अहिल्या- सामान्य ते असामान्य प्रवास
भाग- ३ (अंतिम)
अशातच अहिल्यांच्या एका मंत्र्याच्या कटकारस्थानाने पेशवा रघुनाथराव याला हाताशी धरून इंदौरवर चालून यायला सांगितले. रघुनाथरावालाही होळकरांच्या राज्याचा आणि दौलतीचा लोभ सुटला. त्याला ही आयती चालून आलेली संधी सोडायची नव्हती. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलिन करण्यासाठी पन्नास हजार सैन्याची फौज घेऊन इंदौरवर चढाई केली.
हे वृत्त तेजस्विनी अहिल्याला कळताच ती खचून न जाता तिने रघुनाथरावांना एक खलिता पाठवला. ज्यात तिने लिहिले होते, "आपण आमचे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात. आमच्याकडील फितुराला गाठले. मला दुबळी समजतात की खुळी? दुःखात बुडालेल्यास अधिक दुःखात बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू कळतं नाही का मला? आता आपली गाठ रणांगणात पडेल! माझ्यासोबत युध्दात पारंगत असलेल्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती होईल तुमची सगळीकडे ; पण जर आपण हारलात तर आपणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. एका नारीकडून हार झाली म्हणून तुमचेच हसू होईल. तुमचे हसू व्हावे असे वाटत नसेल तर आपण लढाईच्या भरीस न पडलेलेच बरे राहिलं. मी अबला आहे असे मुळीच समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर मी पेशव्यांना भारी पडेन. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. तेव्हा हुशार. पुन्हा एकदा सांगतेय अबला समजण्याची चूक मुळीच करू नका. नंतर म्हणू नका आधी का सांगितले नाही म्हणून? तेव्हा विचार करा."
अहिल्याचा हा खलिता वाचल्यावर रघुनाथरावाचे धाबे दणाणले. त्यास त्यांनी त्वरीत उत्तर दिले, "आहिल्या, आपला गैरसमज झाला आहे. आम्ही युध्द करण्यासाठी नाही तर आपल्या पुत्राच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी येत आहोत. "
त्यावर विद्वान अहिल्येने उत्तर पाठवले," जर तुम्ही माझ्या मुलाचा शोक व्यक्त करण्यास येत आहात तर मग इतकी सैन्याची फौज का सोबत आणत आहात? हा माळवा आणि येथील प्रजा तुमचीच आहे. तुम्ही एकट्याने आमच्या भेटीला कधीही येऊ शकता, तुमचे स्वागत होईल."
तिच्या उत्तराने रघुनाथराव लज्जित झाले. एकट्याने येऊन तिची भेट घेऊन निघून गेले. अशा प्रकारे अहिल्याने युध्द न करता बुद्धीचातुर्याने व मुत्सद्दीने समोरच्या गार केले. या घटनेने प्रजेचे अहिल्यावर असलेला आदर कैकपटीने वाढला.
इंदौरच्या महालात आपल्या मुलगा, पती आणि सासऱ्यांच्या आठवणी जोडल्या असल्याने तिने तेथील कारभार मल्हारराव यांचे मानसपुत्र तुकोजीराव जे की त्यांना अत्तापर्यंत साथ दिली होती. त्यांच्या हाती सारी सूत्रे सोपवून ती नर्मदा नदीकाठी असलेल्या महेशमती नंतरचे नाव महेश्वर येथे जाऊन वास्तव्य करू लागली आणि तेथूनच राज्याच्या कारभाराचा गाडा हाकू लागली.
तिने नेहमीच लोककल्याणाचा विचार केला. पंथस्थांना विसावा भेटावा म्हणून झाडे लावली, धर्मशाळा बांधले. अनेक मंदिरे बांधली व जुन्या मंदिरांचे जीर्णोध्दार केला.
प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि प्रजेला चोर, लुटारू आणि दरोडेखोर, डाकू यांच्याकडून खूपच त्रास होत असे. यांनी सर्वत्र धुमाकूळ माजवला होता. ही गोष्ट अहिल्याच्या कानावर गेली तेव्हा तिने दरबार भरवला आणि एक घोषणा केली," जो युवक चोर, दरोडेखोर व डाकूंचा बंदोबस्त करेल त्याच्यासोबत माझी मुलगी मुक्ताबाईचा विवाह होईल."
त्यावेळी तर बालविवाह करण्याची प्रथा होती पण अहिल्याने आपल्या मुलीचा विवाह ती उपवर झाल्यावरच केले आणि त्यातच शास्त्रीय पंडितांना रूचणारी गोष्ट नव्हती आणि जातीधर्म मानणाऱ्या लोकांनाही तिचा निर्णय पटला नव्हता ; पण तिने त्याची पर्वा केली नाही.
तडफदार तरूण यशवंतराव फणसे याने तो विडा उचलला आणि त्याने ती प्रतिज्ञा यशस्वीपणे पूर्ण करूनच आला. मग शब्द दिल्याप्रमाणे तिने जातीधर्माचा विचार न करता थाटामाटात त्या दोघांचा विवाह करून दिला. अशाप्रकारे अहिल्याने राज्यात शांती प्रस्थापित करून दिली आणि आपल्या मुलीसाठीही उचित वराची निवडही कुलशतेने पूर्ण केलं.
मुलीच्या लग्नानंतर तरी सौख्याचे दिवस येतील असे तिला वाटले. तसे तर तिचे देशभर कार्य चालूच होते. पण व्यक्तीगत आयुष्यात स्थैर्य येतच नव्हते. पुन्हा कटकारस्थानाना समोरे जावे लागले. तेव्हा अहिल्या रणरागिणी बनून त्या कटकारस्थानांना पाणी पाजले.
नंतर लवकरच नातू जन्माला आला. बऱ्याच काळानंतर आलेला हा तिच्यासाठी अगदी आनंदाचा, सुखाचा काळ होता. पण नियतीला ते सुखही बघवले नाही. आपल्या उतार वयात त्याला अंगाखांद्यावर खेळवण्याचे तिचे स्वप्न होते. ते स्वप्न स्वप्नच राहिले. त्याचेही अल्पशा आजाराने मृत्यू झाला. हे दुःख संपते तोच आणखी एका दुःखाला तिला सामोरे जावे लागले. दुःखाचे भोग संपता संपत नव्हते. मुलांसमान जावई यशवंतरावांनाही आजारपणाने मरण आले. मुलगी मुक्ताबाईने त्याच्यासोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. अहिल्याने खूप आर्जव करून तिला सती जाण्यास रोखण्याचा प्रयत्न केला पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. मुक्ताबाईने यशवंतरावाचे डोके मांडीवर घेऊन धगधगत्या ज्वालेत स्वतःला झोकून दिले. अहिल्याने आक्रोश केला त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर मात्र बघण्याशिवाय अहिल्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यावेळी तिचा देह निष्प्राण झाल्यासारखा वाटलं. कितीही कणखर दाखवत असले तरी शेवटी एकाकी जीवन वाट्याला आल्यावर काय करणार? किती आणि काय परिक्षा देणार ? त्यालाही अंत असतोच ना. धगधगत्या आयुष्याने अहिल्या बनली. जेवढी मंदिरे, धर्मशाळा, इ. तिने लोकोपयोगी कामे केली. ते कायम लक्षात राहिली. तिच्या वेदना, एकाकीपणा मात्र तिच्या देहासोबत नष्ट झाल्या.
समाप्त-
स्त्रीची अनेक रूपे अहिल्याच्या रूपाने कळली. ती प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देऊ शकते. प्रसंगी काळजावर दगड ठेवून तिला दुःख पचवाव लागतं. प्रत्येक नाती ती व्यवस्थित पार पाडते. कर्तव्य व जबाबदारी नेटाने पार करते, हे या अहिल्याच्या कथेतून दिसून येते.
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
सदर कथा गुगल व यू ट्यूबवरील माहितीच्या आधारे लिहिली आहे. काही चूक भूल झाली असेल क्षमा असावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा