अघटीत... भाग १

बंगल्याच्या पांढऱ्या शुभ्र मार्बलच्या चार पाच पायऱ्या चढून गेल्यावर वर मोठ्ठा वऱ्हांडा होता. त्याच्या उजव्या बाजूला घराचा मुख्य दरवाजा आणि डाव्याबाजूला टांगलेली लाकडाची जुनी बंगई होती. जी पिढ्यान् पिढ्यांची साक्षीदार होती.
गाडीचा हॉर्न वाजवला तसे नक्षीदार, जाड लोखंडी, दणकट असे बंद असलेले गेट उघडले गेले. सिक्युरिटीने गेट उघडताच आत जाणाऱ्या पांढऱ्या बी एम डब्लू गाडीला सलाम ठोकला. गाडीत बसलेल्या व्यक्तीने तितक्याच आदराने हात हलवत गाडी गेटमधून आत घेतली. साधारण अर्धा किलोमीटर आत जाणारा रस्ता त्याच्या दुतर्फा लावलेली निरनिराळी झाडं, त्यावर आलेला फुलांचा बहर, आणि त्या झाडांची रस्त्यावर पडणारी सावली. त्यात दाटून आलेले मेघ आणि हवेत पसरलेला गारवा बघत तो गाडी चालवत होता. तो रस्ता त्याला नेहमीच मोहित करत असे. खास करून पावसाळ्याच्या दिवसात. बंगल्याच्या आवारातून तो नेहमीच हळूहळू गाडी चालवत असे, पण आज मात्र त्याच्या गाडीचा वेग जास्त होता. त्याला मोहित करणारा तो रस्ता आज त्याला दूरचा वाटत होता. बंगल्याच्या मुख्य दारासमोर गाडी थांबली तसा तो गाडीतून उतरला. एक नोकर पळतच त्याच्या दिमतीला हजर झाला. त्याने गाडी पार्क करण्याची सूचना दिली आणि तो नोकर गाडी घेऊन गेला. तो मात्र तिथेच उभा होता.


बंगल्याच्या पांढऱ्या शुभ्र मार्बलच्या चार पाच पायऱ्या चढून गेल्यावर वर मोठ्ठा वऱ्हांडा होता. त्याच्या उजव्या बाजूला घराचा मुख्य दरवाजा आणि डाव्याबाजूला टांगलेली लाकडाची जुनी बंगई होती. जी पिढ्यान् पिढ्यांची साक्षीदार होती.


तो त्या बंगईच्या समोर उभा राहिला. संथ लईत हलणारी ती बंगई आणि त्यावर बसलेले उंचपुरे, पिळदार शरीरयष्टीचे, मिशा तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विशेष भाग ज्यावर त्यांना म्हणजे चंद्रकांत पाटील ह्यांना नाज होता. असे साठीतील पण रुबाबदार चंद्रकांत पाटील अंगात सदरा आणि कडक इस्त्री केलेले पांढरे शुभ्र धोतर, डोक्यावर तसाच ताठ आणि पांढराशुभ्र फेटा घालून बसलेले, तो बघत होता आणि नळकत त्याच्या डोळ्यांत चमक आली, ओठांवर हसू आले.


“श्रीवर्धन, आलात तुम्ही?” मागून आवाज आला. तसे श्रीवर्धनने वळून बघितले.

“आईसाहेब.” श्रीवर्धन बोलला आणि परत बंगईकडे बघितले. पण तिथे कोणीच नव्हते, न बंगई हलत होती.


“तुमचे बाबासाहेब आत आहेत.” इंदुमती बंगईकडे बघणाऱ्या श्रीवर्धनला बोलल्या.

पडलेल्या चेहेऱ्याने श्रीवर्धनने परत त्याच्या आईकडे बघितले.
लहानपणापासून ते आजपर्यंत त्याने कधीच ती बंगई अशी रिकामी बघितली नव्हती. चंद्रकांत म्हणजे त्याचे वडील त्या बंगई वर बसलेले असतं. विशेषकरून जेव्हा श्रीवर्धन परदेशातून घरी येत तेव्हा त्याची वाट बघत ते तिथेच बसलेले असायचे. त्यावर बसूनच त्यांनी सगळे निर्णय घेतले होते मग ते घरातील असो किंवा व्यवहाराचे असो. ते स्थान म्हणजे त्यांचा दरबार होता जणू. त्या बंगईची शोभा तेव्हाच वाटायची जेव्हा त्याचे वडील त्यावर बसलेले असायचे. पण आज मात्र इतक्या वर्षात असे पहिल्याच वेळी झाले होते की बंगई खाली होती.


“श्रीवर्धन आम्हाला नाही भेटणार?” इंदुमती बोलली.


“आईसाहेब असे नाही. पण बाबासाहेबांविना ह्या बंगईला शोभा नाही.” म्हणत त्याने इंदुमातींचा आशीर्वाद घेतला.


“अगदी खरे. या आत. आम्हास ठाऊक आहे तुमच्या मनात काय सुरु आहे ते. पण आता तुम्ही आला आहात तर सगळे नीट होईल.” इंदुमती श्रीवर्धनच्या पाठीवरून हात फिरवत बोलल्या.
चंद्रकांत पाटलांची बायको म्हणून तितक्यात रुबाबाने आणि खंबीरपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून इंदुमतींनी संसाराचा डोलारा उभारला होता. घरातील शिस्त, मुलांवर केले संस्कार आणि तितक्याच ताकदीने निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या इंदुमती वरून जरी खंबीर दिसत होत्या तरी आतून मात्र त्या कमकुवत बनत चालल्या होत्या.

दोघांनी घरात प्रवेश केला आणि श्रीवर्धनच्या पावलांनी चंद्रकांतच्या खोलीची वाट धरली. सोबत इंदुमतीही होत्या.
श्रीवर्धनने खोलीचे दार उघडले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. चंद्रकांत भर दिवसा खोलीचे पडदे लावून बसलेले होते. खोलीत सूर्यप्रकाशाचा एक किरण देखील येत नव्हता. चंद्रकांत त्यांच्या पलंगावर भिंतीला टेकून बसले होते. श्रीवर्धनने आधी खोलीचे पडदे उघडले.


“बंद कर ते. कर बंद. नको तो प्रकाश. खाऊन टाकेल तो मला. बंद कर.” चंद्रकांत जोरात ओरडले.


“बाबासाहेब, शांत व्हा. मी आहे तुमचा श्री. इकडे बघा. माझ्याकडे.” श्रीवर्धन पळत त्यांच्याकडे गेला आणि त्यांचा हात धरून बोलला.

“आधी ते पडदे बंद कर. बंद कर सांगतोय ना.” चंद्रकांत परत ओरडले.


त्यांची अस्वस्थता बघून श्रीवर्धन पडदे बंद करायला उठणार तितक्यात इंदुमतींनी पडदे बंद केले आणि खोलीतील एक मंद प्रकाशाचा दिवा लावला. तसे चंद्रकांत शांत झाले.


“श्री आलात तुम्ही. बरे झाले आता मी जायला मोकळा.” चंद्रकांत श्रीवर्धनचा चेहरा कुरुवळत बोलले.


“बाबासाहेब हे काय बोलत आहात तुम्ही?”


“जा जेवण करा. आराम करा थकून आलात तुम्ही. जाताना तो दिवा बंद करा इथे कोणताच प्रकाश नको आहे मला.” म्हणत चंद्रकांत त्यांच्या पलंगावर कुस वळवून झोपले.


श्रीवर्धन तिथेच बसून होता. ह्या आशेवर की, त्याचे बाबासाहेब अजून काही बोलतील.

“श्रीवर्धन चला. आता नाही बोलणार ते.” इंदुमती बोलल्या.


दोघे खोलीतून बाहेर आले. येताना दिवा बंद केला.

इतक्यावेळ रोखून ठेवलेले अश्रू खोलीचे दार बंद करताच श्रीवर्धनच्या डोळ्यांतून ओघळले.


“आईसाहेब हे काय आहे सगळे? बाबासाहेब असे कसे वागत आहेत? तो रुबाब कुठे गेला ज्याला आम्ही आता पर्यंत बघत आलो आहोत? आणि तुम्ही आधी का नाही सांगितले आम्हाला ? की बाबासाहेबांची तब्बेत इतकी खराब आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज गायब झाले आहे. किती बारीक झाले आहेत ते. आईसाहेब उत्तर द्या.” श्रीवर्धन डोळे पुसत बोलला.


“श्रीवर्धन तुमचे हे शेवटचे वर्ष होते अभ्यासाचे त्यात व्यत्यय नको म्हणून आम्ही काही सांगितले नाही. नऊ महिन्या आधीच तर तुम्हाला त्या घटनेसाठी यावे लागले होते आणि आता गेल्या सहा महिन्यात होत्याचे नव्हते झाले.” इंदुमती गंभीर झाल्या.


“ती घटना तर अजूनही झोपू देत नाही आईसाहेब. तुम्ही आणि बाबासाहेब तेव्हा कसे कणखर राहिलात ह्याचे नवल वाटते मला पण, आईसाहेब असे काय घडले गेल्या सहा महिन्यात की, बाबासाहेबांची ही अवस्था झाली?” श्रीवर्धनचा जीव कासावीस झाला.

इंदुमतीच्या डोळ्यात आभाळ दाटून आले, तरी देखील त्यांनी ते रोखून धरले.


क्रमशः

काय झाले असेल चंद्रकांत ह्यांना? श्रीवर्धन नऊ महिने आधी का आला असेल? कोणत्या घटने बद्दल दोघे बोलत आहेत? येणाऱ्या भागांत कळेलच.


©वर्षाराज


🎭 Series Post

View all