मागील भागात आपण बघितले…
“पुढे काय झालं?” श्रीवर्धन बोलला.
“माझ्या आणि तुमच्या बाबासाहेबांच्या मनात एकच वेळी सारखाच विचार आला.” इंदुमती कासावीस झाली.
आता पुढे…
“पुढचा मागचा कसलाही विचार न करता आम्ही सरळ देशमुखांना मनातील गोष्ट सांगितली. वीरबद्दल सगळं माहित होतं, त्यात देशमुख आपल्या अगदी जवळचे आणि त्यांचा तो भाचा म्हणजे शंकेला काही वावच नव्हता.” इंदुमतींच्या चेहेऱ्यावर खिन्न हास्य होते.
“पण त्यांचा आणि बाबासाहेबांच्या ह्या अवस्थेचा काय संबंध?” काहीच लक्षात न आल्याने श्रीवर्धन बोलला.
“संबंध? खूप मोठा संबंध आहे श्रीवर्धन. आम्हा दोघांचा एक निर्णय आपल्या सगळ्यांचे आयुष्य बदलवून टाकणारा ठरेल हे माहीतच नव्हते आम्हाला.”
“पुढे काय झाले आईसाहेब?”
“आमची इच्छा आम्ही राजेश्वरी ह्यांना पण सांगितली. पण त्यांचा ह्या नात्याला नकार होता. त्यांची अजिबात इच्छा नव्हती वीरशी लग्न करण्याची. आयुष्यात पहिल्या वेळेस त्यांनी आम्हाला काही मागितले होते आणि आम्ही त्याला देखील नकार दिला.” इंदुमतीने दीर्घ श्वास घेतला. डोळ्यांत साचलेले पाणी तिथेच रोखले.
“काय मागितले होते ताईसाहेबांनी? बोला आईसाहेब.”
“त्यांच्या आयुष्यात एक मुलगा होता. अतुल त्यांच्याच कॉलेजमध्ये होता. त्याच्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. त्याचेदेखील खूप प्रेम होते राजेश्वरीवर. शिवाय नुकतेच शिक्षण पूर्ण करून नोकरी देखील करत होता.”
“ओह येस. अतुल मी ओळखतो त्याला. ताईसाहेबांच्या कॉलेजला गेलो होतो एकदा तेव्हा त्यांनी त्याची ओळख करून दिली होती. आम्हाला तेव्हाच तो खूप आवडला होता. साधा, सरळ, दिसायला देखील छान होता.” श्रीवर्धन आठवून बोलला.
“पण आम्ही त्यांना नकार दिला. राजेश्वरींनी आम्हाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. एकदा अतुलला भेटा म्हणून विनवण्या केल्या.”
“मग?”
“आमच्या डोळ्यांवर वीर नावाची पाटी होती. त्यामुळे एकदा देखील अतुलला भेटण्यास आम्ही नकार दिला
आणि वीरशी लग्नाचा आदेश देऊन आम्ही राजेश्वरींना गप्प बसवले. त्या देखील त्यांचे आमच्यावर असलेल्या प्रेमाखातर आणि आपल्या घराण्याच्या संस्कारांना जपत लग्नाला इच्छा नसतांना देखील तयार झाल्या.” इंदुमती भिंतीवर लटकलेल्या श्रीवर्धन आणि राजेश्वरीच्या फोटोकडे बघत होत्या.
“तुम्हाला माहित आहे. तुमच्या बाबासाहेबांनी आजवर कित्येक निर्णय घेतले, मग ते व्यवसायातील असो, पंचायतीचे असो वा अजून काही. माणसांना ओळखण्यात तर ते कधीच चुकले नाहीत. सगळं गाव तुमच्या बाबासाहेबांना किती मानतं. त्यांच्या निर्णयावर डोळे झाकून विश्वास ठेवतात लोकं. एक मानाचे स्थान आहे त्यांचे गावात. कित्येक लग्न जुळवली त्यांनी. मग आपल्या मुलीसाठी घेतलेला निर्णय चुकीचा होऊच शकत नाही ह्याची खात्री आम्हा दोघांनादेखील होती.
तुम्हाला सांगते श्रीवर्धन कधी कधी असे वाटते की, भूतकाळात जाऊन चुका दुरुस्त करणे शक्य असते तर किती बरे झाले असते. आम्ही देखील आमची चूक दुरुस्त केली असती किंवा त्यावेळी तुमच्या ताईसाहेबांचे ऐकून अतुलला भेटलो असतो तर कदाचित राजेश्वरी आज आपल्या सोबत असत्या. अघटीत घडण्यापसून आपण वाचलो असतो. पण नियतीच्या मनात काही औरच होते. विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात ते काही खोटे नाही. आम्ही ही म्हण आज तगायत फक्त ऐकून होतो. पण आता त्याचा प्रत्यय आम्हाला आला. त्याची किंमत ही आम्हाला मोजावी लागली. तीही इतकी महाग की, आयुष्यभर त्याची भरपाई होऊ शकणार नाही.” इतक्यावेळ रोखून ठेवलेला बांध आता मात्र तुटला आणि पाण्याने त्याचा मार्ग मोकळा करून घेतला.
“आईसाहेब रडू नका. वीर म्हणजे रावसाहेब चांगलेच आहेत. तुम्ही चुकला नाहीत. जे झालं तो एक अपघात होता. त्यात तुमची किंवा कोणाचीच काहीच चूक नाही. त्या घटनेने आयुष्यात पोकळी निर्माण केली हे खरं आहे. पण आईसाहेब एक सांगू? एक मात्र खरे आहे की, तुम्ही अतुलला भेटायला हवे होते. तुम्हाला ते नक्कीच आवडले असते. एक संधी द्यायला हवी होती तुम्ही त्यांना.”
“नाही श्रीवर्धन. चूक तर झाली आहे. एक नाही तर दोन चुका झाल्या आहेत. तुम्ही देखील वीरला ओळखण्यात चुकलात जसे आम्ही चुकलो. पण एक मात्र खरे आहे. अतुलला भेटलो असतो तर वीर नावाचे भूत आमच्या डोक्यातून नक्कीच उतरले असते. ह्याची जाणीव आम्हाला खूप उशिरा झाली.” इंदुमती हताश होत बोलल्या.
“म्हणजे मी समजलो नाही.” असंख्य प्रश्नांनी घेरलेल्या मनः स्थितीत श्रीवर्धन बोलला.
“आम्ही त्यांना भेटलो.” इंदुमती बोलल्या.
“काय? कधी? कशा? आणि रावसाहेबांना ओळखण्यात चुकलो म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला?” श्रीवर्धन आश्चर्यचकित होत बोलला.
“श्रीवर्धन इथे बसा अगदी शांतपणे. मी आता जे सांगणार आहे ते तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक असणार आहे.” इंदुमतींनी श्रीवर्धनचा हात हातात घेत त्याला बाजूच्या पलंगावर बसवत बोलल्या.
“आईसाहेब. जे काही आहे ते लवकर सांगा.” श्रीवर्धन काळजीच्या स्वरात बोलला.
“श्रीवर्धन नऊ महिन्यापूर्वी घडलेली ती घटना..” इंदुमती पुढे बोलणार तितक्यात श्रीवर्धन बोलू लागला.
“आईसाहेब ती घटना काही केल्या आपण विसरू शकत नाही. आजही कधी पहाटेच्या सुमारास माझ्या फोनची घंटी वाजली ना की माझ्या काळजाचा ठोका चुकतो. हातापायातील त्राण निघून जाते. डोळ्यांसमोर अंधारी येते. डोकं काम करत नाही.” श्रीवर्धनच्या हृदयाचे ठोके वाढले होते.
“होय श्रीवर्धन. आम्हाला देखील असेच होते. असे वाटते की महिन्याची दहा तारीख कधी येऊच नये.” इंदुमतींनी डोळे बंद केले.
“आईसाहेब, तुम्ही काय सांगत होतात?” श्रीवर्धन डोळे पुसत बोलला.
क्रमशः
काय झाले असेल महिन्याच्या दहा तारखेला? वीरला ओळखण्यात इंदुमती आणि चंद्रकांत कसे चुकले? काय सांगायचे असेल इंदुमतींना? कळेलच पुढील भागात.
© वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा