अगर तुम साथ हो.. भाग १२

कथा तिच्या प्रेमाची
अगर तुम साथ हो.. भाग १२

मागील भागात आपण पाहिले की रितेशला एक हॉटेल चालवायची संधी मिळते. आता बघू पुढे काय होते ते.


"रितेश, काय हे लहान मुलांसारखं? हिच साडी नेस आणि हेच दागिने घाल करतो आहेस? फक्त हॉटेलवरच जायचं आहे ना?" काव्या रितेशवर वैतागली होती.

"तिथे गेल्यावर समजेल.. पण माझी बायको छान दिसली पाहिजे. ऐक ना.. तो तुझा हार पण घाल ना." रितेश काव्याला मस्का मारत म्हणाला.

"अजिबात नाही.. आता तर तू मला सांगच, काय चालू आहे तुझे. नाहीतर मी हे काहीच करणार नाही." हातातली साडी खाली ठेवत काव्या हट्टाने म्हणाली.

"तू ना एक नंबर हट्टी आहेस. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. सगळ्याची वाट लावून टाक तू." आता रितेश वैतागला होता.

"कसलं सरप्राईज?"

"आपल्या हॉटेलचं उद्घाटन मला तुझ्या हाताने करायचे होते." रितेश तोंड फुगवून म्हणाला.

"माझ्या?" काव्याच्या आवाजात आश्चर्य होते.

"हो.. तुझ्याच. पण मला ते तू तिथे गेल्यावर सांगायचे होते ना."

"रितेश.. एवढा मोठा सन्मान?" काव्याच्या डोळ्यात पाणी आले.

"सन्मान? अंहं.. खरंतर तू माझ्यासाठी काय आहेस हे दाखवून देण्याची एक संधी मिळाली आणि मी ती उचलली." रितेश मनापासून बोलत होता. काव्याने न बोलता त्याला मिठी मारली आणि त्याचा खांदा आपल्या अश्रूंनी भिजवू लागली.

"तू अशीच रडत राहिलीस तर आपण निघायचे कधी?" हसत रितेशने विचारले.

"तुला ना भलत्या वेळेस मस्करी सुचते.." काव्या रोषाने कपडे बदलायला निघाली. तोच काहीतरी आठवलं म्हणून पाठी वळली.

"रितेश, आईबाबांना बोलावलेस?"

"हो.. दादा घेऊन येणार आहे." रितेश स्वतःच्याच विचारात मग्न होता.

"माझ्या नाही.. तुझ्या." काव्याने हळूच विचारले.

"नाही.." फक्त एवढंच बोलून रितेश बाहेर निघून गेला. 'मला माहित होतं, तू त्यांना सांगणार नाहीस. मी माझं काम केलं आहे. ते आले तर तुमचं नशीब. फक्त त्यांना तिथे बघून चिडू नकोस म्हणजे झालं.' स्वतःशीच पुटपुटत काव्या आत कपडे बदलायला गेली. रितेशने खरंतर तिला आजपासून नवीन हॉटेल सुरू होणार आहे एवढेच सांगितले होते. तिला रितेश आईवडिलांपासून दुरावलेला बघवत नव्हतं. म्हणून तिने त्यांना हॉटेलमध्ये बोलावले होते. त्यानिमित्ताने त्यांच्यात दिलजमाई झाली तर तिला हवीच होती. शेवटी सगळं देवावर सोपवून काव्या आवरायला गेली. बाहेर रितेश मात्र येरझार्‍या झालत होता. त्याचे आईबाबा त्याला या क्षणी त्याचे कौतुक करायला हवे होते.. पण अहंकार आड येत होता.

"कशी दिसते आहे मी?" आवरून आलेल्या काव्याने विचारले. रितेश बघतच बसला. त्याने कितीही आग्रह केला तरी काव्याने जास्त दागिने घातले नव्हते. पण तिचा साधेपणाच तिच्या सौंदर्यात भर घालत होता.

"चांगली नाही का दिसत मी? बदलू का कपडे?" तिने साडीकडे बघत विचारले.

"अंहं.. खरंतर काय बोलू तेच सुचत नाहीये.. पण आता या क्षणाला असं वाटतं आहे की माझ्यासारखा भाग्यवान मीच." रितेशची नजर अजूनही हलली नव्हती.

"आता नाही का उशीर होत? चल लवकर." काव्या रितेशचा हात ओढत त्याला बाहेर काढत म्हणाली. दोघे हॉटेलवर पोहोचले. काव्याचे आईबाबा, दादावहिनी आधीच पोहोचले होते.

"काय हे? किती उशीर? आम्ही तुमचं स्वागत करायचं की तुम्ही आमचं?" आदित्य काव्याला चिडवत म्हणाला.

"झाला रे उशीर दादा.. सॉरी त्यासाठी." काव्या कान पकडत म्हणाली. पण तिचे डोळे मात्र कोणालातरी शोधत होते. तिने नजरेनेच आदित्यला विचारले. त्याने आतल्या बाजूला खूण केली. काव्याने तिकडे बघितले. माधवराव, स्मिताताई, पल्लवी, मिलिंद आत बसले होते. पल्लवी गरोदर असल्याचं काव्याला समजलं होतं. पण तिची ओटी भरायला ना तिला कोणी बोलवलं ना ती ही गेली. त्या विचाराने आलेली उदासी झटकून ती आत गेली. स्मिताताई आणि माधवरावांना तिने नमस्कार केला. ते तोंडातल्या तोंडात पुटपुटले. काव्या पल्लवीकडे वळली.

"आल्याबद्दल मनापासून थँक यू." तिने मिलिंदला पण नमस्कार केला.

"काव्या.. कुठे आहेस तू? चल लवकर. उशीर होतो आहे." ओरडतच रितेश आत आला आणि आपल्या कुटुंबाला बघून थबकला.

"रितेश, किती दिवसांनी बघते आहे रे तुला?" स्मिताताई रितेशला मिठीत घ्यायला पुढे झाल्या. रितेशही स्वतःला आवरू शकला नाही.

"आई.. बरं वाटलं तू इथे आलीस ते बघून."

"माझ्या लेकाची भरभराट होते आहे.. ती बघायला मी कशी नाही येणार? जा बाबांना भेट जा." स्मिताताई रितेशला म्हणाल्या. "आणि हो.. मिलिंदशी पण बोल."

"हो.." रितेशने पुढे होऊन माधवरावांना नमस्कार केला. माधवरावांनी त्याला पटकन मिठी मारली. रितेशला हे अनपेक्षित होते.

"नाव मिळवलंस तू.." माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते बघून रितेशला भरून आलं. तो पल्लवी आणि मिलिंदशी काही बोलणार तोच पार्थ तिथे आला.

"रितेश, अरे गुरूजी वाट बघत आहेत कधीची."

"तू इथे पण?" पल्लवीने आश्चर्याने विचारले.

"कोई शक?" गॉगल लावत पार्थ म्हणाला.

"आईबाबा.. फीत तुम्ही कापाल?" रितेशने विचारले. ते ऐकून काव्याने चमकून रितेशकडे बघितले. पण तो स्वतःच्याच नादात होता.

"आम्ही?"

"हो.. तुम्हीच.." रितेश आग्रहाने त्या दोघांना पुढे घेऊन गेला.

"अरे वहिनी पाठीच राहिल्या.." पार्थने रितेशला आठवण करून दिली.

"काव्या, ये ना पुढे.." रितेश म्हणाला. काव्या चेहर्‍यावर हसू आणत पुढे गेली. छोटीशी पूजा झाल्यावर काव्या काय हवं नको ते बघायला गेली. माधवराव आणि स्मिताताई आपल्या मुलाची येणाऱ्या जाणाऱ्याकडे स्तुती करत होते. ती ऐकून रितेशच्या अंगावर मांस चढत होतं. कार्यक्रम पार पडला. सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले. काव्याच्या आणि रितेशच्या घरातले फक्त होते. माधवराव बोलू की नको विचारात होते. काव्याचे आईबाबा निघालेत हे बघून त्यांनी विचारलेच..

"रितेश, काव्या माझी चूक झाली.. पण तुम्ही दोघं याल परत घरी?"


काव्या आणि रितेश जातील का परत त्याच्या घरी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all