मागील भागात आपण बघितले..
“ती घटना तर अजूनही झोपू देत नाही आईसाहेब. तुम्ही आणि बाबासाहेब तेव्हा कसे कणखर राहिलात ह्याचे नवल वाटते मला, पण आईसाहेब असे काय घडले गेल्या सहा महिन्यात की बाबासाहेबांची ही अवस्था झाली?” श्रीवर्धनचा जीव कासावीस झाला.
इंदुमतींच्या डोळ्यात आभाळ दाटून आले, तरी देखील त्यांनी ते रोखून धरले.
आता पुढे..
निशब्द होऊन इंदुमती उभ्या होत्या. मनात वादळ उठत होते. पण त्यापेक्षा घरात उठणाऱ्या वादळाला रोखणे जास्त कठीण होते आणि त्यासाठी खंबीर उभे राहणे फार गरजेचे होते. डोक्यात विचारांचे थैमान सुरू होते.
“आईसाहेब सांगा ना!” इंदुमतीकडून काहीच उत्तर न मिळाल्याने श्रीवर्धनने पुन्हा विचारणा केली.
“श्रीवर्धन तुम्ही प्रवासातून थकून आला आहात. तेव्हा आधी फ्रेश व्हा आणि आराम करा. मग बोलू निवांत आपण.” इंदुमती बोलून निघून गेल्या.
आपली आई आता काहीच बोलणार नाही हे श्रीवर्धनला चांगलेच ठाऊक होते. म्हणून हट्ट न करता तो देखील त्याच्या खोलीत निघून गेला. नेहमीसारखीच ह्यावेळी देखील त्याची खोली नीटनेटकी आवरून ठेवलेली होती. त्याचे सामान त्याच्या खोलीत आणून ठेवण्यात आले होते.
श्रीवर्धनची खोली बंगल्याच्या वरच्या मजल्यावर होती. श्रीवर्धन रूमच्या बाल्कनीत गेला जिच्या बाजूला घरातील सर्वात सुंदर खोलीची बाल्कनी होती, ती खोली होती राजेश्वरीची म्हणजे त्याच्या मोठ्या बहिणीची.
तो तडक त्या दिशेने गेला खोलीचे दार उघडले आणि आत प्रवेश केला.
“ताईसाहेबऽऽ
ताईसाहेब ऽऽ
दीदी, दीदीऽऽ कुठे आहात? घा मी आलो आहे. तुमचा वर्धन.”
ताईसाहेब ऽऽ
दीदी, दीदीऽऽ कुठे आहात? घा मी आलो आहे. तुमचा वर्धन.”
त्याच्या हाकेला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याची नजर खोलीत सर्वत्र सैरभैर फिरत होती, पण त्याची ताईसाहेब कुठेच नव्हती. होती ती फक्त शांतता. जीवघेणी शांतता. मनाच्या कोपऱ्यात खोलवर काहीतरी रुतत होते. मन आक्रोश करत होते. डोळ्यातून वाहणारे पाणी जणू त्सुनामी वाटत होते.
“श्रीवर्धन, त्या इथे नाहीत ठाऊक आहे ना तुम्हाला? मग का असा रुदन?” इंदुमती खांद्यावर हात ठेवत बोलल्या.
“आईसाहेब, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. हे सगळे सहन होत नाही आता मला. काहीच कळत नाहीये काय सुरू आहे ते? सगळे सुरळीत असताना असे काय घडले? तुम्ही आम्हाला कसलीच कल्पना दिली नाही. हे सगळे खूपच धक्कादायक आहे आमच्यासाठी.” केविलवाण्या नजरेने श्रीवर्धन बोलला.
“ठीक आहे. या माझ्या सोबत.” दोघे श्रीवर्धनच्या खोलीत गेले.
“तुम्ही इथेच थांबा. आलेच मी.”
काहीवेळात इंदुमती परत आल्या. पण तो एक एक क्षण श्रीवर्धनसाठी कठीण होता. त्यांच्या हातात काहीतरी होते जे त्यांनी पदराखाली लपवून ठेवले होते.
“श्रीवर्धन आता मी जे काही सांगणार आहे ते अतिशय लक्ष देऊन ऐका. त्याचबरोबर मनावर आणि डोक्यावर ताबा ठेवा. तुम्हाला फार लवकर राग येतो आणि त्याचे परिणाम वाईट होतात. आपल्याला विचारपूर्वक पावलं टाकायची आहेत. तुमच्या साथीची फार गरज आहे आम्हाला. त्यामुळे मला आधी वचन द्या की, तुम्ही शांत रहाल.” इंदुमतींनी हात पुढे केला.
“आईसाहेब मी वचन देतो.” श्रीवर्धनने इंदुमतीच्या हातावर हात ठेवत वचन दिले.
“तर मग ऐका, साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तुम्हाला अमेरिकेत शिक्षणासाठी जाऊन एक वर्षाचं झाले असेल. मी आणि तुमचे बाबासाहेब, ते ललित देशमुख आहेत ना त्यांच्या मुलीच्या लग्नाला म्हणून गेलो होतो.” भूतकाळातील घटना इंदुमतींच्या डोळ्यांसमोर येत होत्या.
“सरकार तुम्हाला काही हवे आहे का? वीर इथे ये. हे आपले खास पाहुणे आहेत ह्यांची जबाबदारी तुझी. ते इथे आहेत तोपर्यंत तू त्यांच्यासोबत सावली सारखं राहून ह्यांना काय हवे नको ते बघ.
सरकार, हा वीर माझ्या बहिणीचा मुलगा. कॅनडामध्ये असतो. गेल्यावर्षी बहीण आणि पाहुणे एका कार अपघातात गेले, त्यामुळे हा तिथे एकटा पडला होता. म्हणून त्याला मीच इथे बोलावून घेतले. आता इथेच राहील माझ्यासोबत आणि आमचा कारभार सांभाळायला मदत करेल.” देशमुखांनी त्याची ओळख करून दिली.
“नमस्कार सरकार. मामा तुम्ही काळजी करू नका. पाहुण्यांची जबाबदारी आता माझी. त्यांना काहीच अडचण येणार नाही. निश्चिंत रहा.” वीर लगेच पाया पडला आणि अतिशय अदबीने बोलला. त्यानंतर देशमुख तिथून निघून गेले.
“तुम्हाला सांगते श्रीवर्धन, त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. बोलताना चेहेऱ्यावर फुललेले स्मित, त्यातून दिसणारी पांढरीशुभ्र दंतपंक्ती आणि गालांवर पडणारी खळी. त्यांच्याकडे आम्हाला आकर्षित करत होती.” इंदुमती बोलताना परत भूतकाळात हरवल्या.
“तुम्हाला मी काका-काकू म्हणालो तर चालेल का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर. सरकार म्हणजे त्यात आपुलकीची भावना कमी वाटते. पण काका-काकू म्हटलं म्हणजे प्रेम जाणवतं. मला माहित आहे तुम्ही दोघेही अगदी कडक शिस्तीचे आहात. मामांनी तुमच्या बद्दल बरच काही सांगितले आहे. पण खरं सांगू तुम्हाला बघून असे वाटलेच नाही, की आपण पहील्यावेळेस भेटत आहोत. असं वाटतं की, आपले काही ऋणानुबंध आहेत. माझी आई अगदी तुमच्यासारखी होती दिसायला.” वीर अगदी निरागसपणे बोलला.
“हो नक्कीच. तुम्हाला आवडेल ते म्हणा. ‘ मी सहज बोलून गेले.’ आणि तुमच्या बाबासाहेबांनी देखील ह्यावर काही आपत्ती दर्शवली नाही. त्याच्या गोड बोलण्याच्या आणि हसण्याच्या जणू प्रेमात पडलो होतो आम्ही. त्या दोनच दिवसात तो अगदी आमच्या जवळचा झाला. आमच्या आवडी-निवडी, सगळं अगदी आपुलकीने तो जपत होता. त्यात त्याचं वागणं, बोलणं, दिसणं सगळंच अगदी परफेक्ट होतं.
आम्ही लग्नावरून परत आलो पण त्याच्याशी जोडले गेलेले ते क्षण कायम मनात रुजले होते.
आम्ही लग्नावरून परत आलो पण त्याच्याशी जोडले गेलेले ते क्षण कायम मनात रुजले होते.
कोणाच्याही बोलण्याला न भुलणारे तुमचे बाबासाहेब देखील त्याची स्तुती करून थकत नव्हते. त्यांना असे कोणाबद्दल दिलखुलास बोलताना मी प्रथमच बघत होते.” इंदुमती सांगत होत्या.
“आम्ही तिथून येताना आवर्जून त्याचा फोन नंबर घेऊन आलो. मग काय. तुम्ही नव्हते तर तुमची कमी त्याच्या रुपात भरून निघत होती. त्याच्यात आम्ही तुम्हाला बघत होतो. फोनवर बोलणं तर रोजच्या दैनंदिनीचा भाग झाला होता.”
“पुढे काय झालं?” श्रीवर्धन बोलला.
“माझ्या आणि तुमच्या बाबासाहेबांच्या मनात एकाच वेळी सारखाच विचार आला.”
इंदुमती कासावीस झाल्या.
क्रमशः
कोण असेल हा वीर? राजेश्वरी घरी नाही तर कुठे होती? काय विचार आला असेल इंदुमती आणि चंद्रकांतच्या मनात?
पुढील भागांत कळेलच.
© वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा