अहिल्या संघर्ष मातृत्वाचा भाग 38
आधीच्या भागात आपण पाहिले की,
गायत्री अजय सोबत बोलत नव्हती. तिला मुलांशी बोलायला भीती वाटायची. हे सगळं ती अहिल्या जवळ बोलली.
अहिल्याने तिला मैत्रीविषयी छान समजावून सांगितलं. गायत्री आणि अजयची भेट झाली. दोघेही छान बोलले.
त्यानंतर गायत्री तिथून निघाली तर वाटेत तिची सदानंदशी गाठ पडली. त्याची वाईट नजर होती. गायत्री कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून घरी आली. अहिल्याला गायत्रीची खूप काळजी वाटायला लागली. गायत्रीने तिला समजावले की तू काळजी करू नकोस मी माझी काळजी घेईल. तिने अहिल्याला समजावलं.
आता पुढे,
गायत्री संस्थेत गेली. छोट्या छोट्या मुली खेळत बसल्या होत्या. गायत्रीच्या डोक्यात कल्पना आली. आज काहीतरी भन्नाट उपक्रम करूया त्यानिमित्ताने मुलींना मजा वाटेल. तिने कोळशाचा तुकडा घेतला आणि जमिनीवर काहीतरी चित्र काढायला सुरुवात केली.
तिचे चित्र बघून बाकीच्या मुलींनी पण कोळस्याचे छोटे-छोटे तुकडे आणले आणि त्यांनी पण जमिनीवर, भिंतींवर काही चित्र काढायला सुरुवात केली. कपड्याने पुसायचे आणि काढायचे. त्या मुलींना खूप मजा वाटायला लागली आणि काही काही मुलींची चित्र खूपच सुंदर झाली होती. दिवसभर त्यांनी हेच खेळ खेळले.
दुसऱ्या दिवशी गायत्री सर्व मुलींना शेतात घेऊन गेली. शेतात सर्व मुली खूप छान खेळल्या.
अहिल्याने झाडावर झोपाळा बांधून दिलेला होता. त्या झोपाळ्यावर मुली खूप झुलल्या आणि गायत्री पण झुलली.
सगळ्या मुलींनी खूप खूप मजा केली. त्यानंतर सगळ्यांनी आपापल्या डब्यातले जेवण केलं.
गायत्रीने सगळ्यांना गोल गोल बसवलं. त्यांच्या हातात एक रुमाल दिला आणि आईचं पत्र हरवलं खेळाविषयी माहिती दिली आणि खेळाला सुरुवात केली. एक मुलगा हातात रुमाल घेऊन सगळ्यांच्या भोवती फिरायचा आणि आईचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं माझ्या आईचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं असं म्हणत म्हणत गोल गोल फिरायचे एखाद्याच्या पाठीवर थाप मारुन जायचा. सगळ्यांना हा खेळ खेळण्यात खूपच मजा आली.
अहिल्याला लन तिचे बालपणीचे दिवस आठवले. ती पण तिच्या छोट्या-छोट्या मैत्रिणी सोबत अशीच खूप मज्जा करायची. पण तिचं बालपण लवकरच संपलं आणि जबाबदारीच्या ओझाने तिचे खांदे जड झाले.
सगळ्या मुलींनी शेतात मजा केल्यानंतर सगळे घरी परतले.
काही दिवसानंतर अजय गायत्रीला भेटायला घरी आला. अहिल्या, गोजिरी आणि गायत्री तिघीही घरीच होत्या. गायत्रीने दार उघडला. अजय कडे बघून ती आश्चर्यचकित झाली.
“अजय तू इथे?” गायत्रीने विचारलं.
त्याने स्मितहास्य करुन होकारार्थी मान हलवली. गायत्री त्याच्याकडे बघतच राहिली.
“आत बोलावणार नाही का?” अजय बोलला.
तशीच गायत्री भानावर आली आणि तिने त्याला आत बोलावून घेतलं.
“ये ना ये बस.” गायत्रीने त्याला बसवलं आणि त्याच्यासाठी पाणी आणायला गेली. तिने पाणी दिलं आणि अहिल्याला आवाज दिला.
“माई बघ कोण आलय आपल्याकडे? बाहेर ये.”
अहिल्या बाहेर आली, मागोमाग गोजिरी पण आली.
“नमस्कार..” अजयने नमस्कार केला.
“अजय बेटा तू इकडे? इकडे कसं काय येणं केलं?” अहिल्याने बोलायला सुरुवात केली.
“काही नाही सहजच, कामानिम्मित गावातुन निघालो होतो म्हटलं तुमची भेट घ्यावी म्हणून आलोय.”
बोलता-बोलता त्याचं लक्ष गोजिरी कडे गेलं, जी अहिल्याच्या मागे लपून हळूच डोकावत होती.
“अरे हीच का गोजिरी? ये बाहेर.” अजयने गोजिरीला बोलावलं.
गोजिरी हळूच बाहेर निघाली आणि हळू आवाजात बोलली.
“तुम्ही मला ओळखता?”
“हो म्हणजे काय? तुझी मोठी बहीण गायत्री तुझ्याबद्दल खूप काही बोलत असते.”
“म्हणजे वाईट सांगते माझ्याबद्दल?” गोजिरीने निरागसपणे विचारलं.
हे ऐकताच अजय हसला आणि म्हणाला
“नाही ग तुझ्याबद्दल कोणी काही वाईट बोलू शकेल का? किती गोड आहेस तू. ती तुझ्याबद्दल सगळ छान छान सांगत असते. तुझ्या बद्दल बोलताना थकत नाही तुझी बहीण. खूप कौतुक करत असते तुझं. माझी गोजिरी अशी आहे माझी गोजिरी तशी आहे.” अजय गोजितीकडे बघून बोलला.
त्यानंतर अहिल्याकडे बघून
“काकू मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्ही मला ओळखतात, माझ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे तर मला तुम्हाला गायत्रीबद्दल काही विचारायचं होतं. मी तिला चांगल्या प्रकारे ओळखतो ती पण मला चांगल्या प्रकारे ओळ्खते तर माझ्याकडे गायत्री साठी प्रस्ताव होता. तुमची परवानगी असेल तर मी विचारू शकतो का.?” अजयने विचारलं.
“हो विचार ना.” अहिल्याने सांगितलं.
“मला गायत्रीशी लग्न करायचं तुमची परवानगी असेल तर...”
हे ऐकताच गायत्री पटकन बोलली.
“अरे पण अजय मी असा कधी विचार केला नाही तुझ्याबद्दल आणि अचानक लग्न, लग्नाचं काय काढलं? आपण फक्त चांगले मित्र आहोत यापलीकडे काही नातं नाही आपलं. काय बोलतोयस नाही तसं काही नाहीये उगाच तुला काहीतरी गैरसमज होतोय.”
“गायत्री शांत हो. तो काहीही बोलला नाहीये. त्याने फक्त लग्नाचा प्रस्ताव ठेवलाय तुझ्यासमोर. तो तुला किंवा तुझ्या मैत्रीला चुकीचे म्हणत नाहीये, शांत हो.” अहिल्याने गायत्रीला शांत केलं आणि अजय कडे बघून,
“अजय तू खूप चांगला मुलगा आहेस. मी ओळखते तुला. गायत्री साठी प्रस्ताव घेऊन आला आहेस. तुझा प्रस्ताव खरच खूप चांगला आहे पण मला विचार करायला थोडा वेळ दे. मला गायत्रीशी पण सविस्तरपणे बोलावं लागेल. बघितलं ना ती किती घाबरली. ती शांत झाली की तिच्याशी बोलून मी माझं निरोप तुला नक्की कळवते.”
“ठीक आहे मग मी निघतो.” अजय जायला लागला.
“अरे असा कसा? आमच्याकडे पहिल्यांदा आलास काहीतरी घेतल्याशिवाय जाऊन देणार नाही. जा गोजिरी चहा टाक पटकन.” अहिल्याने गोजिरीला आत पाठवलं.
ती आत गेली, तिने चहा बनवला आणि अजयसाठी घेऊन आली.
“खूप छान बनवला.” असं म्हणत त्याने गोजिरीच्या गालाला हात लावला तशीच गायत्री समोर येऊन गायत्रीने त्याचा हात झटकला. अजयने तिच्याकडे बघितलं आणि
“काय झालं गायत्री?” अस विचारलं.
गायत्रीने नकारार्थी मान हलवून काहीच नाही सांगितलं.
थोड्या वेळात अजय गेला.
अहिल्या गायत्रीजवळ गेली.
“काय झालं मघाशी इतकी चिडलीस का?” असं विचारल
“मी अजय बद्दल आधी कधीच असा विचार केला नव्हता.”
“ मग काय झालं तू आता विचार करू शकतेस. अजय चांगला मुलगा आहे. तुझे त्याच्याशी लग्न झाले तर तुझं जीवन सुंदरच होईल. तो तुझा नीट सांभाळ करेल याची मला खात्री आहे. आता तू तुझा विचार कर बाळा.” असं म्हणत अहिल्या तिथून निघून गेली.
गायत्री मात्र विचारात पडली.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा