अगर तुम साथ हो.. भाग ३
मागील भागात आपण पाहिले की काव्या आणि रितेश दोघांच्याही घरातून लग्नासाठी परवानगी मिळते. आता बघू पुढे काय होते ते.
"आई, तो एक मूर्ख आहे. तुम्हाला नको समजायला?" पल्लवी कुरकुरत म्हणाली.
"काय समजायचं? लग्नाचं वय झालंच आहे की त्याचंही. आज ना उद्या करायचंच आहे ना? मला सांग याला नोकरी नाही म्हटल्यावर कोण हो म्हणेल? आणि ही तर कामाला जाते म्हणे. बघतील दोघं कसं काय करायचं ते."
"अगं पण.. त्यांची आणि आपली काही बरोबरी?" पल्लवीच्या शंका संपत नव्हत्या.
"आता काय.. पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं. कुठे डोक्याला त्रास करून घेऊ मी?"
"आता तूच असं म्हटल्यावर मी काय बोलू? लग्न कसं करणार?"
"साध्या पद्धतीने करायचे म्हणतो आहे. कुठे अजून लग्नासाठी खर्च करायचा?"
"काय गं आई.. माझी किती स्वप्न होती. मला करवली म्हणून मिरवायचे होते. आणि माझ्या सासरच्यांना काय सांगू?"
"काही नको सांगूस.. तसंही रितेशला नोकरी नाही म्हणून जावईबापू कुठे बोलतात त्याच्याशी. शेवटी तो आणि त्याचे नशीब." स्मिताताई सुस्कारा टाकत म्हणाल्या.
"तुमचं सगळंच ठरलं आहे मग लग्नाची तारीखही सांग. अक्षता टाकायला येतेच." पल्लवी तिच्याकडून विषय संपवत म्हणाली.
"हे बघ.. दोन दिवस आधीच ये. थोडेफार का होईना कुळाचार करावेच लागतील ना?" स्मिताताई बोलत होत्या.
"काव्या, काळजी वाटते गं तुझी." कुंदाताई मेहेंदी काढून हसत फोटो काढणाऱ्या लेकीकडे बघत पुटपुटल्या. मैत्रिणींच्या घोळक्यात बसलेल्या काव्याने जणू त्यांचे शब्द ऐकले. मैत्रिणींना सोडून ती आईकडे आली.
"हे काय? परत डोळ्यात पाणी?" आईला हलकेच दटावत ती म्हणाली.
"आई झाल्यावर समजेल तुला."
"त्याला अजून खूप वेळ आहे. आई, आहे तो क्षण जगूयात ना? उद्या जे होईल ते टळणार नाहीच ना. मग कशाला त्या टेन्शनमध्ये जगायचे?"
"माझी गुणाची पोर ती.. तिथे पण अशीच रहा. कोणी काही बोललं तर मनावर नको घेऊस. पण हो म्हणून अन्यायही सहन नको करूस. आम्ही आहोत पाठीशी, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव."
"आई, मी बरोबर करते आहे ना?" काव्याने आईला मिठी मारत विचारले.
"आता एकदा ठरवल्यावर परत परत तोच विचार करायचा नाही." कुंदाताईंनी काव्याच्या डोक्यावरून हात फिरवला. "उद्या लग्न आहे ना तुझे.. नको त्रास करून घेऊ बाळा." आईशी बोलून खुललेली काव्या परत मैत्रिणींकडे गेली. त्या काव्याला चिडवायची एकही संधी सोडत नव्हत्या. शेवटी 'उद्या लवकर या,' असे सांगून कुंदाताईंनीच त्यांना जायला सांगितले. काव्या आपल्या खोलीत गेली. ती झोपायला जाणार तोच तिचा मोबाईल वाजला. रितेशचा फोन होता.
"झोपलीस का?" त्याने विचारले.
"झोपायलाच चालले होते. तू आता फोन केलास?" काव्याने आश्चर्याने विचारले.
"गर्लफ्रेंडशी बोलावेसे वाटले. कारण उद्यापासून बायकोचा जाच सुरू होईल ना?" रितेश मस्करी करत होता.
"नको करूस मग लग्न.. कोण पाठी लागलं आहे तुझ्या?" काव्यानेसुद्धा बोलून घेतलं.
"बघ हं.. लग्नाला नाही म्हणालो तर रडशील."
"अजिबात नाही.. कालच बाबांच्या एका मित्राचा फोन आला होता. कशाला लग्नाची घाई करतोस म्हणून? माझा मुलगा अमेरिकेहून परत आला की काव्याशी लग्न लावून देऊ म्हणून." आता काव्या फिरकी घेत होती.
"ए बाई.. तसं काही असेल तर आत्ताच येतो आणि पळवून घेऊन जातो तुला." रितेश म्हणाला.
"कशाला उगाच? नंतर जाचच होणार ना तुला?"
"तो जाच परवडेल.. हा नाही." रितेश बोलता बोलता गंभीर झाला. "काव्या खरंच माझ्याशी लग्न करणार आहेस ना? तू नाही आलीस माझ्या आयुष्यात तर मी तुटून जाईन पार. मस्करीत सुद्धा तू मला सोडून जाण्याचा विषय काढू नकोस."
"मी तर मस्करी करत होते. सुरुवात तूच केलीस ना?" काव्याचा आवाज पडला होता.
"माझी चूक झाली.."
"हेच बोलायला फोन केला होतास का?" काव्याने विषय बदलला.
"नाही.." रितेशचा मूड परत आला होता. "मी तर हे सांगायला फोन केला होता की मी वाट बघतो आहे तुला वधूवेशात बघायची.. आणि....."
"आणि काय??" काव्याचे श्वास वाढले होते.
"काव्या, आय लव्ह यू सो मच.. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळणार आहे. मी सगळं नाही तुला सांगू शकत. पण हे सगळंच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे." रितेशचा एकेक शब्द काव्या कानात साठवून ठेवत होती. त्याच्या याच प्रेम करण्यामुळे तर तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
"हॅलो, ऐकते आहेस ना?" समोरून रितेशचा आवाज आला. काव्या स्वतःच्या विचारातून जागी झाली.
"हो.."
"कधीचा मीच बोलतो आहे. तू काहीच बोलत नाहीस. दमली आहेस का?"
"थोडीशी.. त्याहीपेक्षा उद्याचे थोडे टेन्शन आले आहे."
"नको घेऊस टेन्शन.. मी आहे ना? झोप आता शांतपणे.. आणि झोपेत मलाच बघ." रितेश हळुवारपणे म्हणाला. त्याचे ते बोलणे ऐकून काव्या लाजली आणि तिने फोन कट केला.
पार पडेल का काव्या आणि रितेशचं लग्न सुखरूप? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा