अघटीत... भाग ८

“आईसाहेब विश्वास घाताच्या वेदनेतून दोन गोष्टी घडतात एक तर माणूस परत कधीच कोणावरही विश्वास ठेवण्यास घाबरतो, कोणावर विश्वास ठेऊच शकत नाही. दुसरी म्हणजे अशा वेदनेतून सूड भावना प्रबळ होते आणि एक गुन्हेगार जन्माला येतो.

मागील भागात आपण बघितले…


“म्हणजे त्याला सुद्धा कोणीतरी धोका दिला होता. तरी देखील तो असा वागतो.” श्रीवर्धन बोलला.


“मग पुढे काय झाले?” इंदुमती बोलल्या.


आता पुढे…


“आईसाहेब विश्वासघाताच्या वेदनेतून दोन गोष्टी घडतात एक तर माणूस परत कधीच कोणावरही विश्वास ठेवण्यास घाबरतो, कोणावर विश्वास ठेऊच शकत नाही. दुसरी म्हणजे अशा वेदनेतून सूड भावना प्रबळ होते आणि एक गुन्हेगार जन्माला येतो.
विकीच्या बाबतीत दुसरी गोष्ट झाली. त्याच्या मनात सुडाची भावना फोफावत गेली आणि एका नवीन विकीचा जन्म झाला. त्याच्या ह्या प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचे काम केले अल्बर्ट नावाच्या एका इसमाने.

अल्बर्टला विकीची परिस्थिती माहित होती. पैशांसाठी विकी वाटेल ते काम करण्यास तयार होता, त्यात मनात वाढणारी सूड भावना हे देखील अल्बर्टला माहित होते आणि ह्याचाच फायदा घेत त्याने विकीला मदतीच्या ओझ्याखाली इतके दाबले की अल्बर्ट सांगेल ती पूर्व दिशा असे मानून विकी कुठलाही विचार न करता त्याची प्रत्येक गोष्ट मान्य करू लागला.

मुलींना फसवून किती सोप्या पद्धतीने पैसे कमावता येतो आणि ह्याच पद्धतीने तो रुबीला देखील फसवून त्याचे सर्वस्व गेलेले कसे मिळवू शकतो हे देखील पटवून दिले. सुरुवातीला विकीला ते अवघड गेले पण पैसा मिळू लागला तशी त्या पैशाची नशा चढू लागली. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि मग त्याने त्याच पद्धतीने रुबीला फसवून त्याचे झालेले नुकसान भरून काढले.” अतुल सांगत होता.


“श्रीवर्धन ऐकलं ना? म्हणून मी आणि तुमचे बाबासाहेब नेहमी एक गोष्ट सांगत असतो, की कितीही वाईट दिवस आले तरी कोणाचे उपकार घेऊ नका. चांगुलपणाच्या पडद्याआड समोरचा तुम्हाला इतका दाबून टाकतो की तुमच्यातील चांगले काय आणि वाईट काय हे विचार करण्याची क्षमता संपून जाते. तुम्हाला समजत जरी असेल की एखादी गोष्ट चुकीची आहे तरी तुम्ही त्याचा विरोध करू शकत नाही आणि गुन्ह्याच्या दलदलीत फसत जाता.” इंदुमती बोलल्या.


“हो आईसाहेब. तुम्ही बरोबर सांगत आहात. अतुल पण मग वीरने त्या रुबीला देखील मारून टाकले का? असे किती बळी घेतले त्याने?” श्रीवर्धनने विचारले.


“नाही त्याने रुबीला काय तर कोणत्याच मुलीला कधीच मारले नाही. तो फक्त मुलींना फसवून त्यांच्याशी पळून जाऊन लग्न करण्याचे नाटक करायचा आणि मग मुलींनी घरून चोरून आणलेले दागिने, पैसे घेऊन पळून जायचा. पण जाताना मात्र त्या मुली त्यांच्या घरी परत जातील इतके पैसे ठेऊन जायचा. त्याने आजपर्यंत अनेक मुलींना फसवले पण लग्न कोणाशीच केले नाही.” अतुल बोलला.



“चला म्हणजे थोडीतरी माणुसकी शिल्लक होती त्याच्यात. पण जर त्याने आजपर्यंत कोणत्याच मुलीशी लग्न केले नाही तर मग ताईसाहेबांशी का लग्न केले? त्या तर ह्या लग्नाच्या विरोधात होत्या.” श्रीवर्धन बोलला.

“त्याने रुबीला मारले नाही, कोणत्याच मुलीला मारले नाही मग माझ्या राजेश्वरींना का मारले?” इंदुमती परत भावूक झाल्या.


“आईसाहेब जुलीच्यामते विकी कितीही वाईट असला तरी तो कोणाचा जीव कधीच घेऊ शकत नाही. त्याने आपल्या राजेश्वरीला देखील मारले नाही. हे ती ठामपणे सांगत होती.” अतुल बोलाल.


“जर त्याने मारले नाही तर मग कोणी मारले? आणि प्रश्न तर कायम राहिला की त्याने ताई साहेबांशी लग्न का केले? त्या तर प्रेमात नव्हत्या त्याच्या.” श्रीवर्धन विचारत होता.


“तेच तर खरे कोडे आहे. ज्याचे उत्तर मी कालपर्यंत शोधत होतो. वर्धन यायच्याआधी सगळा शोध पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न होता आणि झालेही तसेच. आता आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. खऱ्या गुन्हेगाराच्या विरोधात.” अतुल गंभीर होत बोलला.


“काय आहे त्या कोड्याचे उत्तर?” इंदुमती बोलल्या.


“आईसाहेब अजूनही तुमच्या लक्षात कसे आले नाही? विकी म्हणजे वीरला राजेश्वरीशी लग्न करण्याचे पैसे देण्यात आले होते. गोव्यात असताना एक दिवस अल्बर्टने एका व्यक्तीची ओळख विकीशी करून दिली. ती व्यक्ती आणि विकीमध्ये एक डील झाले. त्यानुसार त्याने सांगितलेले काम जर विकीने केले तर त्याला त्या कामाचे दहा करोड रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. त्या डीलनुसार कामाची अर्धी रक्कम त्याला आधीच देण्यात आली होती आणि अर्धी काम झाल्यावर देण्याचे ठरले होते.

विकिचे जुलीवर खूप प्रेम होते त्यामुळे हे काम शेवटचे असे वचन त्याने जुलीला दिले होते.” अतुल सांगत होता.


“म्हणजे हे पैसे लालची देशमुखांनी दिले वीरला हे स्पष्ट आहे.” श्रीवर्धन बोलला.


“अर्थातच. पण ह्या सगळ्या करस्थनामागे फक्त देशमुख नाहीत.” अतुलने रागाने मूठ आवळली.


“मग अजून कोण आहे?” इंदुमती चकित होऊन बोलल्या.


“देशमुख तर ह्या खेळातील फक्त एक मोहरा आहेत. जसा विकी एक मोहरा आहे. खरा सूत्रधार तर वेगळाच आहे. एक अशी व्यक्ती जिच्याबद्दल आपण कधीच विचार केला नव्हता.” अतुलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.


“पण असं कोण असेल?” श्रीवर्धन विचार करत होता.


“अशी एक व्यक्ती जी आपल्या खूप जवळची आहे. जिला आईसाहेब आणि बाबासाहेब दोघांबद्दल देखील खूप चांगले माहीत आहे. त्यांच्या सवयी, आवडी निवडी ह्याचा चांगला अनुभव आणि माहिती आहे. आपल्या घरातील व्यक्तीच आहे ती.” अतुल कोड्यात बोलत होता.


*काय? घरातली व्यक्ती? अतुल काहीही बोलू नका. आमच्या घरात असं कोणीच नाही जो इतक्या खालच्या थराला जाईल.” इंदुमती रागात उठल्या.


“असे तुम्हाला वाटते आईसाहेब. पण खरंतर हेच आहे आणि त्याचे पुरावे देखील आहेत माझ्याकडे. देशमुखांनी तर स्वतःच्या स्वार्थासाठी त्या व्यक्तीची साथ दिली.” अतुल थोडा कडक आवाजात बोलला.


“विकीच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याला ह्या मार्गाला लावण्याचे काम अल्बर्टने त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून केले. पूर्ण विचार करून त्यांनी ह्या कामासाठी विकीची निवड केली आणि वीर बनवून त्याला तुमच्यासमोर आणले. हा योगायोग नव्हता. जाणूनबुजून केलेले कारस्थान होते.” अतुल अजूनच गंभीर झाला.


“पण आहे कोण ती व्यक्ती?” श्रीवर्धनने विचारले.

क्रमशः


कोण असेल ह्या सगळ्या कट कारस्थानामागे.? काय असेल रहस्य? कळेलच पुढील भागात.


© वर्षाराज

🎭 Series Post

View all