Login

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 32

Tichya angat chandika sanchrli hoti

अहिल्या संघर्ष मातृत्वाचा... भाग 32


आधीच्या भागात आपण पाहिले की,


झाशीला पळवून नेऊन तिच्यावर दुष्कर्म करण्यात आले.
विठ्ठल झाशीला घेऊन संस्थेत आला. हे सगळं बघून अहिल्याला  खूप मोठा धक्का बसला.


विठ्ठल सदानंदच्या घरी गेला पण त्याच्याशी भेट होऊ शकली नाही.


विठ्ठल झाशीला घेऊन जात होता तेवढ्यात पाठीमागून अहिल्या ओरडली.


“माझ्या लेकीला घेऊन कुठे चाललास?” अहिल्या पाठीमागून रडत रडत आली.


आता पुढे,


जड अंतःकरणाने झाशीचा अंतिम विधी पार पडला. या घटनेमुळे सगळयांनाच धक्का बसला होता. गावात निरव शांतता पसरली होती. अहिल्या अजूनही त्याच धक्क्यात होती. कित्येक दिवस निघून गेले. प्रताप आणि उषा अहिल्याच्या भेटीला आले.


दारातच विठ्ठलला बघून प्रतापने विचारलं.

“कशी आहे अहिल्या?” प्रतापने काळजीने विचारलं.


“आहे तशीच आहे. एकाच ठिकाणी बसलेली असते. काही खात नाही. कुणाशी बोलत नाही. मी काही बोलायला गेलो की मला बाहेर काढून दार लावून घेते. तुम्हीच दोघे आता तिला समजवा.” विठ्ठलने प्रतापला सांगितलं.


उषा आणि प्रताप दोघेही अहिल्याच्या खोलीत गेले. अहिल्या डोळे मिटून खुर्चीवर बसलेली होती.


उषाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. अहिल्याने हळूच डोळे उघडले. उषा तिचा हात हातात घेऊन बसली.


“अहिल्या किती दिवस अशीच बसून राहणार आहेस. तू तर अगदी धाडसी स्त्री आहेस ना. मग आता अशी का वागतेस? मी तुझं दुःख समजू शकतो, अग पण तू अशीच बसून राहिलीस तर कसं चालेल. झाशी तुझं सर्वस्व होतं. पण त्या इतर मुली, अग त्या सगळ्या तुझ्यावर अवलंबून आहेत.

गायत्री तिला तुझी गरज आहे. गोजिरीला विसरलीस? त्या कोवळ्या जीवाला तुझी गरज आहे. तुला असं बसून कसं चालेल?” प्रताप तिच्या बाजूला बसून बोलत होता.


“बरोबर बोलत आहेत हे,ताई तुम्ही अश्याच वागत राहिलात तर बाकीच्यांना तुमच्या वागण्याचा त्रास होईल, स्वतःला सावरा तुम्ही. यातून बाहेर पडा. इतरांना तुमची गरज आहे, स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे रहा.” उषा पण अहिल्याला समजावत बोलली.


बराच वेळ होऊनही अहिल्या काहीच बोलली नाही, ती काहीच बोलत नाही बघून उषा आणि प्रताप तिथून निघून गेले. 


दोन दिवसांनंतर अहिल्या जागेवरून उठली. विहिरीजवळ गेली. विहिरीतून पाणी काढून  अंगावर घातलं. त्या थंडगार पाण्याने तिचे अंग शहारले.  आत आली,तयार झाली आणि पुन्हा तिचे कार्य करायला सज्ज झाली.


काही वेळाने अहिल्या संस्थेत गेली.


“ताई अग किती दिवसापासून तुझी वाट बघत होतो. तुझ्याशिवाय ही लेकरे पोरकी झाली होती ग.” संजयने  अगदी आतुरतेने अहिल्याला सांगितलं. अहिल्या आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.


अहिल्याने गोजिरीला हातात घेतलं आणि छातीशी कवटाळून खूप रडली.


थोडयावेळ  ती तशीच बसून होती. मग उठली आणि पदर कमरेला खोचून उभी झाली जणू मनाशी काहीतरी गाठ बांधतेय.  तिथून तडक निघाली ते थेट सदानंदच्या घरी पोहोचली. तो खाली पडला होता, अवस्था बघून असं वाटतं होतं जणू दारू पिऊन पडलाय.

अहिल्या त्याच्या जवळ गेली. त्याच्या शर्टाची कॉलर पकडली. त्याला खेचत बाहेर आणलं.

खेचत बाहेर आणताना तो थोडा जागा झाला. त्याने हालचाल केली. स्वतःला तिच्यापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागला. पण अहिल्याने पकड आणखीनच घट्ट केली. सदानंद ओरडायला लागला, त्याच्या आवाजाने बाहेर लोकं जमा व्हायला लागली. अहिल्याने बाजूला पडलेला लाकडी बांबू हातात घेतला. आणि सदानंदला त्या बांबूने मारायला सुरुवात केली.


तिच्या अंगात जणू चंडिका संचारली होती.


“नराधमा , माझ्या इवल्याश्या जीवावर अत्याचार केलेस तू. तिच्याशी असं दुष्कर्म करण्यासाठी तुझे हात कसे धजले?हे करण्यापूर्वीच तुझे हात तुटायला हवे होते. पण जे आधी झालं नाही ते मी आता करणार आहे, आज मी तुला जिवंत ठेवणार नाही. तुला शिक्षा मिळायलाच हवी.”


अहिल्याने त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारलं. विठ्ठल आला आणि त्याने तिच्या हातून बांबू खेचला. तिला मागे ओढलं.


“काय करत आहेस? त्याला मारून तुझी झाशी परत येणार आहे का?” स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याला शिक्षा नक्की होईल.  तू चल घरी.”


विठ्ठल अहिल्याला घरी घेऊन गेला. ती आता बऱ्यापैकी शांत झाली.


क्रमशः