अघटीत... भाग ५

“अतुल मी ठरवलं होतं. लग्ना नंतर तुला कधीच भेटायचे नाही. काहीच संपर्क ठेवायचा नाही तुझ्याशी. पण माझी परस्थिती मी तुझ्या व्यतिरिक्त कोणालाही सांगू शकतं नाही.” राजेश्वरी बोलली.
मागील भागात आपण बघितले…

“आम्हाला ही गोष्ट सहा महिने आधी समजली. ज्याचे पुरावे द्यायला अतुल आला होता. त्यावेळी अतुलला बघून आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली. खरंच हिऱ्याला नकार दिला आणि काच गळ्यात पाडून घेतली आम्ही आणि त्याच काचेने आमचा गळा कापला.” इंदुमती हुंदके देत बोलत होत्या.


“अतुल? त्याला कसे माहित हे सगळे? आणि तो कुठे भेटला तुम्हाला?


आता पुढे…


“राजेश्वरी गेल्यानंतर साधारण तीन महिन्यांनी एक दिवस अचानक अतुल घरी आला. आम्ही त्याला या आधी बघितले नव्हते त्यामुळे ओळखण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यानेच ओळख करून दिली आणि सत्य काय आहे सांगितले. पण त्यावर आमचा विश्वास बसत नव्हता. मग त्याने आम्हाला हा पेनड्राईव्ह दिला. त्याच्याचसमोर आम्ही पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला आणि मग सत्य काय आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आणि कानांनी ऐकले. श्रीवर्धन तुम्ही जे बघितले तो तर एक भाग आहे. अजून अर्धा भाग बाकी आहे.” इंदुमती भावूक झाल्या.


“म्हणजे अजून काही आहे?”


“होय.” इंदुमती बोलल्या.


श्रीवर्धनने परत लॅपटॉप मध्ये बघितले. अजून काहीतरी ह्याहून धक्कादायक आपल्यासमोर येणार आहे ह्याची कल्पना एव्हाना त्याला आली होती. पण ते काय हे मात्र कोडेच होते आणि ते कोडे उलगडणार होते पेनड्राईव्ह मध्ये असलेल्या त्या दुसऱ्या फोल्डरमधून. श्रीवर्धनने त्या फोल्डरमधील सगळे फोटोज् बघितले. वीरचे फक्त वेगवेगळ्या मुलींसोबत संबंध नसून त्याला अनेक व्यसने देखील आहेत त्यातून स्पष्ट दिसत होते.


मोठा धीर एकवटून श्रीवर्धनने ते दुसरे फोल्डर उघडले. त्यात काही ऑडिओ फाईल्स होत्या. त्यातील पहिली फाईल त्याने उघडली. लॅपटॉपचा आवाज जरा मोठा केला.


“हॅलो अतुल, मला माफ कर. आईसाहेब आणि बाबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न करणार नाही हे माझे आधीच ठरले होते आणि ह्याची कल्पना तुला दिली होती. मी खूप प्रयत्न केले अरे पण दोघांना नाही समजावू शकले. मला खरंच माफ कर.
अतुल तुझ्यावर माझे मनापासून प्रेम आहे आणि सदैव राहील.” राजेश्वरीचा आवाज ऐकून श्रीवर्धनचे डोळे पाणावले. राजेश्वरीने लग्नाआधी अतुलला केलेला तो मेसेज होता. तिच्या आवाजात किती दुःख होते हे जाणवत होते.


मेसेज संपला आणि श्रीवर्धनने दुसऱ्या ऑडिओवर क्लिक केले. ती क्लिप होती राजेश्वरी आणि अतुल ह्यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाची. अतुलने मुद्दामहून राजेश्वरीचा फोन आल्यावर त्याचे रेकॉर्डिंग करून ठेवले होते.


“अतुल मी ठरवलं होतं. लग्नानंतर तुला कधीच भेटायचे नाही. काहीच संपर्क ठेवायचा नाही तुझ्याशी. पण माझी परस्थिती मी तुझ्या व्यतिरिक्त कोणालाही सांगू शकतं नाही.” राजेश्वरी बोलली

“बोल गं. मी तुझ्यासोबत कायम आहे.” अतुल बोलला


“माहित आहे रे मला ते. म्हणूनच तुला कॉल केला.”


“राजेश्वरी तुला काही त्रास आहे का तिथे? मला सांग. मी लगेच येतो तुला न्यायला. तुझ्या आईसाहेब आणि बाबासाहेबांना देखील समजावेल मी.” अतुलला राजेश्वरीच्या आवाजातील आर्तता जाणवली होती.


“त्रास? अतुल तुझ्याशी लग्न न केल्याची शिक्षा भोगते आहे मी.


“कोड्यात नको ना बोलू. सांग मला सगळं स्पष्टं.” अतुल अधीर होत होता.


“वीर माणूस नाही राक्षस आहे. त्याचे बाहेर अनेक मुलींशी संबंध आहेत. दारू पितो. नशेत रोज कोणाला ना कोणाला घरी घेऊन येतो आणि मन भरलं की मग मोर्चा माझ्याकडे वळतो. विनवण्या करून देखील त्याला कोणाचीच दया येत नाही. माझी तर मुळीच नाही आणि..” राजेश्वरी बोलताना थांबली. तिच्या हुंदक्यांचा आवाज येत होता.


“आणि काय. सांग मला.” अतुलच्या जीवाची घालमेल होत होती.


“हे लग्न त्याने सुड घेण्यासाठी केले आहे. काल तसं तो बोलला. म्हणजे तो जे काही वागतो आहे ते ठरवून वागतो आहे. अतुल माझ्या जिवाला धोका आहे.” राजेश्वरी घाबरत बोलत होती.


“अगं मग तू घरी का नाही सांगत असं सगळं? का सहन करते आहेस? ” अतुल बोलला.


“घरी सांगण्याची हिंम्मत माझ्यात नाही. बाबासाहेबांनी आजपर्यंत घेतलेला कोणताच निर्णय चुकला नाही. पण स्वतःच्या मुलीच्या बाबतीत घेतलेला निर्णय चुकला हा धक्का ते सहन करू शकणार नाहीत आणि वर्धनला सांगून मला त्याच्या अभ्यासात विघ्न नको आहे.” राजेश्वरी सांगत होती.


“तू एक काम कर. तयार रहा मी येतो तुला घ्यायला. मग बघू पुढचं पुढे. तू तिथून बाहेर निघणं महत्त्वाचे आहे. मग सांगू घरी आपण सगळं नीट. समजून घेतील बाबासाहेब आणि आईसाहेब. तुझे आईवडील आहेत ते.” अतुल लगेच गाडीची चावी हातात घेत बोलला.


“नको तू नको येऊस. आता मी वीरच्या फार्महाऊस वर आहे. उद्या परत घरी जाईल. तेव्हा घरी जाताच आईसाहेब आणि बाबासाहेबांना भेटायला जाईल आणि सांगेल सगळं.”

“कुठे आहे फार्म हाऊस? मी येतो. उद्याची वाट कशाला बघायची?” अतुल तिला समजावत होता.


“अतुल वीर आलेत. मी ठेवते. त्याने फोन वर बोलताना बघितले तर अजून प्रॉब्लेम होईल.” राजेश्वरीने घाबरून फोन ठेवला. पण तेव्हा वीरचा येणारा आवाज त्यात रेकॉर्ड झाला.


“राजेश्वरी, राजेश्वरी.” वीर मोठमोठ्याने ओरडत होता.


श्रीवर्धन हे सगळे ऐकून स्तब्ध झाला. आपल्या बहिणीच्या आयुष्यात इतके काही घडत होते आणि आपल्याला त्याची कल्पना देखील नव्हती. मनात अपराधाची भावना निर्माण होत होत. इंदुमती राजेश्वरीच्या फोटोकडे बघत होत्या. डोळ्यांतून अश्रू वाहत होते.


आता त्या फोल्डर मध्ये फक्त एकच ऑडिओ फाईल होती. श्रीवर्धन त्यावर क्लिक करून ऑडिओ सुरू करणार त्याआधी इंदुमतींनी कानांवर हात घट्ट धरून ठेवले आणि डोळे बंद केले. त्यांच्या अशा वागण्यावरून श्रीवर्धनचे हात थरथरत होते. काहीतरी अघटीत ऐकावे लागणार ह्या विचाराने त्यांच्या मणक्यात भीतीची एक चमक निघाली. ते पलंगावर बसले. एका हाताने पलंगाच्या दांड्याला घट्ट पकडले आणि दुसऱ्या हाताने ऑडिओ क्लिपवर क्लिक केले.


काय असेल त्या क्लिपमध्ये? काय होईल श्रीवर्धनची अवस्था ते ऐकून? कळेलच पुढील भागात.


क्रमशः


®वर्षाराज

🎭 Series Post

View all