Login

अजब गजब लग्न भाग - 24

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 24



पाखी आज नेहमीपेक्षा लवकर उठली. आजचा दिवस तिच्यासाठी फार महत्त्वाचा होता. हा फक्त इंटरव्यू नव्हता…
ही तिच्या आयुष्याची परीक्षा होती.

“आजोबा… आज सगळं चांगलं व्हायला हवं,”
ती मनातच म्हणाली.

पाखीने आंघोळ केली. साधा ड्रेस घातला.. केस नीट आवरले.
आरशात पाहिलं… चेहऱ्यावर थोडी घाबरटता, पण डोळ्यांत आत्मविश्वास होता.

ती देवघरात गेली.

दिवा लावला. अगरबत्ती पेटवली. दोन्ही हात जोडले.

“देवा…
माझ्याकडे जास्त काही नाही, पण मेहनत करण्याची तयारी आहे. आज मला योग्य शब्द दे… योग्य विचार दे…”

डोळे मिटून ती मनोभावे प्रार्थना करत होती.

“आजोबांना अभिमान वाटावा असं काहीतरी घडू दे… माझं आयुष्य योग्य दिशेने ने…”

थोडावेळ शांतता होती. दिव्याची ज्योत हलकेच हलत होती.

पाखीने डोळे उघडले. मन हलकं झालं होतं.

“आता जे होईल ते चांगल्यासाठीच,” ती स्वतःशीच म्हणाली.

तेवढ्यात बाहेरून गाडीचा आवाज आला…

पाखीने घड्याळाकडे पाहिलं, रवी आला होता.

तिने एक खोल श्वास घेतला आणि घराबाहेर पडली…

आज तिचं नशीब तिची परीक्षा
आणि तिचं आयुष्य एकाच ठिकाणी भेटणार होतं…


---

रवी गाडी चालवत होता. पाखी खिडकीतून बाहेर पाहत होती.
रस्त्यावरची गर्दी, हॉर्नचा आवाज… पण पाखीचं मन कुठेतरी दूर अडकलं होतं.

“टेंशन आहे का?” रवीने शांतपणे विचारलं.

पाखी थोडी हसली, “थोडंसं… खूप दिवसांनी एवढा मोठा इंटरव्यू आहे.”

रवी हसत म्हणाला, “टेंशन घेण्यासारखं काही नाही.
तू आधीच अर्धी लढाई जिंकली आहेस.”

“कशी? ", पाखीने त्याच्याकडे पाहिलं.

“कारण तू मेहनती आहेस. आणि मेहनती लोक कधीच हरत नाहीत," रवी ठामपणे म्हणाला.

पाखीच्या डोळ्यांत पाणी आलं. “तुम्ही नसता तर… मला हे सगळं शक्यच झालं नसतं.”

रवी थोडा गंभीर झाला. “असं म्हणू नकोस. मी फक्त एक मार्ग दाखवला. चालायचं तुलाच आहे.”

पाखीने मान हलवली.
“आजोबांसाठी मला हा जॉब हवाच आहे. ते माझ्यासाठी सगळं सहन करत आले आहेत.”

“मग आज तू नक्की सिलेक्ट होणार,” रवी म्हणाला.
“कारण आज तुझ्या उत्तरांमध्ये फक्त शब्द नाही… तुझं आयुष्य असेल.”

गाडी एका सिग्नलला थांबली.

पाखीने खोल श्वास घेतला. “काय झालं तर?”

रवी तिच्याकडे पाहून म्हणाला, “काहीच झालं तरी
तू हरत नाहीस. आज फक्त एक पायरी आहे.”

सिग्नल ग्रीन झाला.

गाडी पुढे निघाली.

पाखीने हलकंसं स्माईल दिलं. मनात भीती होती,
पण आज तिला कोणीतर खंबीरपणे सोबत उभं आहे
याची खात्री होती.

---


रवी आणि पाखी राजच्या ऑफिसमध्ये पोहोचले.

दोघांनी रिसेप्शनला चौकशी केली. रिसेप्शनिस्टने
नाव नोंदवून, बसायला सांगितलं.

वेटिंग एरियामध्ये रवी आणि पाखी शेजारी बसले.

आजूबाजूला
कॉर्पोरेटची गडबड सुरू होती, पण पाखीचं लक्ष
मनातल्या विचारांकडेच होतं.

तिला थोडं टेन्शन आलं होतं.

रवीने ते ओळखलं.

त्याने हलकेच पाखीच्या खांद्यावर हात ठेवला.

“टेन्शन घेऊ नकोस,” तो शांतपणे म्हणाला,
“सगळं चांगलंच होईल.”

पाखीने काही बोललं नाही. फक्त हलकीशी स्माईल दिली.

तेवढ्यात रिसेप्शनिस्टचा आवाज आला

“पाखी …”

पाखीचं नाव ऐकताच तिने एक खोल श्वास घेतला.

“इंटरव्ह्यूसाठी आत जा,” रिसेप्शनिस्ट म्हणाली.

पाखी उभी राहिली.

मनात देवाचं नाव घेतलं, रवीकडे एक नजर टाकली
आणि निर्धाराने इंटरव्ह्यू रूमकडे पावलं वळवली…

आता तिच्यासमोर फक्त प्रश्न नव्हते, तर
तिच्या आयुष्याचा नवा अध्याय उघडणार होता…


---


इंटरव्ह्यू रूम…

दरवाजा उघडला.

पाखी आत आली.

समोर खुर्चीत राज बसलेला होता.
त्याने नजर वर केली…

आणि क्षणभर तो स्तब्ध झाला.

हीच ती… काल धक्का लागलेली मुलगी…

पाखीही थबकली.

ती नजर तिला ओळखीची वाटली.

क्षणभर दोघेही एकमेकांकडेच पाहत राहिले.

मनात विचारांचा गोंधळ. पण चेहऱ्यावर
दोघांनीही शांतपणा ठेवला.

राजने स्वतःला सावरलं.

“प्लीज, बसा,” तो प्रोफेशनल आवाजात म्हणाला.

पाखी हळूच खुर्चीत बसली.

तिचे हात थोडे थरथरत होते, पण तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला.

राजने तिची फाईल उघडली.

“पाखी…,” तो नाव उच्चारतो.

ते नाव ऐकून तिच्या काळजात हलकीशी धडधड वाढली.

“तुम्ही नुकताच ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय ना?” राजने विचारलं.

“हो सर,” पाखीने आत्मविश्वास जमवत उत्तर दिलं.

राज तिच्याकडे पाहत होता.

तीच नजर… तीच शांतता…
तीच ओळख…

पण दोघांनाही माहीत होतं

हा इंटरव्ह्यू फक्त नोकरीचा नव्हता…

इथून काहीतरी वेगळंच सुरू होणार होतं…



राज म्हणाला, “पाखी, स्वतःबद्दल थोडं सांगाल का?”

पाखी बोलायला लागली.
“सर… माझं नाव पाखी. मी माझं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण केलं आहे. सध्या मी शॉपमध्ये काम करते, कारण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.”

राज थोडा थांबतो. तिच्या उत्तरातला साधेपणा त्याला भावतो.

राज म्हणाला.
“शॉपमध्ये काम करत असताना अभ्यास करणं कठीण नव्हतं का?”

पाखी (हसत) म्हणाली.
“कठीण होतं सर… पण गरज माणसाला मजबूत बनवते.
वेळ काढणं शिकवलं त्या परिस्थितीने.”

राज मान हलवतो.

राज म्हणाला.
“जर तुम्हाला कठीण परिस्थिती आली, प्रेशर आलं… तर तुम्ही कसं हँडल करता?”


“सर, मी पळून जात नाही. प्रॉब्लेम समजून घेते
आणि शक्य ते सोल्यूशन शोधते. कारण माझ्यावर अवलंबून
असलेले लोक आहेत.” पाखी म्हणाली.

हे ऐकून राजच्या चेहऱ्यावर हलकंसं आश्चर्य आले.

राज म्हणाला. “तुम्हाला ही नोकरी का हवी आहे?”

पाखी थोडी गंभीर होते.

पाखी म्हणाली.
“मला फक्त जॉब नकोय सर… मला एक संधी हवी आहे.
माझ्या कुवतीपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवायची.”

राज तिच्याकडे स्थिर नजर ठेवून पाहतो.

राज म्हणाला.
“जर ही नोकरी मिळाली तर तुम्ही काय वेगळं कराल?”

पाखी आत्मविश्वासाने म्हणाली. “मी माझं काम मनापासून करेन. तुमच्यासाठी विश्वासू आणि प्रामाणिक सेक्टरी बनेन.
कामात आणि वागण्यात दोन्ही ठिकाणी साथ देईल.”

क्षणभर शांतता.

राज फाईल बंद करतो.

राज म्हणाला.
“लास्ट प्रश्न… तुमचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय काय आहे?”

पाखी डोळ्यांत चमक घेऊन म्हणाली
“स्वतःची ओळख बनवणं सर… कोणावरही ओझं न होता.”

राजच्या मनात काहीतरी हलतं…

तो हळूच म्हणतो
“थँक यू, पाखी. तुम्ही जाऊ शकता.”

पाखी उभी राहते.

“थँक यू सर,” असं म्हणत बाहेर निघते.

दरवाजा बंद होतो…

राज मात्र अजूनही तिच्याच विचारात…


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all