अगर तुम साथ है.. भाग ६
मागील भागात आपण पाहिले की काव्याचा गृहप्रवेश होतो. पल्लवीचे वागणे बघून काव्या तिच्याशी बोलायला जाते. आता बघू पुढे काय होते ते.
"रितेश, हे माझ्याकडून." रितेशच्या हातात एक पाकीट देत पल्लवी म्हणाली.
"हे काय?" त्याने आश्चर्याने विचारले.
"तू हनिमूनचा काही प्लॅन केला नाहीस ना? मग हे तीन दिवसांचं पॅकेज माझ्याकडून." पल्लवी म्हणाली.
"हे तुला कोणी सांगितलं? आई काही बोलली?" रितेशने अजूनही पाकीट हातात घेतले नव्हते.
"अजून कोण सांगणार? मी तिला आपलं सहजच विचारलं होतं, तुम्ही कुठे जाणार फिरायला म्हणून. तर ती म्हणाली कुठेच जायचं ठरलं नाही." ते ऐकून रितेशची मान लाजेने खाली गेली. त्याने काव्याची समजूत काढली होती की थोडंसं सेटल झाल्यावर बाहेर जाऊ म्हणून. आणि आता हे.
"ताई, एकदा विचारायचे तरी.."
"लहान भावाला काही द्यायला विचारावे लागते का? गुपचूप घे. आणि उद्या पूजा झाली की लगेच रात्री निघा. काव्याला सांग बॅग भरायला." पल्लवी रितेशचे गाल ओढत म्हणाली.
रितेश लग्नाचे कपडे बदलून आला. त्याची नजर मात्र काव्याला शोधत होती. तोच आतून चहा घेऊन स्मिताताई बाहेर आल्या.
"बदललेस का कपडे? बरं झालं."
"आई, काव्या?"
"ती आत आहे. का रे? लगेच झालं का काव्या काव्या सुरू?"
"तसं नाही आई.. ताईने हे पॅकेज दिलं आहे. त्याबद्दल तिला सांगायचं होतं."
"हो.. मीच म्हटलं तिला. तुम्ही कुठेच फिरायला जाणार नाही, ते चांगलं दिसत नाही." स्मिताताईंनी स्पष्टीकरण दिलं. यावर काहीच न बोलता फक्त खांदे उडवून रितेश आत गेला. तिथे काव्या एकटीच उभी राहून उकळणाऱ्या चहाकडे बघत होती. आजूबाजूला कोणीच नाही हे बघून रितेशने हळूच तिला मिठीत घेतले. काव्या दचकून ओरडणार हे समजताच त्याने पटकन हात तिच्या तोंडावर ठेवला.
"मीच आहे.."
"तू पण ना.. घाबरले ना मी." काव्या लटक्या रागाने म्हणाली.
"घाबरायचं कशाला? माझ्याशिवाय कोण असणार आहे?" रितेश काव्याच्या अजून जवळ जात म्हणाला.
"तू बरा आहेस ना? बाहेर तुझे सगळे नातेवाईक बसले आहेत आणि तू इथे असं.. " बोलता बोलता काव्या थांबली.
"बरं.. जे सांगायला आलो होतो ते सांगतो. ताईने आपल्याला हनिमून पॅकेज दिलं आहे. उद्या रात्री निघायचे आहे."
"अरे पण.."
"काव्या, मान्य आहे मी तुला म्हटलं होतं आपण नंतर जाऊ. पण आता तिने न सांगता बुक केले आहे तर येऊ ना जाऊन. हे दिवस परत येणार आहेत का?" रितेश काव्याची समजूत काढत म्हणाला.
"तू म्हणशील तसं.."
"मला माहित होतं, तू समजून घेशील. आता फक्त तुझी बॅग भर. तेच सांगायला आलो होतो." रितेश काव्याच्या कपाळावर ओठ टेकवून गेला सुद्धा.
"वेडा आहे नुसता.." स्वतःशीच हसत काव्या म्हणाली.
दुसर्या दिवशी पूजा झाली. आलेली पाहुणेमंडळी आपापल्या घरी गेली. काव्या आणि रितेशही हनिमूनसाठी बाहेर पडले.
"माझा विश्वासच बसत नाहीये.. आपण फायनली लग्नानंतर बाहेर जातो आहोत." बसमध्ये शेजारी बसलेल्या रितेशला बिलगून काव्या म्हणाली. ते ऐकून रितेशने तिला जोरात चिमटा काढला.
"आऊच.." काव्या जोरात ओरडली. "हे काय?"
"तुझा विश्वास बसत नव्हता. म्हणून खात्री पटण्यासाठी.." मिश्किल हसत रितेश म्हणाला.
"तू ना.." हलकेच चापट मारत काव्या हसली. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवले.
"काव्या.. सॉरी.." तिचा हात हातात घेत रितेश म्हणाला.
"कशासाठी सॉरी?" वर बघत काव्याने विचारले.
"मला तुला जगातली सगळी सुखे द्यायची आहेत. आता माझ्याकडे काहीच नाही. पण विश्वास ठेव माझ्यावर.. एक दिवस तुला हवं ते तुझ्या पायाशी असेल." रितेश हळवेपणाने बोलत होता.
"काय देशील मला?" काव्याने रितेशला अजून बिलगत विचारले.
"काय म्हणजे?आपल्याकडे मोठं घर असेल, चारचाकी असेल. हे असं रात्री बेरात्री या एसटीने प्रवास करण्याऐवजी आपण माझ्या गाडीने फिरू. छान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहू." रितेश बोलत होता.
"बस..बस..बस.. मला सांग, तुझ्या गाडीने फिरताना मला असं तुझ्याजवळ बसता येणार आहे का?" काव्याने हळू आवाजात विचारले. "नाही ना.. आणि मला आता कसलाच विचार करायचा नाही. तू माझ्या शेजारी आहेस, आपलं नवीन आयुष्य सुरू होतं आहे.. अजून मला काही नको." एकमेकांचा हात तसाच हातात ठेवत ते दोघेही आपल्या नवीन आयुष्याच्या स्वप्नात रंगून गेले.
नवीन आयुष्यात काव्याला भरता येतील रंग? की करावा लागेल अडचणींचा सामना? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा