Login

अहिल्या- सामान्य ते असामान्य प्रवास (भाग- २)

अहिल्याबाई होळकर यांचा सामान्य मुलीचा असमान्य प्रवास सांगणारी कथा
अहिल्या- सामान्य ते असामान्य प्रवास

भाग- २

मल्हाररावांनी अहिल्याला मागणी घातली याचा खूप आनंद अहिल्याच्या आईबाबांना झाला. त्या काळी खरं तर स्त्री शिक्षणाची बीजे रूजलेली किंवा एवढे प्रचलित नव्हते तरीही माणकोजीनी अहिल्याला शिकवायला सुरू केली होती. तिचा भविष्याचा विचार करून त्यांनी होळकरांचा प्रस्तावाला होकार दिला.

काही दिवसांनी अहिल्या व खंडेराव यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. ती होळकरांची कुलवधू बनली. मल्हारराव आणि त्यांची पत्नी गौतमाबाई यांनी तिला आईबाबांचे प्रेम दिले. विवाहनंतर अल्पावधीतच अहिल्याने तिच्या चतुर, शांत व क्षमाशील स्वभावाने होळकर कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरूषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालिन दरबाराची मोडी मराठी लिहिणे, वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या तसेच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे व दांडपट्टा फिरवणे, युध्दाचे आणि राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्र व्यवहार करणे, न्यायनिवडा करणे, इत्यादीचे प्रशिक्षण दिले. परिणामी अहिल्याची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली.

खंडेरावांना आधी कशातच रस नव्हता पण अहिल्याच्या सहवासात ते पूर्ण बदलून गेले. आधी  युध्द व राजकारण यावर लक्ष न देणारे खंडेराव आता जातीने लक्ष देऊ लागले. तिच्यासोबत त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. ती छान संसारात रमली होती. पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. तो दिवस तिच्यासाठी काळा दिवस ठरला.

खंडेराव कुंभेरीच्या लढाईला गेले होते. आज सकाळपासूनच अहिल्याला थोडे विचित्र आभास होतं होतं. न जाणे का मन घाबरत होतं.

"या आधीही हे खूप वेळा लढाईला गेलेले पण आज मन इतकं अशांत व अस्वस्थ का आहे? शंभू महादेवा काही वाईट वार्ता कानावर येऊ देऊ नका." ती मनातच महादेवाचा धावा करत होती.

तेवढ्यात नको ती खबर तिच्या कानावर आलीच. खंडेराव कुंभेरीच्या युध्दात वीरमरण आले याची. ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. वय अवघे एकोणतीस या वयात वैधव्य आले. त्यावेळी सती जाण्याची अनिष्ट प्रथा होती. सती जाण्यासाठी तिने पूर्ण तयारी केली होती.

पेशव्यांच्या मोहिमेवर असलेल्या मल्हाररावांना ही वार्ता कळली आणि ते लगबगीने तिच्याजवळ पोहोचले. सती जाण्यापासून रोखत ते तिला कळकळीच्या विनंती सूरात म्हणाले, "सती जाऊ नकोस पोरी, तू गेलीस तर, आमचं काय होईल? खंडेराव तर आम्हाला सोडून गेले. तूही गेलीस तर कसे चालेल? हे राज्य, ही प्रजा कोण सांभाळेल? इतका मोठा डोलारा आमच्या एकट्याने नाही सांभाळले जाणार. तेव्हा तूच विचार कर. आता तूच आमची खंडेराव, पोरी तूच आमचा मुलगा आहेच."

मल्हाररावांची ही करूण बोलणं ऐकून अहिल्या सद्गतीत झाली. तिचे मन हेलावले. तिला त्यांचे बोलणं मनाला भिडून गेले. त्यांच्यामुळे तिने जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून पुरोगामित्वाचा परिचय दिला. सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करून अहिल्याने जे मनोधैर्य ते अद्वितीय होते. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही हे कोण जाणे परंतु आपण जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल हा विचार करून तिने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला. धर्म, रूढी व परंपरा यापलीकडे कर्तव्य महत्त्वाचे मानून रयतेला कल्याणाकारी राज्य बनवण्याचा चंग बांधला.

मल्हारराव व गौतमाबाई यांच्या साथीने दोन मुलांसह अहिल्याला पुन्हा प्रजेसाठी झटू लागली. अशातच आईसमान सासू गौतमाबाई इहीलोकी गेल्या. ते गेल्यानंतर मल्हारराव खचून गेले. आधीच पुत्रवियोगाने ते खचले होते, त्यात आता पत्नीवियोगाची भर पडली. त्यात वयानुसार ते थकले होते. काही वर्षांनी मल्हाररावांचीही देवाज्ञा झाली. आता तर अहिल्या पूर्ण पोरकी झाली. मल्हारराव तिचे सासरे नव्हते तर ते तिचे दुसरे वडिलच होते. एकामागून एक दुःखांचे डोंगर कोसळत होते. नियती अजून किती परीक्षा घेणार होती कोणास ठाऊक? पण अहिल्या सगळे दुःख पचवून पुन्हा नव्या उमेदीने उभी राहत होती.

मल्हाररावाच्या मृत्यूनंतर तिने मुलगा मालेराव याला गादीवर बसवले. पण मुलाचे सुखही तिच्या नशिबी नव्हते. नियतीने पुन्हा डाव साधला. एका आजारपणात मालेराव मृत पावले. सासऱ्यांचे दुःख विसरत नाही तोच पुत्रशोक तिच्या नशिबी आले. अशी एका मागून एक दुःखाची मालिका होत राहिली तरीही अहिल्या धीराने जनतेच्या सुखांचा विचार करत होती. आता वारसच नाही राहिला म्हटल्यावर शत्रूंना वाटलं अहिल्याचं राज्य बळकवण्याची चांगली संधी मिळाली. ही एकटी अबला नारी काय करेल या विचाराने अनेक शत्रूंनी तिच्या राज्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला ; परंतु अहिल्याचे सैन्याचे प्रशिक्षण कामी आले. तिने महिलांची सैन्य फौज सज्ज केली. त्यांना हाताशी घेऊन तिने शत्रूंना पळवून लावले. प्रसंगी तलवार घेऊन रणरागिणीही ती बनत होती. 

अशातच अहिल्यांच्या एका मंत्र्याच्या कटकारस्थानाने पेशवा रघुनाथराव याला हाताशी धरून इंदौरवर चालून यायला सांगितले. रघुनाथरावालाही होळकरांच्या राज्याचा आणि दौलतीचा लोभ सुटला. त्याला ही आयती चालून आलेली संधी सोडायची नव्हती. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलिन करण्यासाठी पन्नास हजार सैन्याची फौज घेऊन इंदौरवर चढाई केली.

क्रमशः

काय करेल अहिल्या? कसे प्रत्युत्तर देईल? या नवीन संकटाचा कसा सामना करेल? रघुनाथराव बळकावू शकेल का होळकरांचे राज्य?

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

सदर कथा गुगल व यू ट्यूबवरील माहितीच्या आधारे लिहिली आहे. काही चूक भूल झाली असेल क्षमा असावी.


🎭 Series Post

View all