अहिल्या संघर्ष मातृत्वाचा भाग 37
आधीच्या भागात आपण पाहिले की,
गायत्री संस्थेच्या कामाने शहरातल्या ऑफिसमध्ये जायची. तिथे तिची अजयसोबत भेट व्हायची. गायत्रीला हे असं मुलाशी बोलणं बरोबर वाटतं नव्हतं.म्हणून तिने अजयला टाळलं.
अजयने तिला खूप समजावलं पण ती न ऐकता निघून गेली. घरी गेल्यानंतर अहिल्याशी बोलली. गायत्रीने अहिल्याला अजयविषयी सांगितलं तेव्हा अहिल्याने तिला मैत्रीविषयी खूप छान समजावून सांगितलं.
आता पुढे,
गायत्रीच्या मनातली मैत्री बद्दलची भीती नाहीशी झाली. ती आता मनात काहीही अडी न ठेवता अजयशी छान बोलायला लागली.
एकदा अजय आणि गायत्री रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलत असताना बाजूने एक माणूस धक्का मारून गेला.
“ये दिसत नाही का, धक्का मारून गेलास?” गायत्री त्या माणसावर ओरडली.
पण तो माणूस न ऐकल्यासारखा समोर निघून गेला. गायत्रीने दुर्लक्ष केलं.
थोड्या वेळाने गायत्री तिथून निघाली. थोडया समोर आल्यानंतर पुन्हा एक माणूस धडकला. गायत्रीने पलटून बघितलं तर तिला संशय आला की हाच तोच माणूस आहे.
ती मागे फिरली आणि त्याच्या मागे गेली.
त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. त्या माणसाकडे बघितलं. त्याने चेहरा कपड्याने झाकला होता.
“ काय चाललंय? तुम्ही मगाशी पण मला धक्का मारून गेलात.आणि आताही.” गायत्री त्याच्यावर ओरडली.
त्याने काहीही न ऐकल्यासारखं करून तो चालायला लागला. गायत्रीला खूप राग आला. गायत्रीने त्याच्या तोंडाचा कपडा खेचला तसाच तो माणूस पलटला. त्याचा चेहरा डोळ्यासमोर येताच गायत्री थक्क झाली.
तो माणूस दुसरा तिसरा कुणीही नसून सदानंद होता. तो सदानंद ज्याने झाशी सोबत दुष्कर्म करून तिची हत्या केली.
त्याचा चेहरा दिसता बरोबर गायत्रीला झाशी आठवली आणि तिचा तळतळाट झाला.
“तू तू इथे? इथे काय करतोस? गायत्रीने विचारलं.
सदानंदने गायत्रीचा हात पकडला.
“याच दिवसाची वाट बघत होतो मी, अहिल्याच्या एका थापडेचा बदला मला घ्यायचा होता. त्याच्यासाठीच मी तुझी मोठी होण्याची वाट बघत होतो. आता माझ्या हातात आलीस ना, आता माझ्या तावडीतुन तुला कोणी वाचवू शकणार नाही. खूप वर्ष मी या दिवसाची वाट बघितली. शेवटी आज तो दिवस उगवलाच.” सदानंद गायत्रीचा हात मोडत बोलला.
“सदानंद माझा हात सोड. सदानंद हात सोड.” गायत्री जोरजोरात ओरडायला लागली.
“ओरड, अजून ओरड. तुला वाचवायला इथे कुणीही येणार नाही. बघ दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नाही. सगळीकडे सुन्नता पसरली आहे. त्यामुळे तुझा आवाज कुणा पर्यंतही पोहोचणार नाही. ओरड ओरड.” सदानंद जोराजोरात हसायला लागला आणि गायत्रीचा हात मुरगळला.
तिला अतिशय वेदना होत होत्या, वेदनेने विव्हळत होती.
गायत्रीने सगळे बळ एकटवून उजव्या पायाने त्याच्या दोन्ही पायांच्या मधोमध जोरात पाय मारला. जसा त्याच्यावर मार बसला त्याने पटकन गायत्रीचा हात सोडला. गायत्रीने रस्त्यावरची वाळू उचलून त्याच्या डोळ्यात झोकली आणि तिथून पळाली.
पळत पळत गायत्री घरी पोहोचली. आत जाऊन पटकन तिने दार लावून घेतला. दाराची कडी लावली आणि तशीच दाराला टेकून उभी राहिली.
गोजिरीच्या लक्षात आले ती पटकन धावत बाहेर आली.
“ताई काय झालं? अशी घाबरली का आहेस तू? गोजिरी काय झालं विचारत होती पण गायत्री गप्प होती.
गायत्रीचा श्वास वाढला होता हे गोजिरीच्या लक्षात आलं आणि ती आत पाणी आणायला गेली.
गोजिरी पाणी घेऊन आली.
“ताई शांत हो.”असं म्हणत तिला बसवलं आणि पाणी प्यायला दिलं. गायत्री थोडी शांत झाली आणि ती पाणी प्यायली. थोडया वेळानंतर राहील घरी आली. गायत्रीने अहिल्याला सगळी घटना सांगितली.
मुलगी वयात आली म्हटल्यावर आईला जशी काळजी वाटते तशीच काळजी अहिल्याला होती.
अहिल्याने विठ्ठलला घरी बोलावून घेतलं आणि त्याच्यासोबत सगळी चर्चा केली. त्याला सदानंदबद्दल सांगितलं.
“पणत्या भाऊ आता तूच सांग काय करायचं? मला खूप घाबरायला होतंय. मुलगी वयात आली की तिच्या सोबत काही कमी जास्त झाले तर, तिचाही विवाह होणार नाही. अहिल्या काळजीत आहे हे गायत्रीच्या लक्षात आलं आणि ती लगेच अहिल्याच्या बाजूला येऊन बसली.
“माई काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही आहे.” गायत्रीने समजवण्याच्या प्रयत्न केला.
“तुला आता नाही कळणार माझी काळजी, आई होशील ना तेव्हा तुला सगळं कळेल.” अहिल्या डोळे पुसत म्हणाली.
“बाईने बाळाला जन्म न देता आईपण जगणं, तेच मातृत्व अनुभवणं म्हणजे आई. हे तुझ्याकडून बघून शिकले मी. आता मी पण आश्रमातल्या सगळ्या मुलींची आई आहे. तू जे अनुभवलंस ते सगळं मी अनुभवते आहे. छोट्या छोट्या इवल्याश्या बाळाची हात हातात घेतली की मला स्वतःला आई झाल्यासारखं वाटतं. आपण जन्म दिला नाही आपल्या छातीचे दूध पाजलं नाही तरी प्रेमाची नाळ जोडली जातेच ग. जे प्रेम तू मला दिलेस ना तेच प्रेम मी त्या सगळ्यांना देणार आहे आणि प्रेमाची नाळ जोडून घेणार आहे.” गायत्री सगळं बोलून गेली.
गायत्रीचं बोलणं ऐकून अहिल्याच्या डोळ्यात पाणी आलं. माझी इवलीशी गायत्री इतकी मोठी झाली. मनातल्या मनात विचार करू लागली आणि तिच्याकडे एकटक बघू लागली.
“काय झालं? माझ्याकडे अशी का बघत आहे?” गायत्रीने इशाऱ्याने विचारलं.
“माझी एवढीशी गायत्री आज इतकी मोठी झाली विश्वासच बसत नाहीये मला. मला अभिमान आहे पोरी तुझा. मी तुला जन्म दिला नसला ना तरी तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस ग पोरी, माझे सर्वस्व आहेस. असं म्हणत अहिल्याने गायत्रीला जवळ केलं.
त्यांना दोघींना असं बघून गोजिरी त्यांच्याजवळ आली. तिने लहान चेहरा करून
“म्हणजे मी तुमची कुणीच नाहीये?” असं विचारलं तशाच दोघी रडता रडता हसल्या आणि तिलाही जवळ केलं.
तिघ्याही एकमेकींना बिलगल्या.
क्रमश: