मागील भागात आपण बघितले…
“होय श्रीवर्धन. आम्हाला देखील असेच होते. असे वाटते की महिन्याची दहा तारीख कधी येऊच नये.” इंदुमतींनी डोळे बंद केले.
“आईसाहेब, तुम्ही काय सांगत हातात?” श्रीवर्धन डोळे पुसत बोलला.
आता पुढे…
इंदुमतींनी डोळे पुसले आणि श्रीवर्धनचे दोन्ही हात हातात घट्ट पकडले.
“श्रीवर्धन नऊ महिन्यांपूर्वी तुमच्या ताईसाहेब ज्या अपघातात गेल्या. तो जाणीवपूर्वक घडवून आणलेला अपघात होता. म्हणजे त्यांचा खून करण्यात आला आणि त्याला अपघाताचे स्वरूप दिले गेले.” इंदुमती हिंम्मत एकवटून बोलल्या. बोलताना त्यांच्या हातांची पकड अजूनच घट्ट झाली होती. अश्रूंचा पूर आला होता.
“आईसाहेब हे काय बोलत आहात तुम्ही? तुम्हीच सांगितले होते ना की, तुमच्यासमोर ताईसाहेबांची डेडबॉडी दरीतून बाहेर काढण्यात आली होती. त्यांच्या सोबत त्या कार ड्रायव्हरचा देखील मृत्यू झाला.”
“होय. पण आम्ही तेच बघितले जे आम्हाला दाखवण्यात आले.” इंदूमतींच्या डोळ्यांतून अश्रू अजूनही वाहत होते.
“आईसाहेब, आम्हाला काहीच कळत नाहीये. कसे शक्य आहे हे?”
“तुमचा देखील विश्वास बसत नाही ना? आमचा देखील बसला नव्हता. पण पुरावे आहेत तसे.” इंदुमती बोलल्या.
“मला सांगळे आठवते त्या दिवशी दहा तारीख होती. संध्याकाळ होत आली होती. फोनची घंटी वाजली.” इंदुमती बोलत होत्या.
“हॅलो. नमस्कार, मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. तुम्ही सरकार बोलत आहात का?” समोरुन इन्स्पेक्टर बोलत होते. इंदुमती ते क्षण आठवून घटनाक्रम सांगत होती.
“हॅलो. मी बोलतोय चंद्रकांत पाटील. काय काम आहे?” चंद्रकांत बोलले.
“सरकार, तुम्ही मी सांगतो त्या पत्यावर लगेच या. काय झालं आहे ते इथे आल्यावर कळेलच तुम्हाला.” इन्स्पेक्टर जाधव बोलले.
आम्ही दोघेही लगेच त्या ठिकाणी गेलो. घाटाच्या सुरुवातीला थोडे वर गेल्यावर पोलिसांच्या काही गाड्या आणि क्रेन काम करत होते. आमच्यासमोर एक गाडी त्या दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. आम्हाला काहीच समजत नव्हते की, इन्स्पेक्टरने आम्हाला तिथे का बोलावले आहे? आमच्या मागोमाग वीर देखील तिथे आले. आम्ही सगळं बघत होतो. कोणी काहीच सांगत नव्हते.
जे काही घडतं होते ते बघण्यावाचून आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. काही वेळात गाडी पूर्ण बाहेर काढली गेली. त्यातून दोन मृत शरीर बाहेर काढले गेले आणि आपल्यावर आभाळ कोसळले, त्यातील एक आपल्या राजेश्वरी होत्या.
आम्ही दोघे तिथेच कोसळलो. लाडात वाढलेली आमची राजकन्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. वीरची तर अवस्था अजूनच वाईट होती. आम्ही आमचे दुःख बाजूला ठेवून त्यांना धीर देत होतो. ते आमचा आणि आम्ही त्यांचा आधार झालो.” इंदुमती आकांत करत होत्या.
“मग तुम्ही कसं का म्हणता की, त्यांचा खून झाला आहे?” श्रीवर्धन बोलला.
“कारण तसे पुरावे आहेत आमच्याकडे.” इंदुमती गंभीर होत बोलल्या.
“पुरावे? कसले पुरावे? काय आहे?” श्रीवर्धन चकित होऊन बोलला.
“हे घ्या. हे लावा तुमच्या लॅपटॉपला.” इंदुमतींनी एक इतकावेळ पदराखाली लपवलेला पेनड्राईव्ह श्रीवर्धनच्या हातावर ठेवला.
“हे काय आहे?”
“तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ह्यात.” इंदुमती डोळे पुसत बोलल्या.
श्रीवर्धन लगेच उठला. समोर असलेल्या बॅगेतून लॅपटॉप काढून सुरू केला आणि लगेच त्याला पेनड्राईव्ह जोडला. पण लॅपटॉप सुरू होऊन पेनड्राईव्ह ओपन होण्यासाठी लागणारे ते काही क्षण जीवघेणे वाटतं होते. त्याची तगमग होत होती. शेवटी लॅपटॉप सुरू झाला आणि पेनड्राईव्ह मधील फोल्डर दिसले.
श्रीवर्धनने ते फोल्डर उघडले. त्यात अजून दोन फोल्डर होते. त्याने वरच्या फोल्डरवर क्लिक करून ते उघडले. त्यात काही फोटोज् होते. श्रीवर्धनने तर ते फोटोज् बघायला सुरुवात केली.
“आईसाहेब अहो, काय आहे हे? ज्याला आपण सज्जन समजत होतो त्याचे संबंध एक नाहीतर अनेक मुलींशी आहेत! किती निर्लज्ज आणि कपटी आहे हा माणूस! आपल्या ताईसाहेबांना फसवत होता हा! ताईसाहेबांना हे सगळं ठाऊक होतं का? त्या कधी काही बोलल्या का तुम्हाला ह्याबद्दल?” श्रीवर्धन रागाने लाल झाला होता. पण तरी बोलण्यात संयम होता.
“त्याचीच तर खंत आहे. राजेश्वरी आम्हाला कधीच काहीच बोलल्या नाही. जेमतेम चार महिन्यांचा संसार बघितला त्यांनी. त्यात पण हे असे त्यांच्या पदरी आले. आम्ही त्यांच्या प्रेमाला नकार दिला आणि आम्हाला इतके परके केले की मनातील आमच्याजवळ बोलायच्याच नाहीत कधी. त्यांनी सांगितले असते तर आम्ही त्या नरकातून त्यांना बाहेर घेऊन आलो असतो.” इंदुमती आतून पार तुटल्या होत्या.
“पण आईसाहेब तुम्ही त्यांना जेव्हा केव्हा भेटल्या तेव्हा त्यांच्या वागण्या, बोलण्यातून त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला काहीच जाणवले नाही? जरा देखील शंका आली नाही?”
“त्यांनी वीरशी लग्नाला होकार दिला तेव्हापासून त्या जरा नाराजच असायच्या. बोलणे देखील तुटक झाले होते. त्यामुळे आम्हाला अशी काही शंका आलीच नाही. वाटले की, त्या अजूनही नाराज आहेत आमच्यावर. नवीन संसार आहे. वीरचा स्वभाव समजला की त्यांना आमचा निर्णय योग्य असल्याचे कळेल. पण असे काहीच झाले नाही. त्या मनातल्या मनात कुढत होत्या आणि आम्ही आई असून त्यांचे मन समजू शकलो नाही. खूप मोठे पाप घडले आहे आमच्या हातून श्रीवर्धन, खूप मोठे.” इंदुमती आज प्रथमच इतक्या मोकळे बोलून रडत होत्या. गेल्या नऊ महिन्यांपासून सलत आलेली सल आज ओठांवर आली होती. कारण त्यांची साथ द्यायला त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ होता.
“आईसाहेब तुम्ही वीरला ह्याचा जाब विचारला नाहीत?”
“आम्हाला ही गोष्ट सहा महिने आधी समजली. ज्याचे पुरावे द्यायला अतुल आला होता. त्यावेळी अतुलला बघून आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली. खरंच हिऱ्याला नकार दिला आणि काच गळ्यात पाडून घेतली आम्ही आणि त्याच काचेने आमचा गळा कापला.” इंदुमती हुंदके देत बोलत होत्या.
“अतुल? त्याला कसे माहित हे सगळे? आणि तो कुठे भेटला तुम्हाला?
क्रमशः
काय संबंध असेल वीरचा ह्या सगळ्याशी? अतुलला सगळी माहिती कशी मिळाली?
कळेलच पुढील भागात.
© वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा