Login

अजब गजब लग्न भाग - 34

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 34


असेच दिवस हळूहळू पुढे सरकत होते.
पाखीची ऑफिसमध्ये ओळख वाढत चालली होती. सगळे तिच्या कामावर खुश होते.
गणेशसोबत तर तिची छान मैत्री झाली होती, कामाच्या निमित्ताने सुरू झालेल्या गप्पा, मधल्या मधल्या हसण्या-बोलण्यात ती सहज रमून जायची.

हे सगळं राजला दिसत होतं… आणि तेच त्याला खटकत होतं.

तो पाखीच्या प्रेमात पडत चालला होता, हे त्याला कळत होतं.
पण लगेचच मनात एकच विचार येई
“माझं लग्न झालं आहे.”

तो स्वतःला पाखीपासून लांब ठेवायचा प्रयत्न करत होता.
तिच्याशी कमी बोलणं, नजर टाळणं, कामापुरतंच राहणं…
पण मनाचं काय?
ते काही ऐकत नव्हतं.
पाखी समोर आली की सगळे ठरवलेले नियम आपोआप मोडायचे.


---

इकडे, राजचे आजोबा पाखीच्या आजोबांना भेटायला गेले होते.
दोघेही जुने ओळखीचे, मनमोकळ्या गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही.

गप्पांच्या ओघात राज आणि पाखीचा विषय निघालाच.

पाखीच्या आजोबांनी सहज सांगितलं,
“पाखी आता जॉबला लागली आहे. छान कंपनी आहे… नाव सांगतो. ”
ते कंपनीचं नाव सांगतात.

ते ऐकताच राजचे आजोबा क्षणभर स्तब्ध झाले…
आणि लगेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

“म्हणजे राज आणि पाखी एकाच कंपनीत आहेत!”
हा विचार मनात येताच त्यांना समाधान वाटलं.

“राजसोबत नीट बोलायला हवं,”
ते मनात ठरवतात. कदाचित सगळं आपोआप नीट होईल…

थोडावेळ अजून गप्पा करून,
पाखीच्या आजोबांचा निरोप घेत राजचे आजोबा तिथून निघाले,
मनात नवी आशा घेऊन…


राजचे आजोबा आनंदात घरी परतले.
त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. चालताना पावलं हलकी झाली होती, जणू मनावरचं एखादं ओझं उतरलं होतं.

घरात पाऊल टाकताच त्यांनी देवघरात दिवा लावला.
डोळे मिटून क्षणभर देवाला हात जोडले.

“सगळं नीट होऊ दे,” ते मनातच म्हणाले.

पाखीचं नाव आठवलं…
तिच्या आजोबांचं बोलणं, तिच्या जॉबची बातमी, आणि कंपनीचं नाव सगळं एकत्र जुळत होतं.

“राज आणि पाखी एकाच ठिकाणी आहेत…
देवाचीच योजना असावी,” ते स्वतःशीच पुटपुटले.

राजवर अजूनही थोडासा राग होता,
पण त्यापेक्षा जास्त काळजी होती. आता मात्र मनात आशेची पालवी फुटली होती.

“आजच राजशी बोलायला हवं,”
ते ठामपणे म्हणाले.

राज येईल तेव्हा काय बोलायचं,
कसं समजावून सांगायचं हे सगळं मनात ठरवतच
ते हसत हसत आपल्या खुर्चीत बसले.

घरात आज खूप दिवसांनी खरंच आनंदाचं वातावरण होतं…



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all