मागील भागात आपण बघितले..
त्यासाठी मी आईसाहेबांना सांगितले होते की, वीरशी तसेच वागत रहा जसे आतापर्यंत वागत होते. त्यामुळे त्याला आपल्यावर संशय येणार नाही आणि माझी योजना सफल झाली.” अतुल सांगत होता.
“काय पुरावे आहेत? आणि जुलीचे काय झाले?” श्रीवर्धन अधीर होत बोलला.
आता पुढे…
“मनावर दगड ठेवून आम्ही वीरशी पहिल्या सारखेच वागतो आहे. ह्याच आशेवर की, आपल्या राजेश्वरीला न्याय मिळेल.” इंदुमती आशेने अतुलकडे बघत होत्या.
“आईसाहेब नक्कीच न्याय मिळेल आपल्या राजेश्वरीला.” अतुल अश्वस्त करत बोलला.
“पण पुढे काय झालं?” श्रीवर्धन बोलला.
“त्या दिवशी राजेश्वरीचा मेसेज मला मिळाला त्या आधीच मला तिच्या जाण्याची खबर मिळाली होती. मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. तिला वाचवू शकलो नाही पण तिला न्याय मिळवून देईल असा निर्धार करून मी त्या जुलीला फोन केला. त्या आधी माझ्या एका डॉक्टर मित्राच्या मदतीने मी राजेश्वरीचे खरे पोस्टमार्टम रिपोर्ट मिळवले.
खूप प्रयत्न केले त्यानंतर जुली भेटायला आणि सगळं सांगायला तयार झाली.” अतुल बोलला.
“कोण आहे ती? काय सांगितले तिने? आणि खरे रिपोर्ट्स म्हणजे? काय आहे त्या रिपोर्ट्स मध्ये?” श्रीवर्धन अधीर होत होता.
“एक असं सत्य जे कोणालाच माहित नव्हते. राजेश्वरीला ते समजले होते म्हणूनच तिचा बळी घेतला गेला.” अतुल गंभीर झाला.
“अतुल लवकर सांगा. कोड्यात बोलू नका.” इंदुमती बोलल्या.
“पहिल्या वेळेस जेव्हा मी जुलीला फोन करून वीर बद्दल विचारले तेव्हा तिने काहीही सांगण्यास स्पष्ट नकार दिला. त्या नंतर महिनाभर जुली मला भेटली तर नाहीच पण माझा फोन देखील उचलत नव्हती.
मग एक दिवस मी तिला दुसऱ्या नंबर वरून फोन केला. जो तिने उचलला. तेव्हा काही न विचारता मी तिला आधी राजेश्वरी बद्दल सांगितले आणि वाटलं तर फोन कर म्हणून फोन ठेऊन दिला.” अतुल सगळे सांगत होता.
“मग केला का तिने फोन?” श्रीवर्धन बोलला.
“हो. दुसऱ्या दिवशी तिने मला फोन केला.” अतुल.
“येस मिस्टर अतुल. तुम्हाला जी माहिती पाहिजे ती द्यायला मी तयार आहे. पण तुम्हाला इथे यावं लागेल मला भेटायला आणि दुसरी अट ती म्हणजे माझे नाव कुठेही समोर यायला नको मी कोर्टात येणार नाहीं.” जुली बोलली.
“मी तिची अट मान्य केली आणि त्वरित गोव्याला गेलो.”
“गोव्याला? का? इंदुमती बोलल्या.
“कारण जुली गोव्याची आहे. तिथे गेल्यावर तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
जुली थॉमस ही विकी थॉमसची बायको आहे.” अतुल सांगत होता.
“कोण हा विकी? आणि त्याचा आपल्याशी काय संबंध?” इंदुमती विचारत होत्या..
“मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करायचे आणि त्यांची संपत्ती मिळवायची हे त्याचे मूळ काम आहे. त्याचं बरोबर पैशांसाठी कोणाच्या सांगण्यावरून देखील तो अशी कामं करतो. जुली त्याच्या ह्याच कामाला कंटाळून त्याला सोडून निघून गेली.” अतुल
“पण ह्या सगळ्याचा संदर्भ लागत नाहीये काहीच.” श्रीवर्धन बोलला.
“संबंध, संदर्भ सगळं काही आपल्याशी निगडित आहे. आपल्या सगळ्यांचीच खूप मोठी फसवणूक झाली आहे. तो ढोंगी माणूस आहे. ज्याच्यावर तुम्ही सगळयांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. ज्याच्या हातात आपल्या रजेश्वरीचा हात दिला. तो ज्याने आपल्या राजेश्वरीचा जीव घेतला. तो वीर इतर कोणी नसून विकी आहे.”
“काय?” इंदुमती आणि श्रीवर्धन दोघे एकदम बोलले.
“पण हे कसं शक्य आहे? वीर तर ललित देशमुखांच्या बहिणीचा मुलगा आहे.” इंदुमती बोलल्या.
“नाही आईसाहेब. तो त्यांचा मुलगा नाही. खरं तर तो कोणाचाच कोणीच नाही. तो अनाथ आहे. गोव्याच्या एका अनाथ आश्रमात तो लहानाचा मोठा झाला. तिथेच जुली देखील लहानाची मोठी झाली. मोठे झाल्यावर दोघे प्रेमात पडले आणि लग्न केले. वीर म्हणजे विकीची खरी आणि एकमेव कायदेशीर बायको फक्त जुली आहे.
सुरुवातीला तो खूप चांगला होता, मेहनती होता. जुली आणि त्याने मिळून गोव्यात एक छोटे रेस्टॉरंट उघडले होते. लग्नानंतर तीन वर्ष सगळं सुरळीत सुरू होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि सगळेच बदले. विकी बदलत गेला, त्यांचे नाते बदलले परिणामी ते विभक्त झाले. अर्थात कायदेशीर रित्या ते अजूनही नवरा बायको आहे.” अतुल बोलला.
“असं काय घडलं की वीर इतका बदलला?” श्रीवर्धन वीर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बोलला.
“वीरचे रेस्टॉरंट बंद झाले. त्याला खूप नुकसान सोसावे लागले. तरी देखील तो हिमतीने उभा होता. पण त्याला व्यवसायात झालेले नुकसान हे त्यांच्या सोबत अनाथ आश्रमात वाढलेल्या एका मुलीमुळे झाले आहे. हे जेव्हा त्याला समजले तेव्हा पासून तो बदलला.”
“म्हणजे?” श्रीवर्धन ने विचारले.
“विकी म्हणजे वीर आणि जुली ह्यांच्या सोबत रुबी नावाची एक मुलगी होती. तिचे विकीवर खूप प्रेम होते पण विकीचा जीव जुली मध्ये होता. रुबीचे प्रेम नाकारून विकीने जुलीशी लग्न केले. तेव्हा तर रुबीने मोठ्या मनाने दोघांचे नाते स्वीकारले. त्यांच्याशी मैत्री अजूनच घट्ट केली, त्यांचा विश्वास संपादन केला. तिघांची इतकी जवळीक झाली की, विकी आणि जुलीने त्यांच्या रेस्टॉरंटच्या फायनान्स संदर्भातील जबाबदारी रुबीला दिली. तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला पण तिने मात्र त्यांच्यावर सूड उगवला. हिशोबात तसेच बँकेच्या इतर कारभारात फेररफार केली. परिणामी विकी कर्जबाजारी झाला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होऊ लागली. परिवाराचे पोट भरण्यासाठी त्याला त्याचे रेस्टॉरंट विकावे लागले. त्यातून कर्ज तर फिटले पण उत्पन्न काहीच नव्हते. म्हणून मिळेल ते काम तो करत होता. अगदी पडेल ते काम करायची त्याची तयारी होती. त्यातच त्याला रुबीचे खरे रूप समजले. रुबीने केलेली हिशोबातील फेरफार आणि त्याचे रेस्टॉरंट विकत घेणारे लोक देखील रुबीचेच होते. ज्यांनी तीच्यावतीने विकीचे रेस्टॉरंट विकत घेतले.” अतुल सांगत होता.
“म्हणजे त्याला सुद्धा कोणीतरी धोका दिला होता. तरी देखील तो असा वागतो.” श्रीवर्धन बोलला.
“मग पुढे काय झाले?” इंदुमती बोलल्या.
क्रमशः
काय झाले असेल पुढे? रुबीचे सत्य कळल्यावर काय केले असेल विकी अर्थात वीरने? कळेलच पुढील भागात.
© वर्षाराज