अघटीत.. भाग ६

“ताईसाहेब तुम्ही वेळीच सांगितले असते तर असे अघटीत घडलेच नसते. का असे वागलात ताईसाहेब? इतके का परके होतो आम्ही तुमच्यासाठी? एक फोन तर करायचा होता.” श्रीवर्धन इंदूमतींच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होता.

मागील भागात आपण बघितले…


आता त्या फोल्डरमध्ये फक्त एकच ऑडिओ फाईल होती. श्रीवर्धन त्यावर क्लिक करून ऑडिओ सुरू करणार त्या आधी इंदुमतींनी कानांवर हात घट्ट धरून ठेवले आणि डोळे बंद केले. त्यांच्या अशा वागण्यामुळे श्रीवर्धनचे हात थरथरत होते. काहीतरी अघटीत ऐकावे लागणार ह्या विचाराने त्यांच्या मणक्यात भीतीची एक चमक निघाली. ते पलंगावर बसले. एका हाताने पलंगाच्या दांड्याला घट्ट पकडले आणि दुसऱ्या हाताने ऑडिओ क्लिपवर क्लिक केले.


आता पुढे…


हृदयाची वाढणारी धडधड आणि मनातील भीती असे सगळे एकाचवेळी घडत होते. क्लिपवर क्लिक करताच ऑडिओ सुरू झाला.


“अतुल, अतुल, तुला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण तुझा फोन लागत नाहीये. माझ्या हातात वेळ कमी आहे. कदाचित हा माझा शेवटचा मेसेज असेल. तुला एक फोन नंबर पाठवला आहे. तिचे नाव जुली थॉमस आहे. तिच्याशी बोल. ती तुला सगळं सांगेल. अतुल आय लव यू. पुढच्या जन्मात तुझ्याशीच लग्न करेल. आता मला माफ कर. माझ्या घरच्यांना न्याय मिळवून दे. वर्धनला मदत कर. त्यांना सत्य कळले पाहिजे. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. काळजी घे.” घाबरलेल्या आवाजात घाईत केलेला राजेश्वरीचा तो मेसेज खरंच शेवटचा मेसेज ठरला.


“ताईसाहेब तुम्ही वेळीच सांगितले असते तर असे अघटीत घडलेच नसते. का असे वागलात ताईसाहेब? इतके का परके होतो आम्ही तुमच्यासाठी? एक फोन तर करायचा होता.” श्रीवर्धन इंदूमतींच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होता.


“आईसाहेब, एकदा अतुलला भेटला असतात तर हे सगळे घडलेच नसते.” श्रीवर्धन बोलत होता. डोळ्यातील पाणी आटत नव्हते.


“सगळी चूक आमची आहे श्रीवर्धन, आम्ही मोहाला बळी पडलो. मुलगा देखणा, श्रीमंत, कर्तृत्ववान आहे त्यात आपल्या तोलामोलाचा आहे हेच बघितले आम्ही. आमचा अहंकार आमच्या मुलीच्या सुखाच्या आड आला. तुमचे बाबासाहेब आणि मी आम्ही दोघेही उच्च शिक्षित असून देखील विचारांनी मात्र आम्ही अडाणीच राहिलो. आपल्या रूढी परंपरा, मानमर्यादा, इज्जत हे सगळं सांभाळण्यात आम्ही आमच्या मुलीच्या सुखाचा विचार नाही केला.

मुलीने आवडीच्या मुलाशी लग्न केले तर समाज, गावातील लोक काय म्हणतील? त्यांच्यासमोर आम्हाला आमची मान खाली घालावी लागेल, आमची इभ्रत धुळीला मिळेल. त्यात अतुल हा गरीब घरातील मुलगा, अशा घराशी संबंध जोडणे आम्हाला कमीपणाचे वाटत होते. ह्याच आमच्या संकुचित विचारसरणीने आमच्या राजेश्वरीचा बळी घेतला.” इंदुमती स्वतःला दोष देत होत्या.


“श्रीवर्धन आम्हाला माफ करा. खोटा मोठेपणा, डोलारा जपण्यात आम्ही दोघे तुमचे आईसाहेब आणि बाबासाहेब बनून राहिलो. तुमचे आईबाबा झालोच नाही. म्हणूनच राजेश्वरींनी इतकी मोठी गोष्ट आमच्या पासून लपवून ठेवली. निव्वळ आमचा खोटा अहंभाव, इज्जत जपण्यासाठी त्यांनी स्वतःची आहुती दिली.

मुलगी सासर सोडून परत माहेरी आल्या तर आई वडिलांची बदनामी होत असते. असे आमचे विचार आहेत हे त्यांना चांगलेच माहीत होते. म्हणून गप्प राहून सगळे सहन करणे त्यांनी मान्य केले. श्रीवर्धन आमच्या गुन्ह्याला माफी नाही. वीर तर अपराधी आहेतच. पण त्याहीपेक्षा खरे आणि मोठे अपराधी तर आम्ही आहोत राजेश्वरींचे.” इंदुमती रडत होत्या.


“आईसाहेब.” श्रीवर्धनच्या मुखातून शब्द फुटत नव्हते.


“अतुलने आम्हाला जेव्हा हे सगळे दाखवले, ऐकवले तेव्हा सत्य आम्हाला कळले. तोपर्यंत आम्ही वीर किती दुःखी आहे असेच समजत होतो. त्याचे अश्रू मगरीचे अश्रू आहेत हे फार उशिरा समजले आम्हाला. ते पण अतुलने पुरावे दिले त्यामुळे, नाहीतर आपण सगळे अंधारातच राहिलो असते.


पण हे सगळं ऐकून बघून सत्यावर जरी प्रकाश पडला असला तरी तुमचे बाबासाहेब मात्र अंधारात हरवून गेले. त्यादिवशी अतुलने हे सत्य सांगितले तेव्हा ते त्या खोलीत निघून गेले ते आजपर्यंत बाहेर आले नाहीत. त्यांना ह्यातून बाहेर काढा श्रीवर्धन.” इंदुमतींनी हात जोडले.


“आईसाहेब आपण मिळून बाबासाहेबांना ह्या अंधारातून बाहेर काढू. पण आईसाहेब अतुलने अजून काय सांगितले. ती जुली थॉमस कोण आहे? काही कळलं का?” श्रीवर्धन विचारत होता.


“हो कळलं.” मागून आवाज आला.


“अतुल तू?” श्रीवर्धन चकित झाला.


“तुम्ही येणार म्हणून मीच अतुलला यायला सांगितले. पुढे सगळं तेच सांगतील तुम्हाला.” इंदुमती डोळे पुसत बोलल्या.


“ये ना.” श्रीवर्धनचे डोळे परत पाणावले.


“वर्धन तुझी ताई खूप हिंमतीची होती. लग्नाच्या सहा महिन्यांनी पहिल्या वेळेस तिने मला कॉल केला होता. तिला घ्यायला मी लगेच जात होतो पण तिने फोन ठेवला आणि मला पत्ता मिळाला नाही. तेव्हा तिने सांगितले असते तर मी कदाचित तिला वाचवू शकलो असतो. पण राजेश्वरीचे दुर्देव म्हण की आपले. दुसऱ्या दिवशी पहाटे तिने जेव्हा मला कॉल केला तेव्हा नेमका माझा फोन डिस्चार्ज झाला होता. त्यामुळे मला कॉल लागला नाही आणि जेव्हा मला मेसेज मिळाला तेव्हा फार उशीर झाला होता.” अतुल बोलला.


“अतुल तू कमीत कमी तिला जवळचा तरी वाटला की तिने तुला सगळं सांगितलं. आम्हाला तर ह्यातील काहीच कल्पना नव्हती. एक भाऊ म्हणून देखील तिच्या आवाजातील वेगळेपण कधी हेरु शकलो नाही आम्ही. लाज वाटते आम्हाला स्वतःची.” श्रीवर्धन स्वतःवर रागावला.


“वर्धन शांत हो.” अतुल त्याला समजावत होता.


“पण अतुल तुला हे सगळे पुरावे कुठून मिळाले? आणि ती जूली तिच्याशी काही संपर्क झाला?” श्रीवर्धन बोलला.


“सगळे पुरावे जमा करायला मला तीन महिन्यांचा कालावधी लागला. पुरव्यांविना माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता आणि वीरला जर समजले असते की, मी त्याच्या विरोधात पुरावे जमा करतो आहे तर त्याने ते नष्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता. जे आपल्या हिताचे नव्हते. त्यामुळे अतिशय सावधपणे मी पुरावे जमा करण्याचे काम करत होतो. ह्या पेनड्राईव्ह व्यतिरिक्त माझ्याकडे खूप महत्त्वाचे पुरावे आहेत. ज्यामुळे वीर दोषी असल्याचे सिद्ध होईल.

त्यासाठी मी आईसाहेबांना सांगितले होते की, वीरशी तसेच वागत रहा जसे आतापर्यंत वागत होते. त्यामुळे त्याला आपल्यावर संशय येणार नाही आणि माझी योजना सफल झाली.” अतुल सांगत होता.


“काय पुरावे आहेत? आणि जुलीचे काय झाले?” श्रीवर्धन अधीर होत बोलला.


क्रमशः


काय सांगेल अजून अतुल? कोणते पुरावे असतील त्याच्याकडे? कळेलच पुढील भागात.


© वर्षाराज

🎭 Series Post

View all