Login

अघटीत... भाग ९

“थोडा धीर ठेवा आईसाहेब कळेलच तुम्हाला. म्हणजे सगळ्यांनाच. गुन्हेगार स्वतः गुन्हा कबूल करेल. पण त्याआधी आपण बाबासाहेबांच्या खोलीत गेलं पाहिजे.” अतुलने घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला.

मागील भागात आपण बघितले…


“विकीच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याला ह्या मार्गाला लावण्याचे काम अल्बर्टने त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून केले. पूर्ण विचार करून त्यांनी ह्या कामासाठी विकिची निवड केली आणि वीर बनवून त्याला तुमच्यासमोर आणले. हा योगायोग नव्हता. जाणूनबुजून केलेले कारस्थान होते.” अतुल अजूनच गंभीर झाला.


“पण आहे कोण ती व्यक्ती?” श्रीवर्धनने विचारले.

आता पुढे…


“कोण आहे ती व्यक्ती?” इंदुमती अजून रागावल्या.


“थोडा धीर ठेवा आईसाहेब कळेलच तुम्हाला. म्हणजे सगळ्यांनाच. गुन्हेगार स्वतः गुन्हा कबूल करेल. पण त्याआधी आपण बाबासाहेबांच्या खोलीत गेलं पाहिजे.” अतुलने घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला.


“बाबासाहेबांच्या? पण तिथे का?” श्रीवर्धन बोलला.


“त्यांना देखील सत्य समजले पाहिजे, नाही का? त्यासाठी आत्तापर्यंतची पार्श्वभूमी थोडक्यात सांगावी लागेल. म्हणून आता त्यांच्या खोलीत जाऊया.” अतुलने स्पष्ट कारण सांगितले आणि चालू लागला.


“थांबा अतुल. त्यांची परिस्थिती तुम्हाला चांगलीच ठाऊक आहे. त्यांच्या अशा स्थितीत हे सगळं सांगणं योग्य होणार नाही. त्याचा त्यांच्या तब्बेतीवर विपरीत परिणाम झाला तर आपण त्यांना कायमचे गमावू. हा धोका आम्ही पत्करू शकत नाही.” इंदुमती थोड्या रागात बोलल्या.


“हो अतुल. तुम्ही बाबासाहेबांना ह्या सगळ्यांपासून दूर ठेवा. आपण त्यांना सांगू, पण आत्ताच नाही.” श्रीवर्धन बोलला.


“तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्या तपासात मला साथ दिली. आता आपला तपास अंतिम टप्प्यावर आहे. माझ्यावर परत एकदा विश्वास ठेवा बाबासाहेबांना काही होणार नाही ह्याची जबाबदारी माझी.” अतुल श्रीवर्धनच्या खांद्यावर हात ठेवत इंदुमतींना आश्वस्त करत होता.


“पण अतुल..” इंदुमतींचा आवाज कातर झाला.

“आईसाहेब. मी आहे ना. चला आता उशीर नको अजून.” अतुल घाईत श्रीवर्धनच्या खोलीतून बाहेर निघत खाली बाबासाहेबांच्या खोलीत गेला. पाठोपाठ इंदुमती आणि श्रीवर्धन देखील गेले.


चंद्रकांत पाटलांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता.
इंदुमती वरती श्रीवर्धनच्या खोलीत येताना त्यांच्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी घालून आल्या होत्या. तसे चंद्रकांत पाटील त्या खोलीतून कधीच बाहे पडत नसत. पण श्रीवर्धन आला आहे तर त्याच्या भेटीला म्हणून ते बाहेर आले आणि चाललेला विषय त्यांच्या कानावर गेला तर त्याचा परिणाम त्यांच्या तब्ब्येतीवर होईल. म्हणून इंदुमतींनी त्यांच्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली होती.

इंदुमतींनी पुढे होऊन खोलीचे दार उघडले. चंद्रकांत आतमध्ये त्यांच्या पलंगावर झोपलेले होते.


“बाबासाहेब.” अतुलने आवाज दिला.


“कोण अतुल?” अतुलचा आवाज ओळखत चंद्रकांत पाटील उठून बसले. त्यांनी अतुलचा आवाज अचूक ओळखला होता.


“होय बाबासाहेब.” अतुल बोलला.


“साहेब सगळी तयारी झाली आहे. तुम्ही सांगितलेले सगळे सामान आले आहे.” गणपत म्हणजे पाटलांचा विश्वासू गडी त्यांच्या खोलीत येत बोलला. त्याच्या हातात कसल्यातरी सामानाच्या पिशव्या होत्या.


“वर्धन त्या पिशव्या इथे ठेऊन घे आणि मी सांगतो ते करायला गणपतला मदत कर.” अतुल दोघांना बघून बोलला.


“पण हे सगळं काय आहे?” श्रीवर्धन बोलला.

इंदुमती चाललेला प्रकार शांतपणे बघत होत्या.


“वर्धन थोडी कळ काढ. कळेल सगळं. बाबासाहेब उठा नाटकावर पडदा टाकायची वेळ आली आहे.” अतुल खोलीचे पडदे उघडत बोलला.


तसे चंद्रकांत पाटील ताडकन उठून बसले. इंदुमती आणि श्रीवर्धन त्यांना असे बघून चकित झाले. काय चालले आहे त्यांना काहीच कळत नव्हते. इतके दिवस प्रकाशाची एक तिरीप देखील नको असलेले चंद्रकांत पाटील अतुलच्या एका वाक्यात उठून बसले आणि तेही खोलीचे पडदे उघडे असून देखील काहीच प्रतिक्रिया न देता!


“गणपत बाहेर जा आणि घराच्या मागच्या दराचे कुलूप उघडून ठेवा. बरोबर अर्ध्यातासाने मी सांगितल्यावर ते दार बंद करून कुलूप परत लावून घ्यायचे.” अतुलने गणपतला सूचना दिली. ठरल्याप्रमाणे सगळे सुरू होते.


“बाबासाहेब, तुम्ही बरे आहात? तुम्हाला असे बघून किती आनंद होतोय आम्हाला हे आम्ही शब्दात सांगू शकत नाही.” श्रीवर्धन बोलला.


“अहोंऽ, काय हे? कमीतकमी आम्हाला तरी सांगायचे होते.” इंदुमती डोळे पुसत बोलल्या.


“श्रीवर्धन इंदुमती दोघेही रडू नका. आम्ही एकदम ठणठणीत आहोत.” चंद्रकांत बोलले.


“बाबासाहेब तुम्हाला माहीत आहे? वीर हा वीर नाही. तो…” श्रीवर्धनला बोलताना थांबवले आणि चंद्रकांत बोलू लागले.


“आम्हांस माहीत आहे. वीर हा वीर नसून विकी आहे.”


“काय तुम्हाला माहित आहे? पण कसे? आम्ही आम्हाला का नाही सांगितले मग तुम्ही?” इंदुमती थोड्या रागावल्या.


“आईसाहेब हे सगळं सांगण्याची ही वेळ नाही. सगळं सांगू तुम्हाला पण आता नाही.” अतुल घाईत बोलला.


“आता काय करायचे आहे?” श्रीवर्धन अतुलने केलेली तयारी बघून बोलला.


“बाबासाहेब तुम्ही इथे या आणि आईसाहेब तुम्ही त्या तिथे मी सांगतो तसे पडून रहा. तुम्हाला मारायचे आहे.” अतुल बोलला.


“कायऽऽ?” श्रीवर्धन ओरडला.

“म्हणजे असे नाटक करायचे आहे ज्याने समोरच्याला वाटेल की तुम्ही खरंच हे जग सोडून गेलात. श्रीवर्धन मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या दारातून बाहेर यायचे नाही.” अतुलने चंद्रकांतना त्यांच्या खुर्चीत बसण्यास आणि इंदुमतीस तिथेच त्यांच्या पायाजवळ एका कुशीवर झोपण्यास सांगितले. म्हणजे दिसताना असे दिसेल की चंद्रकांत ह्यांच्या आत्महत्येच्या धक्याने इंदुमती ह्यांनी तेच विष घेऊन आत्महत्या केली. त्यासाठी जरुरी सगळी व्यवस्था अतुलने केली. आणि श्रीवर्धनला खोलीच्या कपाटात लपण्यास सांगितले.


“श्रीवर्धन,आईसाहेब,बाबासाहेब, कोणी काहीही बोलत असले तरी तुम्ही कोणीच प्रतिक्रिया देणार नाही. नाहीतर आपला प्लॅन फसेल.” अतुलने शेवटची सूचना दिली.

“गणपत. मागचे दार बंद कर. काही क्षणात ती लोकं येतील तुला माहीत आहे काय करायचे आहे ते, ठीक आहे?” अतुल बोलला.


आता सुरू झाली प्रतिक्षा. पुढील पाच मिनिटांत गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. तसा अतुल खोलीतील त्याच कपाटात शिरला जिथे श्रीवर्धनला लपवले होते.


पुढील पंधरा मिनिटांत एका मागे एक तीन गाड्यांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला.
त्यातील पहिली गाडी होती वीरची.


“गणपत तुझा फोन आला आणि त्वरित निघालो इथे यायला.” वीर गणपतशी बोलत घरात शिरला. घरात जाताना त्या रिकाम्या बंगईकडे बघून त्याची मान आपोआप झुकली. त्याचे देखील डोळे पाणावले होते.

वीर घाईघाईत चंद्रकांत पाटलांच्या खोलीत आला. समोरचे दृश्य बघून त्याची पावलं जागीच थबकली. मोठ्या हिमतीने हळूहळू तो आत गेला.


क्रमशः


काय होईल पुढे? तीन पैकी एक गाडी तर वीरची आहे. मग दोन गाड्या कोणाच्या असतील? सत्य समोर येईल का? कळेलच पुढील भागात.