Login

अजब गजब लग्न भाग -13

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 13


पाखीचे दिवस आता एकसारखे नव्हते…
ते धावपळीचे झाले होते.

सकाळ लवकर उगवायची. आजोबांसाठी जेवण, हॉस्पिटलची फेरी, मग कॉफी शॉपची शिफ्ट, आणि रात्री अभ्यास. शरीर थकत होतं, डोळे जड होत होते, पण पाखी थांबत नव्हती.

कॉलेजला सुट्या लागल्या होत्या, पण तिच्यासाठी सुटी म्हणजे अभ्यासाचा अधिक भार. पंधरा–वीस दिवसांनी परीक्षा होती. पुस्तक उघडायचं, पण डोळ्यांसमोर अक्षरं नाचायची.

कधी कधी ती वही बंद करून छताकडे पाहायची.
मी हे सगळं का करतेय?
पण लगेच आजोबांचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा.

कॉफी शॉपमध्ये काम करताना हात थोडे थरथरायचे. थकवा स्पष्ट दिसायचा, पण तरीही तिच्या ओठांवर हसू असायचं. ग्राहकांसमोर ती कधीच आपला त्रास दाखवत नव्हती.

रवी अनेकदा तिला पाहायचा.
“जरा आराम कर,” तो म्हणायचा.

पाखी हसून म्हणायची,
“आता थोडा संघर्ष आहे… पण हेही जाईल.”

रात्री घरी आल्यावर शरीर अक्षरशः कोसळायचं. पाय दुखायचे, डोळ्यांत पाणी यायचं. तरीही ती पुस्तक उघडायची. आणी थोडा का होईना, अभ्यास करत होती.

एक दिवस हे सगळं मागे राहील,
आज थांबले तर उद्या काहीच उरणार नाही…

कधी कधी अश्रू वहीवर पडायचे,
पण हात थांबत नव्हता.

कारण पाखी कमकुवत नव्हती
ती परिस्थितीशी झुंज देणारी मुलगी होती.


---


परीक्षेला आता फक्त काहीच दिवस उरले होते.
पाखी सतत धावपळ करत होती काम, अभ्यास, हॉस्पिटल…
शरीर थकून गेलं होतं.

एका रात्री अभ्यास करताना तिचं डोकं जोरात गरगरलं. वही हातातून खाली पडली. अंग तापाने फणफणत होतं.
थोडा वेळ झोपून घेते… असं म्हणत ती बेडवर पडली… आणि डोळे मिटले.

सकाळ झाली तरी पाखी उठली नाही.

कॉफी शॉपमध्ये ती आली नाही, तेव्हा रवीला काळजी वाटली. पाखी कधीच गैरहजर राहायची नाही.
त्याने तिला फोन केला.

“हॅलो,"
आवाज खूपच थकलेला होता.

“… मला बरं नाहीये,” पाखी हळू आवाजात म्हणाली.

रवी क्षणभर गप्प झाला.
“तू एकटी आहेस? डॉक्टरकडे गेलीस का?”

“नाही… आजोबांकडे जायचं होतं… पण अंगात त्राण नाहीये.” ती म्हणाली.

रवीचा आवाज गंभीर झाला.
“ऐक, तू अजिबात कामाचा विचार करू नकोस. मी येतो.” रवी म्हणाला.

थोड्याच वेळात रवी तिच्या घरी पोहोचला. औषधं आणली, ताप मोजला, तिला जबरदस्तीने जेवायला लावलं.
पाखीला इतकी काळजी घ्यायला कोणी आहे, याची सवय नव्हती.

“इतका त्रास करून घेऊ नकोस,” रवी म्हणाला.
“तू सगळं एकटी करतेस… पण माणूस आहेस, मशीन नाहीस.”

पाखीचे डोळे पाणावले.
“एक्साम आहे… थांबता येत नाही,” ती म्हणाली.

“एक्साम येतील आणि जातील,” रवी शांतपणे म्हणाला,
“पण तू आधी बरी हो.”
त्याला पाखीची काळजी वाटतं होती. तो तिच्या प्रेमात पडत होता. तिला गोळ्या दिल्या. नंतर रवी तिथेन निघून गेल्या.

---

परीक्षेचा पहिला दिवस उजाडला.

पाखीचा अंगात अजूनही थोडासा ताप होता. डोकं जड होतं, अंगात त्राण नव्हतं. तरीही ती उठली. देवाजवळ दिवा लावला आणि डोळे मिटून क्षणभर प्रार्थना केली.

देवा… फक्त आज साथ दे. ती म्हणाली.

आजोबांना भेटायला जायचं होतं, पण आज वेळ नव्हता. तिने त्यांना फोन करून सांगितलं.
“एक्साम आहे आज… संध्याकाळी येईन.”

आजोबांनी तिला धीर दिला.
“तू मजबूत आहेस पाखी. नीट दे परीक्षा.”

कॉलेजमध्ये पोहोचल्यावर वातावरण गंभीर होतं. सगळे विद्यार्थी शांत होते. पाखी बाकावर बसली. हातात पेन धरताना थोडा हात थरथरत होता.

प्रश्नपत्रिका हातात आली.

पहिला प्रश्न वाचला…
दुसरा…
तिसरा…

हळूहळू मन स्थिर झालं.

तिला आठवायला लागलं  रात्रीचे जागरण, वहीवर पडलेले अश्रू, थकलेलं शरीर… सगळं आज शब्दांत उतरायचं होतं.

ती लिहीत राहिली.
वेळेचं भानच राहिलं नाही.

मध्येच डोळे मिटून श्वास घेतला. पुन्हा लिहायला सुरुवात केली.

घंटा वाजली.

उत्तरपत्रिका दिल्यावर पाखी थोडा वेळ तशीच उभी राहिली.
मनात एकच भावना होती,  मी माझ्या परीने सगळं केलं.

बाहेर येताच तिने आकाशाकडे पाहिलं.
हलकीशी हवा वाहत होती.

तिच्या ओठांवर हळूच हसू आलं.

आज ही परीक्षा होती
फक्त प्रश्नपत्रिकेची नाही…
तर तिच्या धैर्याची, संयमाची आणि जिद्दीची.

आणि त्या परीक्षेत
पाखी हरली नव्हती.


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all