अगर तुम साथ हो.. भाग १६
मागील भागात आपण पाहिले की रितेश आणि काव्याला दोन मुले आहेत. रितेश त्याचा हॉटेलचा व्यवसाय पार साता समुद्रापार नेतो आहे. आता बघू पुढे काय होते ते.
"काव्या..." गौरीने काव्याला फोन केला होता.
"तू अजिबात बोलू नकोस माझ्याशी. तुला मिळतील हो पेढे घरपोच." गौरी काय बोलते आहे हे न ऐकताच काव्याने बोलायला सुरुवात केली.
"कसले पेढे?"
"तुला रिशानच्या बारावीचे पेढेच हवे आहेत ना? म्हणूनच फोन केलास ना? आजकाल तू कुठे भेटतेस? पार्थभाऊजी तर गायबच झाले आहेत."
"ए सुपरफास्ट ट्रेन जरा थांब ना. मला काय म्हणायचे आहे ते तरी ऐक. आणि मग बोल." तिथून गौरी म्हणाली.
"सॉरी गं.. तुझा फोन आला आणि खूप काय काय बोलावंसं वाटलं. सध्या ना असं झालं आहे की रितेश त्याच्या बिझनेसमध्ये, मुलं त्यांच्या अभ्यासात आणि आईबाबांशी बोलणं म्हणजे.." बोलता बोलता काव्या थांबली. गौरी तिचं बोलणं शांतपणे ऐकत होती.
"मला ना असं वाटतं की नोकरी सोडून मी खूप मोठी चूक केली. घराला, मुलांना गरज आहे म्हणून घरी बसले. आणि आता सगळ्यांची गरज संपली आहे तर एकटं पडल्यासारखं वाटतं आहे." काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. "कोणीच नसतं बोलायला. मैत्रिण म्हणावं अशी तूच आहेस बघ.. म्हणून तर बोलत सुटले." काव्या स्वतःला सावरत म्हणाली.
"तूच तुझं जग बंदिस्त करून घेतलं आहेस. कुठे जाणंयेणं नाही, काही नाही. त्या इतर बिझनेसमनच्या बायका बघ कश्या मिरवतात.. आणि तू? घर एके घर.. आणि मुलं एके मुलं.. आणि तुझा नवरा."
गौरी रागात बोलत होती.
गौरी रागात बोलत होती.
"काय झालं रितेशला?"
"काव्या, राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू?" गौरीने अडखळत विचारले.
"तुला परवानगी लागते का? काही घाबरण्यासारखे आहे का?"
"तुझं आणि रितेशचं काही भांडण झालं आहे का? किंवा तुमचं पटत नाही का?" गौरी विचारत होती.
"छे गं.. असं काहीच नाही.. उलट आज सकाळीच." बोलता बोलता काव्या लाजली. रितेशचा शरीरगंध आठवून तिच्या अंगावर रोमांच उठले. पण त्यानंतर ज्या पद्धतीने तो दूर गेला हे आठवूनही तिला कसेतरीच वाटले.
"काय झालं सकाळी?" गौरीचा आवाज रुक्ष वाटत होता.
"अगं सकाळीच त्याने मला सांगितलं की परदेशातही नवीन शाखा उघडणार आहे म्हणून." काव्याच्या आवाजातला उत्साह मावळला होता.
"हो?? मग तू आजकाल त्याच्यासोबत कुठेच का दिसत नाहीस?"
"ते..." काव्याकडे त्याचे उत्तर नव्हते. तिने स्वतःशीच आठवायचा प्रयत्न केला. स्मिताताई आणि माधवराव एकाजागी बसल्यापासून तिचे बाहेर येणेजाणे कमीच झाले होते. जास्तीत जास्त ती आईकडे जाऊन यायची.. बस्स.
"काव्या, चिडू नकोस.. खरंतर ही बातमी तुला सांगताना मला आनंद होत नाहीये. पण मी तुझी मैत्रिण आहे. तुझ्यापासून मी हे नाही लपवू शकत."
"गौरी.. पटापट बोल जे बोलायचं आहे ते." काव्याच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते.
"काव्या, रितेशचे बहुतेक अफेअर चालू आहे." गौरी बोलून मोकळी झाली. पण काव्याचे जग पूर्ण बदलले.
"गौरी...."
"काव्या, सावर स्वतःला.. मला माहित आहे, हा खूप मोठा धक्का आहे तुझ्यासाठी. पण त्याला त्या मुलीच्या गळ्यात गळे घालून बघितल्यावर तुला सांगितल्यावाचून राहवेना." गौरी अपराधीपणे बोलत होती.
"कधी बघितलंस त्याला?" काव्याच्या आवाजात जीव नव्हता.
"काल संध्याकाळी.. मी माझ्या शाळेतल्या मैत्रिणींसोबत डिनरला गेले होते. तिथे ते दोघे होते."
"काल??? काल तर आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस.... गौरी नक्की तोच होता का? तुला भास झाला असेल." काव्याच्या मनात आशा निर्माण झाली.
"काव्या, आपण गेले पंधरा वर्ष एकमेकांना ओळखतो. तुला काय म्हणायचे आहे, मी रितेशचा आवाज ओळखत नाही? खरंतर त्याचा आवाज तिथे ऐकून मी शॉक झाले. मग त्याला मी निरखून बघितलं. त्याचं बहुतेक माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी ही त्याला दिसणार नाही अशी बसले. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी आधी पार्थला विचारले. त्याने कबुली दिल्यानंतरच मी तुला फोन करायची हिंमत केली."
"भाऊजींना हे माहित आहे?"
"हो.."
"म्हणून ते आजकाल माझ्यासमोर येत नाहीत?"
"असेल कदाचित.."
"गौरी.. हे किती दिवस, महिने, वर्ष चालू आहे, काही कल्पना?"
"बहुतेक गेली दोन वर्ष.."
"आणि ती कोण आहे?"
"बहुतेक बिझनेसमध्ये झालेली ओळख."
"गौरी.. तुझे आभार कसे मानू मला हेच समजत नाहीये.. एवढं सगळं केलंस. अजून एक गोष्ट करशील?"
"विचारावं लागतं?" गौरीचा आवाज भरून आला.
"तसं नाही गं.. आपला म्हणत असलेला नवराच जेव्हा आपला रहात नाही तेव्हा उगाचच सगळ्यांवरच शंका येऊ लागते." काव्याच्या आवाजातला थंडपणा आता गौरीला टोचू लागला.
"सांग ना.."
"रितेश तिच्यासोबत कधीकधी असतो हे पार्थभाऊजींना माहिती असेल तर मला सांगशील?"
"हो.. काव्या तू काही.." गौरी बोलता बोलता थबकली.
"नाही गं.. मला ती परवानगी नाही. माझ्या मुलाचा बारावीचा रिझल्ट लागेल कधीही. त्याला शिक्षणासाठी बाहेरगावी जायचे आहे, माझी लेक शिकते आहे. माझा संसार..." काव्या खिन्नपणे हसली. तिचं ते हसणं गौरीला ऐकवलं नाही.
"मी तिथे येते काव्या.."
"अगं काहीच गरज नाहीये.. मी ओके आहे. आणि आता पियुची शाळेतून यायची वेळ झाली असेल ना? काळजी घे. नंतर बोलू." काव्याने फोन ठेवला. ती वळली. समोर स्मिताताई उभ्या होत्या.
"ऐकतेस का? यांना ना जरा सूप हवं होतं. ते काही त्या बाईच्या हातचं पिणार नाहीत. तेवढं करून देतेस का?"
"देते..." काव्या यांत्रिकपणे स्वयंपाकघरात गेली. तिने सूप बनवून स्मिताताईंच्या हातात दिले. काहीच न बोलता ती आपल्या खोलीत गेली. दरवाजा आतून बंद केला.. आणि कोणाला ऐकवणार नाही असा तिने हंबरडा फोडला.
काय करेल काव्या आता? मुलांसाठी आणि घरासाठी रितेशसोबत संसार करेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा