Login

अहिल्या- सामान्य ते असामान्य प्रवास ( भाग- १)

अहिल्याबाई होळकर यांचा सामान्य मुलीचा असमान्य प्रवास सांगणारी कथा
अहिल्या- सामान्य ते असामान्य प्रवास

भाग- १

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||

एक छोटीशी सात ते आठ वयोगटातील चुणचुणीत मुलगी आपले छोटे हात जोडत, हरणासारखे सुंदर असलेले डोळे मिटून शिवशंभोच्या पिंडीसमोर आपल्या मधुर वाणीत महादेवाची शांत चित्तेने आराधना करत होती. संपूर्ण देवालयात तिची ती मधुर वाणी घुमत होती.

तेवढ्यात घोड्यांचा टापांचा आवाज घुमू लागला. पण तिला मात्र तिचा काही फरकच पडला नाही. ती तिच्याच नादात होती. तिची ती आधाराना ऐकून मुख्य घोडेस्वाराने घोड्याची लगाम खेचून घोडा थांबवला आणि त्या महादेव मंदिराच्या पायऱ्या चढून तो आत आला. त्या मुलीची प्रसन्न मुद्रा आणि ती मधुर वाणीने तो मात्र प्रवासातला सर्व शीण विसरून गेला आणि आपोआपच त्याचे हात जोडले जाऊन डोळेही मिटले गेले. तिची आराधना संपताच तिने मनोभावे महादेवाला नमस्कार केला. हसतमुख चेहऱ्याने ती बाहेर पडली. तो घोडेस्वार प्रमुखही महादेवाला नमस्कार करून तिच्यामागे गेला.

ती वाटेत भेटणाऱ्या माणसांशी अगदी प्रेमाने बोलत ज्यांना मदत लागते त्यांना मदत करत जात होती. ती जनावरांशीही अगदी मायेने कुरवाळत बोलत होती. त्याने त्या मुलीची चौकशी केली तर कळले की ती तर इथल्या गावचे पाटील माणकोजी शिंदे यांची मुलगी अहिल्या होती.

तो घोडेस्वार प्रमुखही कोणी असा तसा साधासुधा माणूस नव्हता तर ते होते होळकर घरण्याचे संस्थापक आणि युद्ध भूमीवर लढणारे शूरवीर लढवय्ये मल्हारराव होळकर.

अहिल्याला बघताक्षणी त्यांचा मुलगा खंडेरावसाठी हीच मुलगी योग्य आहे असे त्यांच्या मनाला वाटले. होळकरांची कुलवधू आता अहिल्याच होणार हा निश्चय मनात करत ते माणकोजीच्या घरी पोहोचले.

अहिल्याने त्यांना मंदिरात पाहिले होते. आपल्यामागे येणाऱ्या त्यांना पाहून ती कपाळावर आट्या पाडत कमरेवर एक हात ठेवून म्हणाली, "तुम्ही माझ्या मागे का येत आहात? माझ्या घरी यायचं का तुम्हाला? गावात नवीन दिसताय. मग तुम्ही आमच्या गावचे पाहुणे झालात. हे पाहा माझे घरही आले, आता सांगा बघू?" तिची अविरत बडबड चालू होती. त्यांना बोलण्याची संधीही देत नव्हती. तिची बडबड ऐकून मल्हारराव गालात हसत होते. तिची ती बडबड त्यांच्या कानाला खूपच भावली.

मल्हाररावांचे सोबती तिला काही बोलणार तोच त्यांनी त्याला डोळ्यांनेच शांत राहायची खूण केली. तिची बडबड ऐकून तिचे आईबाबा घरातून बाहेर आले.

"अहिल्या, कोणाशी बोलतेस तू?" माणकोजी घरातूनच बाहेर येत विचारले.

"आबा, हे पाहुणे मला मंदिरात भेटले अन् आता माझ्यामागे इथपर्यंत आले. म्हणून मी विचारत होते त्यांना तर ते काहीच बोलत नाहीत." अहिल्या मल्हाररावाने बोट करत म्हणाली.

"अगं हो हो, जरा तर उसंत घे. तू बोलणं थांबवशील तरच ते बोलतील ना. कवापासून तुझीच बडबड चालू हाय." माणकोजी हसत तिच्या डोक्यावर थोपटत त्यांच्याकडे पाहत म्हणाले.

तेव्हा अहिल्या दाताखाली जीभ चावत कानाला हात लावत घरात पळून गेली. ती गेलेली पाहून मल्हारराव हसू लागले.

"माफी करा जी. पोरं लहान अन् लय बडबडी बी हाय. तुम्ही गावाचे पाहुणे हायसा आणि म्या गावचा पाटील या नात्याने तुमचा स्वागत करतो. या बसा की." माणकोजीही हसत हात जोडत म्हणाले.

अहिल्याच्या आईला गुळ पाणी आणण्याची खूण केली तशी ती डोक्यावरील पदर नीट सावरत मान डोलावत आतल्या खोलीत निघून गेली.

मल्हारराव त्यांना हसत म्हणाले, "अवं, माफी कशासाठी? अस हात जोडू नका तुम्ही. तुमची पोरं लय छान आहे. लहान आहे पण खूप गुणी आहे."

"व्हयं जी. पर तुम्ही कोण हे कळेल का? " माणकोजीने विचारले.

"आम्ही इंदौरचे सुभेदार मल्हारराव होळकर आहोत." मल्हारराव बाजावर बसत म्हणाले.

एवढ्या मोठ्या आसामीचे पाय आपल्या घराला लागले. आजपर्यंत त्यांच्या लढाईची कीर्ती फक्त ऐकले होती तेच बडे प्रस्थ आपल्या घरात बसले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलत आहोत हे सगळे माणकोजीना स्वप्नवत वाटत होते.

"तुमचे पाय आमच्या उंबऱ्याला लागले धन्यच झालो की आम्ही." माणकोजी मान खाली घालून कमरेत वाकून आबदीने म्हणाले.

"अरे, असे नका हो करू. आम्ही कोणी एवढे मोठे नाही आहोत. उलट तुमच्याकडची अनमोल गोष्ट आम्ही मागायला आलो आहोत. द्याल का तुम्ही?" मल्हारराव उठून उभे राहतं त्यांचे हात हातात घेत म्हणाले.

"आवं, पण माझ्याकडं असं अनमोल काय बी नाय. फक्त एवढं घर अन् एक थोडंस जमीनीचा तुकडा, काही मेंढर सोडलं तर." ते नक्की कशाबद्दल बोलत आहेत हे न कळल्याने माणकोजी गोंधळून म्हणाले.

"ते नाही ओ, त्यापेक्षाही अनमोल गोष्ट आहे तुमच्याजवळ." मल्हारराव त्यांचे डोळे वाचत म्हणाले.

"पर काय वं, समजना बघा, तवा वाईस फोडून सांगा बरं." माणकोजी हलके हसत म्हणाले.

"तुमची अहिल्या." मल्हारराव आता त्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाले.

"काय? माझी आहू ; पण ते कसं?" माणकोजी गोंधळून म्हणाले.

गुळपाणी घेऊन येणारी त्यांच्या पत्नीही मल्हाररावाचे बोलणे ऐकून स्तब्ध झाली.

माणकोजीचे बोलणे ऐकून मल्हारराव हो मध्ये मान डोलावत म्हणाले," हो, माणकोजी. आमच्या खंडेरावसाठी आम्ही तुमच्या अहिल्याचा हात मागतोय."

क्रमशः

अहिल्या बनेल का होळकरांची कुलवधू? कसा असेच तिचा राणीचा होण्याचा प्रवास? वाचा पुढील भागात..

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा- २०२५

सदर कथा गुगल व यू ट्यूबवरील माहितीच्या आधारे लिहिले आहे. काही चुक भूल झाली असेल क्षमा असावी.

🎭 Series Post

View all