Login

अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा भाग 36

Maitri mhnje ekmekanna samjun ghen

अहिल्या संघर्ष मातृत्वाचा भाग 36


आधीच्या भागात आपण पाहिले की,

अहिल्याच्या पावलावर पाऊल टाकत गायत्रीची वाटचाल सुरू झाली. गायत्री छोट्या छोट्या मुलींना शिकवायची. अहिल्या सोबत संस्थेत जायची. आणि गोजिरीचा पण खूप छान पद्धतीने सांभाळ करायची. एकदंर काय तर गायत्री खूप गुणवान होती.


गायत्री संस्थेच्या कामासाठी शहरात गेली. तिथे तिची ओळख अजय नामक व्यक्तीशी झाली. हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं आणि नंतर मैत्रीला सुरुवात झाली.

आता पुढे,


अहिल्याच्या हाताशी आता अनेक बाया जोडल्या गेल्या होत्या. दारूमुक्त गाव झाल्यामुळे गावातल्या बाया अगदी आनंदी होत्या.


आता अहिल्याने आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावाचाही विकास करण्याचा निश्चय केला. 


प्रताप काही महिन्याच्या अंतराने गावात एक फेरी करायचा. सगळ्यांची भेट घ्यायचा आणि परतायचा. प्रतापच्या आईच्या निधनानंतर त्यांचं राहतं घर त्याने विकायला काढलं होतं.
त्याचसंदर्भात तो गावात आला. अहिल्याकडे आला.


“अहिल्या कशी आहेस? प्रतापने आल्या आल्या अहिल्याला विचारलं.


“मी मस्त, खूप मजेत आहे.” अहिल्याने आनंदाने सांगितलं.


दोघांचं बोलणं सुरू झालं. सगळीकडच्या गप्पा गोष्टी झाल्या.
विचारपूस झाली आणि प्रतापने घराचा विषय काढला. अहिल्याने त्यावर एक छान उपाय सुचवला.


“ते घर इतरांना देण्यापेक्षा मला दे, ते मला संस्थेच्या कामी येईल.” अहिल्याने त्याला उपाय सुचवला.


प्रताप लगेच तयार झाला. घराचं काम झालं या आनंदात तो शहरात परतला.


गायत्री संस्थेच्या कामाने शहराच्या ठिकाणी गेली. संस्थेतलं काम झालं.  अजयने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण आज गायत्री त्याच्यापासून दुर दूर जात होती.


“ काय झालं गायत्री? आज तू माझ्याशी बोलत का नाही आहेस?”
अजयने काकुळतेने विचारलं.
“नाही अजय आपण असं बोलणं बरोबर नाही. कुणी आपल्याला असं बोलताना बघितलं तर ते काय विचार करतील.” गायत्रीने तिची बाजू मांडली.


“अग त्यात काय एवढं? आपण  फक्त बोलतोय.” अजय तिला समजावत सांगितलं.
“मला हेच नको आहे.आज आपण बोलत आहोत. उद्या आपलं नात समोर गेलं तर.. नाही नाही.” असं म्हणत गायत्री तिथून जायला निघाली.


तोच अजयने तिचा हात पकडला.


“अजय हात सोड, बरं दिसत नाही.” गायत्री थोडी चिडली.
अजयने पटकन हात सोडला.
“मला माफ कर. मी तुझा हात धरायला नको होतं.” अजयने माफी मागितली.


तशीच गायत्री अश्रू पुसत बाहेर गेली.अजय तिच्या मागोमाग गेला.


“गायत्री थांब, थांब गायत्री.. कृपा करून थांब. माझं बोलणं तरी ऐकून घेशील का? फक्त कुणाशी तरी बोलणं म्हणजे चुकीचं नसतं. आपलं छान मैत्रीचं नात आहे. निखळ मैत्रीचं नातं. या मैत्रीला नको का म्हणते आहेस?” अजय बोलला.

“मला नको ही मैत्री. माईला नाही आवडणार ते. ती मला इथे कामासाठी पाठवते आणि तिला असं कळलं की मी इथे येऊन...”  गायत्री बोलता बोलता थांबली.


“पण बोलणं आणि मैत्री करणं चुकीचं नाहीच आहे.” अजयने तिला पुन्हा समजावलं.


“ते मला काय माहिती नाही. मला जाऊ दे.” असं म्हणत गायत्री तिथून गेली.


गायत्री घरी गेली. पोहोचेपर्यंत अंधार झाला होता.
अहिल्या आणि गोजिरी दोघीही घरी होत्या. अहिल्याने आज गायत्रीच्या आवडीची भाकर आणि ठेचा बनवला.
गायत्री आत आली.


गोजिरी तिला जाऊन बिलगली.
“ताई किती उशीर ग? लवकर हात धुवून ये, खूप भूक लागली आहे.”
गोजिरी  आनंदून बोलली.


पण गायत्रीने तिला दूर केलं.
“तू जेवण करून घे. मला भूक नाही.”
गायत्री खोलीत गेली.
गोजिरीने अहिल्याला सगळं सांगितलं.


अहिल्या तिच्या खोलीत गेली.
“गायत्री काय झालं? गोजिरीने सांगितलं की तुला भूक नाही. काय झालं? आज सगळं तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय.”
“माई खरच मला भूक नाही. थकल्यासारखं होतंय, मी आराम करते.” गायत्री जरा त्रासून बोलली.


अहिल्याने पुन्हा खूप प्रेमाने विचारलं.
“काय झालं माझ्या लाडोबाला? आई आहे ना मी तुझी? मग मला नाही सांगणार तू?”


“आई तुला तो कारकून मुलगा आठवतो का? आपण मागल्या वेळी गेलो होतो तेव्हा त्याने आपलं काम पटकन करून दिलं होतं.” गायत्रीने उत्साहाने विचारलं.
“हम्म त्याचं काय?” अहिल्या शांत झाली.


“आई मी जाते ना तिकडे तर तो बोलतो माझ्याशी.” गायत्री अडखळून बोलली.
“मग त्यात काय?” अहिल्याने विचारलं.


“आई मी त्याला सांगितलं की आता आपण बोलायचं नाही.” गायत्री थोडी स्पष्ट बोलली.


“का?”अहिल्याने प्रश्नार्थक भावाने विचारलं.


“तुला आवडणार नाही ना ते.” गायत्री बोलता बोलता घाबरली.


“गायत्री, एका मुलीने एका मुलाशी बोलणं किंवा एका मुलाने मुलीशी बोलणं  हे वाईट मुळातच नाही. अग एका मुलीमध्ये आणि मुलामध्ये मैत्रीचं नातं असू शकतं. एक निखळ मैत्री असू शकते.

आणि  मैत्री म्हणजे काय ग?

तर


“मैत्री म्हणजे एकमेकांना समजूण  घेणं..
मैत्री म्हणजे सुख दुःखात एकमेकांसोबत असणं..
मैत्री म्हणजे गरजेच्या वेळी धावून येणं..
मैत्री म्हणजे तू न सांगताही तुझं दुःख समजून घेणं..
मैत्री म्हणजे नेहमी मदतीचा हात देणं..
मैत्री म्हणजे ‘घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे’ असं आश्वासन देणं.."


सांग गायत्री मैत्रीत इतकं सगळं सामावलय आणखी काय हवंय?”
अहिल्याने इतक्या सुंदर पद्धतीने गायत्रीला समजावलं.
गायत्री लगेच तिच्या कुशीत विसावली.


क्रमशः