Login

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 34

Tya prasnna pahate zulzul varyane ahilyala zopetun jage kele

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 34


आधीच्या भागात आपण पाहिले की,

प्रताप आणि उषाच्या आयुष्यात एक गोंडस मुलगा आला. प्रताप शहरात नोकरीला जाऊ लागला.

गायत्री गोजिरीची काळजी घ्यायची. तिचा सांभाळ करायची. विठ्ठलच्या पत्नीच्या निधनानंतर विठ्ठलने एका विधवा बाईशी लग्न करून तिला आधार दिला. तिच्या मुलांचा सांभाळ केला. विठ्ठलला दुसरी मुलगी झाली. अहिल्याने तिचे नाव मैथिली ठेवले.


आता पुढे,


काही वर्षांनंतर


पहाटे पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. सुर्यदेवही दर्शन द्यायला सज्ज झाले. रानातून गुरांचा आवाज यायला लागला. झुळझुळ वाऱ्याने झाडावरील पाने हलु लागली. सौम्य वाऱ्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला. सुर्यकिरणाची एक तिरीप दारावर आली.


त्या प्रसन्न पहाटे, झुळझुळ वाऱ्याने अहिल्याला झोपेतून जागे केले. ती अंथरुणावर उठून बसली. देवाला हात जोडले आणि प्रसन्न मनाने कामाला लागली. स्नान करून देवपूजा केली.
आणि गायत्रीला उठवायला तिच्या खोलीत गेली.


“गायत्री..गायत्री उठ बेटा.गोजिरीने तुझ्यासाठी काहीतरी बनवलंय.” अहिल्याने गायत्रीला झोपेतून जागे करायला आवाज दिला. पण गायत्री गाढ झोपेत होती. ती हलली सुद्धा नाही.


गोजिरी तिला जाऊन बिलगली. तिच्या कानात हळू आवाजात 


“ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई”


गोजिरीचा गोड आवाज ऐकून गायत्री पटकन उठून बसली.
आणि तिने गोजिरीच्या गालावर गोड मुका दिला.


“उठ ताई, माईने ( अहिल्या ) तुझ्यासाठी शिरा बनवलाय.”
गायत्री उठली. स्नान करून तयार होऊन बाहेर आली.


गोजिरी आणि अहिल्या दोघी तिच्याकडे बघतच राहिल्या.


लांब काळेभोर केस,वेणी घातलेली त्यावर सुंगधीत फुलांचा मनमोहक गजरा,  टपोरे मादक डोळे, चाफेकळी नाक, गोऱ्या गालावर उमटलेली खळी, गुलाबी गुलाबासारखे ओठ, हिरवा कंच नक्षीदार लाल काठाचा परकर त्यावर लाल रंगाचा जरीची चोळी.  आज गायत्री खूप सुंदर दिसत होती. 

गायत्री पंधरा वर्षाची झाली. वयात आल्यानंतर मुली सुंदर दिसतात असं म्हणतात. गायत्रीकडे बघितल्यावर ते खरं आहे असं वाटलं.


गायत्री आली, तिने गोजिरीकडे बघितलं आणि तिला विचारलं.


“काय बनवलंस तू माझ्यासाठी?”


“भोपळ्याची पुरी.” गोजिरीने खूप आनंदाने सांगितलं.
“काय?.अग पण असं कुणी काही बनवत का?” गायत्रीने चेहरा बनवला.


“ताई तू आधी खाऊन बघ, मी स्वतः बनवलंय तुझ्यासाठी.

अग छान झालंय मी खाऊन बघितलं. काय करायचं ना. आधी भोपळा छिलून घ्यायचा, ते शिजवायचं त्यामध्ये गव्हाचं पीठ मळायचं.त्यात गूळ वाटून किंवा साखर बारीक करून टाकायची.  ते पुन्हा मळायचं, त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची पुरी करायची आणि ती तेलात तळायची. मस्त ना ताई.” गोजिरी पटापट बोलली.


गायत्री हसली आणि डोक्यावर हात ठेवला.


गायत्रीने दोन्ही हात समोर केले आणि


“ये ग माझी गोडुली. किती छान आहेस तू, इतका घाट घातलास माझ्यासाठी.” गायत्रीने तिला मिठी घातली. 
अहिल्याने गायत्रीचं औक्षण केलं. तिला शिऱ्याचा एक घास चारून दिला. गायत्री तिच्या पाया पडली.


“माई मला आशीर्वाद दे.”


“माझा आशीर्वाद तर नेहमीच तुझ्यासोबत आहे. खूप मोठी हो. खूप चांगलं कार्य तुझ्या हातून घडू दे. नेहमी सुखी आणि आनंदी रहा. तुला सगळं सुख मिळत राहो.” अहिल्याने आशीर्वाद दिला.

“ माई मला फक्त तुझ्यासारखं बनायचं आहे. तुझ्यासारखंच मोठं व्हायचय. तू माझा आदर्श आहेस.” गायत्रीने अहिल्याला मिठी मारली.


तुझ्यासारखं बनायचं आहे हे ऐकल्यावर अहिल्याचा चेहरा उदास झाला. तिला तिचा कठीण काळ आठवला आणि आपसूकच डोळे पाणावले.


“काय झालं माई?”  गोजिरीने विचारलं.


“तुम्ही दोघी खुप मोठ्या व्हा. पण माझ्या सारखं आयुष्य तुम्हाला नको लाभू दे. तुमचं आयुष्य खूप सुखाचं जाओ हीच देवाचरणी प्रार्थना करते.”


गायत्री आणि गोजिरी दोघीही अहिल्याला बिलगल्या.


यांचं बोलणं सुरू असताना विठ्ठलचा पूर्ण परिवार आला.


“मामा.. किती उशीर कधीची वाट बघत आहे.” गायत्री विठ्ठल जवळ गेली. त्याला पाया पडून नमस्कार केला. 


“सुखी रहा.” विठ्ठलने तिला आशीर्वाद दिला.


“वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, खुप मोठी हो आणि नेहमी आनंदीत रहा.”


गायत्रीने मामी मंगलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.


मैथिली आणि सारंग दोघेही गायत्रीच्या जवळ गेले. गायत्रीने त्या दोघांचे लाड केले. त्यांना खाऊ खायला दिला.


सगळे मंदिरात गेले. आज गायत्रीच्या वाढदिवसानिम्मित अहिल्याने मंदिराबाहेर बसलेल्या गरीब लोकांसाठी कापड वाटप करण्याचं ठरवलं होतं. आधी सगळ्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि कार्यास सुरुवात केली.


गायत्रीने स्वतः हे शुभकार्यास सुरुवात केली. तिने स्वतःच्या हाताने कापड वाटप केले आणि सगळ्यांचा आशीर्वाद मिळवला.


गायत्रीला हे सगळं करताना बघून पंडितजीला खूप बरं वाटलं. ते अहिल्याकडे बोलले.


“अहिल्या ही तीच आहे ना जिला जिला तू याच मंदिरातून नेलं होतंस?.”  


“हो पंडितजी.” अहिल्याने होकारार्थी मान हलवली.


“किती मोठी झाली. तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघून अस वाटतं ही मुलगी खुप नाव कमवेल. हीच भविष्य उज्वल आहे आणि हे तुझ्यामुळे झालंय त्या पोरीचं आयुष्य तू सावरलसं. त्या रात्री जर तू तिला स्वतःसोबत नेलं नसतस तर आज तिची परिस्थिती वेगळी असती किंवा ती या जगातही नसती.” बोलता बोलता पंडितजीच्या चेहऱ्यावर समाधान आले.


“असं नका बोलू जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. त्यावेळी माझ्या हातून हे चांगलं कार्य घडायचं होत म्हणून ते घडलं. आणि खरचं तीच कौतुक करावं तेवढं कमी. खूप निर्मळ स्वभावाची आहे ती. मला अभिमान वाटतो तिचा. आणि ती माझी मुलगी आहे. माझे संस्कार आहेत तिच्यावर त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे ती कधीही चुकीचं पाऊल टाकणार नाही की कधी कोणतं चुकीचं कार्य  करणार नाही. तिच्या पावलावर पाय ठेवत गोजिरी पण मोठी होतीय. तीचा पण स्वभाव अगदी मृदू आहे.” अहिल्याचं कौतुक  सुरू होतं.


“मुलीचं कौतुकसोहळा संपत नाही आहे.खरंच तुम्ही सुद्धा खूप भाग्यशाली आहात की देवाने तुमच्या पदरात दोन दोन मुली घातल्या.” पंडितजीने आता अहिल्याचं कौतुक केलं.


अहिल्याची छाती अभिमामानी फुलली.


क्रमशः