Login

अघटीत... भाग १०

नाही. असे माहित असते तर मी त्यांची साथ कधीच दिली नसती. माझे चंद्रकांत पाटलांशी काहीच वैर नव्हते होती फक्त इर्षा, हेवा.” देशमुख बोलले.
मागील भागात आपण बघितले…

वीर घाई घाईत चंद्रकांत पाटलांच्या खोलीत आला. समोरचे दृश्य बघून त्याची पावलं जागीच थबकली. मोठ्या हिमतीने हळू हळू तो आत गेला.

आता पुढे..


“गणपत श्रीवर्धनला आणि पोलिसांना कळवले का?” वीरने खोलीत जाताना गणपतला विचारले.


“व्हय मालक.” गणपत डोळ्याला खांद्यावरच्या कापड लावत बोलला.


“तू बाहेर थांब. मला एकटं सोड थोड्यावेळ.” वीर बोलला.

वीरच्या सांगण्यावरून गणपत बाहेरच्या खोलीत निघून गेला. आता त्या खोलीत फक्त वीर, चंद्रकांत पाटील आणि इंदुमती होत्या. अर्थात वीरसाठी त्या दोघांचे फक्त पार्थिव तिथे होते. चंद्रकांत आणि इंदुमतींना असे बघून वीरला एकदम भरून आले.


“कोणत्या तोंडाने तुम्हाला आईसाहेब आणि बाबासाहेब म्हणू? पोटच्या मुलाप्रमाणे वागवले मला. आई वडिलांची माया काय असते हे ह्या अनाथ मुलाला तुमच्यामुळे समजले. इतके प्रेम केले, विश्वासाने मुलीचा हात माझ्या हातात दिला. पण मी पैशाच्या आणि उपकारांच्या ओझ्या खाली इतका दबलो आहे, की चुकीच्या व्यक्तीची साथ देत राहिलो. पण खरं सांगतो. तुमच्या मुलीला मी कधीच त्रास दिला नाही. तिला कधी स्पर्श देखील केला नाही. अजून एक सल मनात कायमची राहील ती म्हणजे राजेश्वरी अपघातात गेली नाही, तिचा खून झाला आहे. पण माझ्या जुलीची शपथ घेऊन सांगतो, मी तिचा खून केला नाही. माफीच्या योग्य तर मी नक्कीच नाही. तुमच्या जिवंतपणी माफी मागण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. पण आता तरी माफी मागतो. मी तुमचा गुन्हेगार आहे. मला ह्या कामाचे पैसे देण्यात आले होते. पण तेव्हा मला माहित नव्हते की, कोणाचा जीव देखील घेतला जाणार आहे. नाहीतर मी कधीच तयार झालो नसतो ह्या कामासाठी.” वीर हात जोडून सगळं कबूल करत होता. त्याच्या डोळ्यात पस्ताव्याचे पाणी होते. पण आता त्याला काही अर्थ उरला नव्हता, कारण जे व्हायचे ते होऊन गेले होते. वीरला त्याची चूक फार उशीर कळली होती. हे जर त्याच्या आधीच लक्षात आले असते तर राजेश्वरी आज जिवंत असती.


इंदुमती व चंद्रकांत त्याचे बोलणे ऐकत होते. ऐकून मनातून ते खूप दुःखी होत होते. श्रीवर्धनचा राग वाढत होता.


तितक्यात दुसऱ्या गाडीचा आवाज आला. ती गाडी होती ललित देशमुखांची.

घाईत ललित देशमुख गाडीतून उतरले. गणपत समोरच उभा होता.


“कोण कोण आलं आहे आत?” देशमुख बोलले.


“वीर साहेब आले आहेत. आता आहेत.” गणपत बोलला.

“पोलिस?”

“नाही आत्ताच थोड्यावेळ आधी सांगितलं आहे. येतील ते पण.” गणपत खाली मान घालून बोलला.


देशमुख काहीही न बोलता आत निघून गेले. चंद्रकांत पाटलांच्या खोलीत जाताच समोर वीर उभा दिसला आणि खाली चंद्रकांत आणि इंदुमती ह्यांचे शरीर होते.


“जे झाले ते वाईट झाले. त्यांचा असा अंत व्हावा अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. मला तर फक्त त्यांची इर्षा होती. व्यवसायात त्यांना नुकसान व्हावे असे वाटत होते. त्यांच्या मुलीचा जीव जवा असे कधीच वाटले नव्हते.” देशमुख बोलत होते. वीर बाजूला उभा राहून ऐकत होता.


“म्हणजे तुम्हाला देखील माहित नव्हते की राजेश्वरीला जीवे मारण्याचा प्लॅन आहे?” वीर एकदम चकित झाला.


“नाही. असे माहित असते तर मी त्यांची साथ कधीच दिली नसती. माझे चंद्रकांत पाटलांशी काहीच वैर नव्हते होती फक्त इर्षा, हेवा.” देशमुख बोलले.


“आता काय उपयोग आपल्या स्वार्थाने एक नाही तर तीन बळी घेतले आहेत. कुठे फेडणार आहोत आपण हे पाप देव जाणे.” वीर जड आवाजात बोलला.

निपचित पडलेले चंद्रकांत आणि इंदुमती सगळं ऐकत होते. सगळ्यांचे गुन्हे, खरे रूप समोर येत होते. पण अजूनही खरा गुन्हेगार पडद्याआड होता, त्याचीच ते प्रतीक्षा करत होते.


तितक्यात तिसऱ्या गाडीचा आवाज आला. तसे देशमुख सावध झाले.

“वीर ते येत आहेत. तेव्हा भावूक होऊ नकोस.” देशमुख बोलले. त्यांची नजर दोघांच्या मृत देहांकडे होती. आपण खूप मोठी चूक केली आहे हे त्यांना समजले होते.


वीरने पटकन डोळे पुसले आणि खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला त्याच्या बाजूला देशमुख देखील उभे राहिले.


गणपत ह्या वेळी देखील खोलीच्या बाहेर होता. गाडीचा आवाज आला तसा तो घराच्या मुख्य दारा जवळ धावत गेला.

मोठ्या गाडीतून चार व्यक्ती उतरल्या. मोठ्या दिमाखात चौघे घरात आले. घरात दुःखद घटना घडलेली असताना देखील त्यांचा तोरा कायम होता जसा नेहमी असे.

“नमस्कार बाईसाहेब.” गणपतने वाकून नमस्कार केला.


“कुठे आहे?” बोलताना डोळ्यातील आग आणि चेहऱ्यावरील गुर्मी स्पष्ट दिसत होती.


“साहेबांच्या खोलीत.” गणपत चंद्रकांत पाटलांच्या खोलीकडे बघत बोललं.

कडक इस्त्री केलेली साधी पण उंची साडी घातलेली ती झपाझप पावले टाकत त्या दिशेने गेली. तीच्या मागोमाग ते तिघे ही गेले.


खोलीच्या दाराशी पोहोचताच ती काही क्षण थांबली. खोलीच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या वीर आणि देशमुखांना खाल पासून वर पर्यंत बघितले आणि आत गेली.


“भैयासाहेब. काय केले तुम्ही हे? एकदा आमच्याशी बोलायचे होते. आपले दुःख सांगायचे होते. आम्ही होतो ना तुमच्या मदतीला.
वहिनीसाहेब तुम्ही देखील आम्हाला परके समजलात? दोघे असे अर्ध्यावर सोडून गेलात आम्हाला.” लीलावती म्हणजे चंद्रकांत पाटलांची धाकटी आणि एकुलती एक बहिण रडत बोलत होती.


“उठा ना दोघे. असे सोडून जाऊ नका आम्हाला. शेखर तुम्ही तरी उठवा भैया साहेबांना. तुमचे ऐकतील ते. तुम्ही तर त्यांचे खास मित्र आहात ना. सांगा ना शेखर.” लीलावती रडत होत्या.


त्यांच्या अशा रडण्याने इंदुमती आणि चंद्रकांत मनात हळवे होत होते. आपली बहीण आपल्यासाठी इतके रडते आहे. किती प्रेम करते आपल्यावर. वीर आणि देशमुख तर स्वार्थी आहेत. पण माझी बहीण तशी नाही. ह्या विचाराने ते सुखावत होते.


“ऋषभ आणि भूमी तुम्ही तरी उठवा तुमच्या मामासाहेबांना आणि मामीसाहेबांना. तुम्ही तर खूप लाडाचे आहात त्यांचे. तुमचं ते नक्की ऐकतील.* लीलावती त्यांच्या दोन्ही मुलांना बोलत होती.


चालेल प्रकार देशमुख आणि वीर कोपऱ्यात उभे राहून बघत होतें लीलावतींचे मिस्टर, मुलगा आणि मुलगी देखील बाजूला उभे राहून लीलावतीची अवस्था बघत होते.


रडता रडता लीलावली एकदम खाली जमिनीवर बसल्या. सुन्न होऊन. त्यांचे डोके देखील जमिनीवर टेकले होते. त्या अशा अचानक खाली बसताच शेखर, ऋषभ आणि भूमी त्यांच्या जवळ गेले.


क्रमशः


लीलावतीला काय झाले असेल? दादा आणि वहिनीच्या जाण्याचा धक्का पचवू शकेल का लीलावती? कळेलच पुढील भागात.