अगर तुम साथ हो.. भाग ५

कथा तिच्या प्रेमाची
अगर तुम साथ हो.. भाग ५

मागील भागात आपण पाहिले की काव्या आणि रितेशचे लग्न होते. आता बघू पुढे काय होते ते.


"बजाओ रे.. जोरजोरसे बजाओ.. अगर नही बजाव्या तो पैसा नही मिलेगा." पार्थ ओरडत होता. काव्या आणि रितेश बघतच राहिले. पार्थने आणि बाकीच्या मित्रांनी वरातीची तयारी करून ठेवली होती. खाली बँडवाले उभे होते. दरवाज्यापर्यंत फुलांचा गालिचा दिसत होता. काव्या हे बघून हरखली होती.

"हे सगळं??" रितेशने नाचणार्‍या पार्थला मागे खेचून विचारले.

"हे आमच्याकडून.. आणि इथे असा ठोंब्यासारखा उभा राहू नकोस. चल तू पण. वहिनी तुम्हीपण यायचं हं थोड्यावेळाने." पार्थ रितेशला नाचायला घेऊन जात म्हणाला. काव्या पुढे न जाता पाठी उभी राहून फक्त बघत होती. पार्थने हळूहळू सगळ्यांनाच नाचायला पुढे घेतले होते. माधवराव, स्मिताताईही नाचत होते.
'हे घर एवढं आनंदात आहे. मला जमेल का यांचा आनंद कायम ठेवायला?' काव्या विचार करत होती. तेवढ्यात पार्थ तिला घेऊन जायला आलाच. त्याने तिचा हात धरून तिला नाचायला लावले. रितेशचे तिच्याकडे लक्ष होतेच. तो पटकन तिच्याजवळ आला.

"खूप छान दिसते आहेस आज.." रितेश काव्याच्या कानात कुजबुजला. सगळ्यांची त्यांच्या दोघांवर असलेली नजर तिला जाणवली. हसून ती त्याच्यापासून लांब होऊन तिच्या आधीच्या जागेवर जाऊन उभी राहिली.

"चला.. बस झाला धिंगाणा. गृहप्रवेश करून घेऊ." स्मिताताईंनी आवाज दिला. त्याबरोबर सगळे शांत झाले. रितेश काव्याशेजारी येऊन उभा राहिला. पल्लवी दार अडवायला पुढे झाली.

"दणकून काहीतरी घेतल्याशिवाय येऊ देऊ नकोस आत.." कोणीतरी पाठून बोललंच.

"येऊ दे की आत ताई.." रितेश हसत म्हणाला.

"असं कसं येऊ देईल ती? म्हण गं पल्लवी.. लेक दिलीस तरच आत येऊ देईन म्हणून."

"नको बाबा याची लेक.. आम्ही तालेवाराचीच बघू." पल्लवी उत्साहात बोलून गेली. पण ते ऐकून रितेश आणि काव्याचं तोंड उतरलं. काव्याने रितेशच्या हाती एक वस्तू दिली, पल्लवीला द्यायला.
पल्लवीने नाक मुरडत ती डबी उघडली आणि बघतच राहिली. आत सोन्याचे नाजूकसे पण छान कानातले होते.

"हे आमच्या दोघांकडून. लेक नाही पण हे द्यायला आवडेल आम्हाला." काव्या म्हणाली. कसनुसा हसायचा प्रयत्न करत पल्लवीने ते घेतले. माप ओलांडून काव्या आत येणार तोच परत बाजूच्या काकू म्हणाल्या.

"अगं नाव तर घे.. अशी कशी आत येतेस?"

"संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा,
रितेशच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा."

काव्याने घेतलेले नाव ऐकून रितेशचे डोळे पाणावले.

"हा अन्याय आहे एका पुरुषावर." पाठीमागून पार्थ ओरडला.

"कसला अन्याय?" काकूंनी विचारले.

"वहिनींनी नाव घ्यायचे आणि माझ्या मित्राने नाही.."

"पार्थ.." रितेश ओरडला.

"बरोबर.. रितेश तू ही घे नाव." सगळ्यांचा आग्रह झाला.

"देवळाला खरी शोभा कळसाने येते
काव्यामुळे माझे गृहसौख्य दुणावते."

"अरे व्वा.. लग्न झाल्या झाल्या माझा पठ्ठा चारोळ्या करायला लागला." पार्थने रितेशच्या पाठीवर थाप देत म्हटलं.

"आता झालं असेल सगळं तर येऊ दे की तिला आत. किती वेळ उभं करणार नवरीला दारात?" काकू वैतागल्या होत्या.
पण ते ऐकून पार्थने तोंड बंद केलं. शेवटी एकदाचं माप ओलांडून काव्याने गृहप्रवेश केला.

"पल्लवी, लक्ष्मीपूजनाची तयारी झाली का गं?" स्मिताताईंनी विचारले.

"हो आई.. सुपारी खेळण्यासाठी रंगीत पाणीसुद्धा करून ठेवलं आहे."

"काव्या, ये गं.. पूजा करून घे." स्मिताताईंनी काव्याला पूजा कशी करायची ते सांगितलं. लगेचच दोघांना सुपारी खेळण्यासाठी बसवलं. काव्याने लीलया रितेशच्या हातातून सुपारी मिळवली. ते बघून काकू म्हणाल्या,

"बरंय बाई तुझं.. आत्तापासूनच नवरा मुठीत आहे गं तुझ्या."

"हो काकू.. नशीब लागतं त्यासाठी." पल्लवी म्हणाली. तिचं बोलणं कुत्सितपणे होतं की प्रेमाचं, हे न समजल्याने काव्या काही न बोलता गप्पच होती.

"झाल्या असतील गप्पा, तर आवरा आता. काव्या, त्या खोलीत तुझं सामान ठेवलं आहे. जा आवरून घे." स्मिताताई मध्ये पडत म्हणाल्या. काव्या त्या खोलीत गेली.

"साडी बदलून ड्रेस घातलास तरीही चालेल गं." पल्लवी आत येत म्हणाली.

"ताई.. तुम्हाला ताई म्हणू ना?" काव्याने हळूच पल्लवीला विचारले.

"आता तुमचं लग्न झालंच आहे तर काहीही म्हण." पल्लवीचा स्वर अजूनही रागीट होता.

"तुम्हाला आवडलं नाही का? आपल्याला आधी बोलता आलं नाही म्हणून विचारते."

"माझ्या आवडण्या न आवडण्याचा काय संबंध? मनाचे खेळ आहेत तुझ्या नुसते. आवरून बाहेर ये लवकर. मी जाते." म्हणत पल्लवी बाहेर गेली.


पल्लवीचे वागणे खरंच काव्याच्या मनाचे खेळ आहेत की पल्लवीला काव्या आवडत नाही.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all