अग्निपरीक्षा ...  भाग १ 

-----

अग्निपरीक्षा ...  भाग १ 

रस्त्यावर माणसानं एवढीच गाड्यांची सुद्धा वर्दळ. आजूबाजूला मार्केट असल्यामुळे गोंधळही होताच. गाड्यांचे कर्ण - कर्कश आवाज तर कुठे भांडणाचे आवाज येत होते. त्यातच एक पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होती. सिग्नल लागतोय खरा पण गाड्यांनी सिग्नलचे नियम सुद्धा पाळायला हवेत ना ?  कदाचित या शहरामध्ये नवीन आहे ती. रस्ता क्रॉस करताना भेदरलेली दिसतेय. बराच वेळ रस्त्याच्या एका कडेला उभी होती आता मात्र धाडस करून रस्ता क्रॉस करतेय. ती रस्ता क्रॉस करून पलीकडे जाणार तोच एक भरधाव गाडी वेगाने तिच्या दिशेने आली. वेगाने येणारी गाडी पाहून तिला काहीच सुचलं नाही. अगदी रस्त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे होणं सुद्धा. गाडी तिच्या अंगावर आली आणि तिने हातातलं सामान तिथेच फेकून दोन्ही हात कानावर ठेवत एकच किंचाळी फोडली आणि...... काही क्षण सर्व शांत झालं. मार्केटमधला तो गोंगाट काही क्षण अगदी शांत झाला. 

ती गाडी अगदी २ इंच आधी थांबली. गाडीतून ' तो ' तिच्याकडे पाहू लागला. कानावर ठेवलेलं हात, वेणी घातली असली तरी कपाळावर भुरभुरणारे / उडणारे केस, निम गौर रंग, सरळ नाक, लांबसडक केसांचा शेपटा. क्षणभर तो आपण मार्केटमध्ये उभे आहोत हे सुद्धा विसरला. मागून दुसऱ्या गाडीने हॉर्न दिल्यावर तो या जगात परत आला. तिने सुद्धा हळूच डोळे उघडले आणि समोरच्या काचेतुनच त्याला पाहत आपलं सामान उचलून बाजूला झाली. तिच्या डोळ्यांमध्ये भीती अजूनही दिसत होती. त्याने गाडी पुढे घेऊन बाजूला लावली आणि पाण्याची बॉटल घेऊन धावत तिच्याजवळ आला. 

तिचं अंग अजूनही लटलट कापत होतं. डोळ्यांमध्ये भीती सोबतच अश्रूही दाटले होते. त्याने बॉटलच झाकण काढून बॉटल तिच्यासमोर धरली. तिने वर न पाहताच बॉटल घेतली आणि गटागटा पाणी पिऊ लागली. एकाच वेळी, एकाच झटक्यात तिने पूर्ण बॉटल संपवली. बॉटल पुन्हा त्याच्याकडे देत ती इकडे- तिकडे पाहू लागली. 

त्याने तिला विचारलं," कुठे जायचं आहे तुम्हांला ?" 

ती अजून घाबरून इकडे - तिकडे पाहू लागली, आपली ओढणी खांद्यावरून अजून घट्ट ओढून घेऊ लागली. तिची अवस्था पाहून तो म्हणाला," प्लिज , घाबरू नका. मला सांगा तुम्हांला नक्की कुठे जायचं आहे. मी सोडेन किंवा मग तुम्हांला रिक्षा किंवा बस करून देईन. " 

ती बोटांनी ओढणी मागे - पुढे करत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत तिची भीती स्पष्ट दिसत होती. ते पाहून तो म्हणाला," मॅडम, तुम्ही सांगाल का ? नक्की कुठे जायचं आहे तुम्हांला ?" 

तिने आता पहिल्यांदाच नजर वर करून 'त्याच्याकडे ' पाहिलं. मळके कपडे, शर्टाला ग्रीस लागलेलं. काळे झालेलं हात पण नजर मात्र प्रामाणिक. त्याच्याकडं पाहून तिने परत मान खाली घातली. 

तो," तुम्ही या शहरात नवीन आहात का ?" 

तिने मानेनेच होकार दिला.

तो," कोणा नातेवाईकांकडे आला आहात का ? आणि आता तुम्हाला पत्ता मिळत नाहीये. असं काही आहे का ?" 

ती मात्र मौनच.... 

तो हळूच तिच्या कानाजवळ जात म्हणाला," घरातून पळून आलात का ?" 

ते ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रुधारा बरसू लागल्या, अंग कापू लागलं. तिची अवस्था पाहून तो घाबरला आणि म्हणाला," अहो , प्लिज रडू नका. लोकं विचित्र नजरेने माझ्याकडे बघतायत. प्लिज." 

ती काकुळतीला येऊन म्हणाली ," मला भूक लागलीये." 

तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती मात्र मान खाली खालून मुसमुसू लागली. तिला तस पाहून तो भानावर आला आणि म्हणाला," मला पण भूक लागलीये. चला आपण बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन थोडं खाऊयात. " 

तो पुढे चालत होता आणि ती त्याच्या मागे - मागे. थोडंच पुढे असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये ते जाऊन बसले. तिने अजूनही आपली बॅग घट्ट धरली होती. तिच्याकडे पाहत तो म्हणाला," ती बॅग बाजूला ठेवून निवांत बसा. " 

तिने मान डोलावत हळूच हातातली बॅग बाजूला ठेवली. त्याने तिला परत विचारलं," काय खाणार ?" 

ती कधी त्याच्याकडे तर कधी जमिनीकडे पाहत म्हणाली," अहो , पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. ट्रेनमध्ये कोणीतरी माझी पर्स मारली. त्यामुळे......" 

तो," हरकत नाही. पैसे मी भरतो. तुम्ही बोला काय खाणार ? "

ती खाली मान खालून म्हणाली," तुम्ही जे मागवाल ते चालेल. " 

त्याने तिथल्या पोऱ्याला आवाज देऊन २  डोसे मागवले. तिला ऑकवर्ड वाटू नये म्हणून तो मेनू कार्ड मध्ये डोकं घालून बसला. आता मात्र ती त्याच्याकडे पाहत होती. ५.८  ते ६ फूट उंची, सावळा पण सुंदर चेहरा, रुबाबदार मिश्या, पिळदार शरीर. त्याचे कपडे पाहून तो कोणत्या तरी गॅरेज मध्ये काम करत असावा असा कयास तिने बांधला. 

थोडयाच वेळात गरमागरम डोसे टेबलवर आले. ती मात्र तो डोसा पाहत होती. त्याने त्याचा डोसा घेऊन खायला सुरुवातही केली. ती त्याच्याकडे पाहत त्याच्याप्रमाणे डोसा खाऊ लागली. तो तिची डोसा खाताना होणारी कसरत पाहत होता. त्याने तिला विचारलं," तुम्ही डोसा पहिल्यांदा खाताय का ?" 

तिने मानेनेच होकार दिला. 

तो दिला डोसा कसा खायचा हे सांगू लागला. एवढ्या वेळात तिला त्याच्यातला प्रामाणिकपणा कळला होता.

तो म्हणाला," माझं नाव ' अजिंक्य '.

ती," माझं ' प्राजक्ता '. 

अजिंक्य ," मग प्राजक्ता आता जर माझ्याबद्दल भीती वाटत नसेल तर मला सांगाल ? तुम्हांला नक्की कुठे जायचं आहे ? कारण मी पाहिलं तुम्हांला शहरात जुळवून घेता येत नाहीये. अजून त्रास होण्यापेक्षा तुम्ही मला सांगा , मी तुम्हांला तिथे सोडतो. " 

प्राजक्ता धीर करून बोलते," माझं या शहरातच काय तर या जगात सुद्धा कोणी नाहीये. आई - वडील माहीतच नाहीत. दूरच्या काका- काकींकडे वाढले. लहानपणापासून हाल- अपेष्टा सहन केल्या. आता पैसे घेऊन ते माझं लग्न लावत होते. म्हणून मी माझ्या जवळ जे थोडे पैसे होते ते घेऊन तिथून पळाले. स्टेशनला आल्यावर जी ट्रेन दिसली त्यात बसून येथे आले तर कोणीतरी माझी पर्स मारली. मी दोन दिवस स्टेशनमध्येच बसून होते. सकाळी मला तिथून काही जणांनी हाकललं. दोन दिवस जवळ पैसे नाहीत म्हणून जेवले सुद्धा नव्हते. मी कधीच गावाच्या बाहेर पडले नाही म्हणून मला नाही कळत इथे कसं वावरायचं ? त्यामुळे मला खूप भीती वाटतेय. रेल्वे स्टेशनला सुद्धा मी पोलीस चौकीच्या बाजूलाच बसून होते. बाहेर पडल्यापासून सगळीकडे भीतीदायक वातावरण पाहतेय. कोणाला काही विचारायला जावं तर अंगावर ओरडुनच बोलतात. तुम्ही मला जेवू घातलंत , तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. " प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आणि हात जोडलेले होते. 

अजिंक्य तिचे हात खाली करत म्हणतो," अहो , असं काय करताय ? प्लिज असं करू नका." 

अजिंक्य पुढे म्हणतो," बरं मग आता पुढे काय करणार ?" 

प्राजक्ता," माहित नाही. वाट नेईल तिकडे जायचं." 

अजिंक्य काहीसा विचार करत म्हणाला," तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू ?" 

प्राजक्ता," बोला ना. " 

अजिंक्य," जेथे मी राहतो, तिथे बाजूच्या रूममध्ये जाधव काकी म्हणून राहतात. त्यांच्याच कडे मी जेवायला आहे. त्यांना कामात मदत करायला एक मदतनीस हवीच आहे. जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे राहू शकता. म्हणजे तुमची सुद्धा सोय होईल आणि काकींचा सुद्धा प्रश्न सुटेल."

प्राजक्ता," त्या मला कामाला ठेवतील पण घरी का ठेवतील ?" 

अजिंक्य ," अहो त्या एकट्याच राहतात. त्यामुळे त्या घेतील तुम्हाला ठेवून. मी बोलतो तसं त्यांच्याशी. अर्थात तुम्हाला हरकत नसेल तर."

प्राजक्ता," हरकत ? त्याच्या डोक्यावर छपरं नाही, त्याला जर एक छत मिळत असेल तर तो का हरकत घेईल ?"

अजिंक्य ," मग निघुयात ?

प्राजक्ताने मान डोलावली आणि अजिंक्य बिल भरून तिच्यासोबत निघाला.

क्रमश : ..........   

( असं एका भेटीत विश्वास ठेवून एखाद्यासोबत जाणं प्राजक्ताला भारी पडणार की, अजिंक्य आपल्यावर ठेवलेला विश्वास जपणार ? पाहुयात पुढील भागात.)

🎭 Series Post

View all