमान!

खुप ऐकून घेतलं तुझं....
एक लक्षात ठेवायचं....
घर माझं... पैसे माझे....
तेव्हा माझ्याच टर्म्स अँड कंडिशन्स वर राहायचं....
तिला सुनावलं जातं...

आता एकही पैसा न कामावणारी ती,
त्याच्यावर आपल्या गरजासाठी अवलंबुन असणारी ती काकूळतीला येऊन विचारते,

घर तुझं असलं तरी संसार आपल्या दोघांचा आहे...
नात्यात या आपल्या का हा सवाल पैशांचा आहे?
अरे, आतापर्यंत सगळ्यांचं केलं....
स्वतःला विसरून केलं....
हक्काची नोकरी सोडून....
पै पाहुण्याचं स्वागत केलं...
काढली तुमची दुखनीखुपनी....
स्वतःचं आजारपण विसरून....
जगले फक्त तुमच्यासाठी....
अगदी स्वतःला हरवून....
हेच का त्याचं फळ.... हिच का ती परतफेड....
काय कमावलं रे मी.... स्वतःलाच गमावून.....
तुम्ही सगळे माझे आहात....
पण मी कुणाचीही नाही.....
असं कसं रे हे नातं....
ज्यात मला काही स्थान नाही....
कशाला या पाशात राहू....
सगळ्यांना बांधून ठेवू....
जे माझं नाहीच आहे....
त्याची वाट का पाहू.....


एखादी त्यातलीच, हरवलेली 'ती' मग उठते,
स्वतःला शोधायला पुन्हा बाहेर पडते.....
पण तिने जरी सोडलं त्याला, तरी ती स्वतःच, 'नवऱ्याने टाकलेली बाई' ठरते...
जगाची ही रीतच भारी..... ज्यात नेहमी बाईच अपराधी ठरते...
कोण म्हणतं मुलगी शिकली प्रगती झाली....
अरे अजूनही तिचं पाऊल उंबऱ्यावरच अडते...

ज्या दिवशी ती सगळी बंधनं झुगारून पुन्हा नव्याने उभी राहायचा प्रयत्न करते, तेव्हा तिलाच दुषण लावलं जातं.... अशावेळी ती विचारते,

एक स्वाभिमान काय गहाण ठेवला....
सारी सुखं पायाशी लोळण घेऊ लागली....
त्याच स्वाभिमानाला आज थोडं जपून पाहिलं ....
सारी दुनियाच माझी वैरी झाली...

असा काय गुन्हा केला....
की नाती सारी विरळ झाली...
स्वाभिमानच तर जपला फक्त......
खरंच का मी चूक केली?


मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातल्यांचा अपमान करा आणि बाहेर पडा असं मी नाही म्हणत. पण स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकावा लागेल इतपत पडतं घेऊ नका.

आज आपण सोशल मीडियावर कितीतरी स्त्रियांची कहानी ऐकतो, जॉब सुटला.... सोडावा लागला.... मग घरचे कसे त्रास देतात.... कसं गृहीत धरतात... कसं प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरावे लागतात.... म्हणून जॉब सोडू नका.... सक्षम व्हा, स्वतःच्या पायावर उभं रहा. कुणावर अवलंबून राहू नका.

आणि गृहिणी असाल तरीही मानाने जगा. अर्थात आपण मानाने जगायचं म्हणजे दुसऱ्याचा अपमान करायचा असा अर्थ नका घेऊ.... पण उगाच सगळं अंगावर घेऊ नका गं... झेपेल ते सगळं करा.... पण तब्येतीला जपून....स्वतःला सांभाळून... बाकी तुम्ही सुजाण आहातच....

🎭 Series Post

View all