अगर तुम साथ हो.. भाग १३
मागील भागात आपण पाहिले की हॉटेलच्या उद्घाटनाला रितेशच्या घरातले येतात. आता बघू पुढे काय होते ते.
"घर तुमच्यावाचून सुनंसुनं वाटतं आहे. तसंही आम्ही असताना तुम्ही वेगळं रहावं हे मनाला पटत नाही." माधवराव म्हणाले.
"बाबा, तुम्हीच म्हणाला होता ना.. हे काम करायचे असेल तर माझ्या घरात रहायचे नाही." रितेश म्हणाला.
"हो.. पण ती माझी चूक झाली. चूक सुधारायची एक संधी तर दे. काव्या तू तरी बोल काहीतरी." माधवरावांनी काव्याला मध्ये घेतले.
"मी.. मी काय बोलू?" काव्या म्हणाली.
"तूच सांग गं आता याला. तुझा भाऊ आईवडिलांना सोडून राहिला तर चालेल का तुला? आमचा जीवही जळतो याच्याशिवाय." स्मिताताई म्हणाल्या.
'माझे आईवडील माझ्या भावाला घराबाहेर नाही काढणार.' काव्याच्या ओठांवर आलेले शब्द तिने मागे ढकलले.
'माझे आईवडील माझ्या भावाला घराबाहेर नाही काढणार.' काव्याच्या ओठांवर आलेले शब्द तिने मागे ढकलले.
"निर्णय रितेशला घ्यायचा आहे." काव्या अलिप्तपणे म्हणाली.
"आईबाबा.. मला थोडा वेळ द्या. तुम्ही म्हणालात म्हणून मला लगेच येता येणार नाही. थोडं समजून घ्या." रितेश म्हणाला.
"घे.. दोन दिवस घे.. पण घरी ये." माधवराव निघताना म्हणाले.
"रितेश, आईबाबांना तुझी गरज आहे. त्यांना एकटं राहू देऊ नकोस." पल्लवीसुद्धा जाताना म्हणाली.
"हॉटेल छान आहे.." मिलिंद रितेशला म्हणाला.
"आम्हीसुद्धा निघतो आता. तुम्ही दोघे जा घरी. उद्यापासून परत आराम मिळणार नाही." कुंदाताई काव्याला म्हणाल्या. "हे सगळं मार्गी लागलं की चार दिवस ये आरामासाठी. लग्न झाल्यापासून माहेरपणाला आलीच नाहीस ना."
"येईन.. नक्की येईन." विचारात पडलेल्या रितेशकडे बघत काव्या म्हणाली.
"आपण निघायचं? सगळे घरी गेले." काव्याने रितेशला हलवत विचारले.
"गेलेसुद्धा? मला काहीच बोलले नाही." रितेश म्हणाला.
"तू तुझ्या विचारात गुंतला होतास ना. चल घरी जाऊ." दोघे घरी आले. काव्या घराकडे बघत होती. हेच ते घर होते ज्याने त्यांना कठीण वेळेत आसरा दिला होता. हे घर सोडून जायचा हा विचार तिला विचित्र वाटत होता. काव्या साडी बदलून आली. रितेश अजूनही विचारात होता.
"कसला एवढा विचार चालला आहे?" त्याच्या शेजारी बसत काव्याने विचारले.
"तुला काय वाटतं? आपण जाऊयात आपल्या घरी परत?" रितेशने काव्याला विचारले.
"तुला हवं तर जाऊया.." काव्या म्हणाली.
"मला हवं आहे असं नाही गं.. पण आता आपल्याला आपल्या कुटुंबाचा विचार करावा लागेलच ना.." सूचकपणे रितेश म्हणाला. ते ऐकून काव्या लाजली. रितेशचं तिच्याकडे लक्ष नव्हतं.
"मी तर म्हणतो की आता माझं सगळं छान सुरू आहे तर तू कशाला त्रास करून घेतेस? तू नोकरी सोडलीस तरी चालेल."
"नोकरी सोडणार नाही. पण... " काव्या बोलता बोलता थांबली.
"पण काय?"
"बहुतेक तू बाबा होणार आहेस.." काव्या लाजेने चूर झाली होती.
"खरं.. मी लगेच आईबाबांना सांगतो." रितेश उठला.
"अजिबात नाही.." काव्या रितेशला थांबवत म्हणाली.
"म्हणजे??" रितेशच्या कपाळावर आठी आली.
"तीन महिने होईपर्यंत कोणालाच सांगायचे नसते. आणि तसाही हा माझा अंदाज आहे. एकदा चेक करून घेऊ. मग सांगू."
"काव्या, आज खरंच माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे. आज माझं स्वतःचं हॉटेल सुरू झालं, आणि तू ही छानशी बातमी दिलीस.. मला ना काय करू आणि काय नको, असं झालं आहे." रितेश आनंदाने म्हणाला.
"काही नको.. फक्त माझ्याकडे लक्ष दे म्हणजे झालं." काव्याचं बोलणं ऐकून रितेश चमकला.
"ऐक ना.. मी ते उद्घाटन आईबाबांना करायला सांगितले म्हणून तुला राग नाही ना आला? मला ना त्यांना बघून एवढं भरून आलं ना.. की मी बोलून गेलो." रितेश अपराधीपणे म्हणाला.
"एवढं काय त्यात? मी तुला म्हटलं ना की माझ्यासाठी तू माझ्यासोबत असणं जास्त महत्त्वाचं आहे. बाकी सगळं ठीक आहे."
"ठरलं तर मग.. आपण आपल्या जुन्या घरी रहायला जायचं." रितेश उत्साहाने म्हणाला.
"आपण तिथे जाऊयातच.. पण मला ना हे घरही ठेवावेसे वाटते आहे. आपण हे घर विकतच घेतले तर.." काव्या म्हणाली.
"काव्या.. आत्ताच हॉटेलमध्ये मी पैसा घुसवला आहे. त्यात परत या घरामध्ये, कसं जमेल मला?" त्याचं उत्तर ऐकून काव्याचा चेहरा उतरला.
"ए बाई.. असं तोंड पाडून नको बसू. नाहीतर माझं होणारं बाळही रडकंच होईल. तू म्हणतेस तर बघतो काही जुगाड करता येतो का या घराचा.." रितेश काव्याची समजूत काढत म्हणाला.
"खरंच??" काव्याने विचारले.
"एवढाही विश्वास नाही माझ्यावर?"
"विश्वास आहेच.. मी एक काम करते.. मी कर्ज घेते आणि माझ्या पगारातून याचे हप्ते फेडते."
"बघू पुढे.. पण आता आपण तिथे परत जायचे हे मात्र नक्की.."
आपलं राहतं घर काव्याने घरमालकाला लाडीगोडी लावून विकत घेतलं. ते हॉटेलपासून जवळ असल्याने सध्यातरी त्याचा उपयोग अडीअडचणीसाठी करायचं ठरत होतं. त्याहीपेक्षा काव्याला स्वतःचं असं घर हवं होतं. म्हणूनच तिने आत्ता ते घर विकत घ्यायचं ठरवलं होतं. काव्या आणि रितेश जुन्या घरी परत गेले. त्यांचा संसार तिथे होईल का सुखाचा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा