Login

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 33

Sanghrsh eka strichya matrutwacha

अहिल्या संघर्ष मातृत्वाचा भाग 33,


आधीच्या भागात आपण पाहिले की,


झाशीसोबत जे दुष्कर्म झाले त्याची सल अहिल्याच्या मनात होती. अहिल्या उठली, कंबर कसली आणि सदानंदच्या घरी गेली.


अहिल्याने सदानंदला बेशुध्द होइपर्यंत बाबूंने मारलं. विठ्ठलने मध्यस्ती केली आणि अहिल्याला घरी घेऊन आला. अहिल्या आता बऱ्यापैकी शांत झाली.


आता पुढे,


विठ्ठल  गायत्रीला आणायला अंगणवाडीत गेला.
दोघेही वाटेतून चालत असताना,


“काका, आई बरी कधी होणार?” गायत्रीने विठ्ठलला विचारलं.


“आई बरी आहे बाळा. आईला काय झालंय? ती एकदम मस्त आहे.” विठ्ठलने तिला कडेवर घेत सांगितलं.


“काका.”गायत्री बोलता बोलता थांबली.
मग काही क्षणाने पुन्हा विचार करत बोलली.


“काका एक विचारू?”


“हम्म बोल.”


“काका आपली झाशी कुठे गेली? ती मला दिसतच नाही आहे. मी खूप शोधलं तिला पण ती मला सापडलीच नाही. मी आईला पण विचारलं पण ती काहीच बोलली नाही आणि संजू दादाने पण काहीच सांगितलं नाही. काका तू सांगशील मला आपली झाशी कुठे आहे?  मला तिला बघायचं आहे रे. मला तिची आठवण येत आहे. मला तिच्याशी खूप खेळायचं आहे. सांग ना काका.”


विठ्ठलने तिला कडेवरून खाली उतरवलं.


तिच्या समोर वाकून बसला.
“बाळा कसं आहे ना, देवबाप्पालाना चांगली माणसे, गोड माणसे खूप आवडतात. त्यांना छोटी छोटी मुले पण आवडतात. तर ते त्यांना त्यांच्याकडे बोलावून घेतात. देवबाप्पाला आपली झाशी खूप आवडली म्हणून त्यांनी झाशीला त्यांच्याकडे राहायला बोलावलं. ती तिथे त्यांच्यासोबत खूप आनंदात आहे.”

“हो खरचं.” गायत्रीने आनंदाने टाळ्या वाजवल्या.


“मग काका मी पण जाऊ त्यांच्याकडे? पण त्यांना मी आवडेल का?”  गायत्रीने विठ्ठलचा हात पकडून त्याला विचारलं.


“नाही बाळा, आता झाशी गेली ना तिकडे देवबाप्पाकडे.  तू नाही जायच , तू  गेलीस तर आई आणि मी एकटे होऊ जाऊना. तू असं कुठेही जाण्याबद्दल नाही बोलायचं. तू अहिल्येच्या काळजाचा तुकडा आहेस. तू तिला सोडून गेलीस ना,तर ती स्वतःला सावरू शकणार नाही.”  विठ्ठलने गायत्रीचे लाड करत तिला सांगितले.


आता मात्र गायत्री शांत झाली. थोड्यावेळात दोघेही घरी पोहोचले.


गायत्री अहिल्याला बघताच
“आई.” म्हणत तिला जाऊन बिलगली.
“अरे आली माझी लाडुली.”


अहिल्याने गोजिरीला मांडीवर पकडलं होतं. हे बघून गायत्रीने चेहरा हिरमुसला.


अहिल्याने तिच्याकडे बघितलं.
“अरे हे काय, आता तर आनंदाने तू मला येऊन बिलगली आणि आता काय झालं तुला? चेहरा का असा बनवलास.”
“आई तू हिला घरी का आणलं?”आता तू तिचेच लाड करणार, माझे नाही.”


अस म्हणत ती एका कोपऱ्यात जाऊन बसली.
अहिल्याने गोजिरीला विठ्ठलच्या हातात दिल आणि गायत्री जवळ गेली.


“बाळा आता ती आपल्या परिवारातील एक सदस्य आहे. ती आपल्यासोबतच राहील. हे बघ माझ्याकडे बघ, ती किती छोटी आहे. तिला आई बाबा पण नाहीत हो ना. मग मला सांग ती इतकी छोटीशी ती कुठे जाईल. आता मीच तिची आई आणि तू तिची मोठी बहीण हो ना. सांभाळशील ना बाळा तिला.


गायत्रीने होकारार्थी मान हलवली आणि आईला बिलगली.
गायत्री गोजिरीकडे गेली. तिचे लाड केले.हे बघून अहिल्या आणि विठ्ठलला खूप बरं वाटलं.


असेच दिवस सरत गेले.  अहिल्याचं समाजकार्य खूप छान चाललंय. तिच्या कार्यामुळे  तिने बरीच माणसे जोडली.
लोकं तिला ओळखायला लागलीत. समाजकार्यामध्ये तीच मोठं नाव झालंय. अनेक स्त्रिया तिच्या कार्याशी जुडल्या. आता अहिल्या एकटी नव्हती तर एक संघटना तयार झाली होती.


आता स्त्रियांसाठी अहिल्या रोल मॉडेल होती. कुणाला काहीही अडचण आली की आधी अहिल्याची आठवण करायचे. अहिल्या पण हातातलं काम टाकून आधी मदतीला धावायची. अहिल्याच्या प्रेमळ स्वभावामुळे ती पटकन सगळ्यांच मन जिंकायची.


गायत्री गोजिरीची खूप काळजी घ्यायची. सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावायची. दोघींची छान गट्टी जमायची. अहिल्या पण गायत्रीवर गोजिरीची जबाबदारी टाकून बिनधास्त संस्थेत जायची. संस्थेतल्या इतर मुलींसोबत पण  गायत्री छान खेळायची. त्यांचा पण सांभाळ करायची. शेजारचे वैद्य काका तिला काही अनुभवाचे बोल शिकवायचे. तिला थोडं फार शिक्षण द्यायचे. गायत्री पण आवडीने त्यांनी सांगितलेलं लक्षात ठेवायची.


गायत्री आता वयात यायला लागली त्यामुळे अहिल्याला गायत्रीची  नेहमी काळजी  असायची.


...........................


प्रताप आणि उषाला लग्नाच्या चार वर्षांनंतर मुलगा झाला. दोघांनी त्यांच्या नावावरून त्याच नावं प्रत्युष ठेवलं. एकुलता एक असल्यामुळे त्याचे खूप लाड व्हायचे.

प्रताप आता शहरात नोकरीला जाऊ लागला. काही महिन्यांनंतर प्रतापच्या आईचा आजारामुळे देहांत झाला. म्हणून आता प्रताप त्याच्या कुटुंबासोबत शहरात वास्तव्यास गेला.


एकत्रित त्याचं सगळं छान चाललेलं होतं.


...........................


 विठ्ठलच्या पत्नीच्या निधनानंतर विठ्ठलने एका विधवा बाईशी लग्न करून तिला साथ दिली. तिच्या आधीच्या मुलाचा सारंगचा सांभाळ केला. दुसऱ्या पत्नीपासून विठ्ठलला एक मुलगी झाली होती.

अहिल्याने तिचे नावं मैथिली ठेवले. मैथिलाचा लाडक्या आत्यावर अहिल्यावर खूप जीव होता.


अहिल्या प्रेमाने सगळ्यांच सगळं करायची. तिच्या मनात कधीच कुणाबद्दल भेदभाव आला नाही की कधी कुणाचा द्वेष केला नाही.
अहिल्याच्या प्रेमळ स्वभावाने तिने सगळ्यांना जिंकलं होतं.


क्रमशः