Login

अजब गजब लग्न भाग - 35

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 35



पाखी मन लावून काम करायची.
ऑफिसमध्ये तिचा दिवस कधी सुरू झाला, कधी संपला
तिलाच कळायचं नाही.
काम करताना ती नेहमी शांत, नीटनेटकी आणि जबाबदार असायची.

ती सगळ्यांशी प्रेमाने बोलायची. कोणी मदत मागितली तर नकार नाही, कोणी थकलं असेल तर हसून दोन शब्द बोलायची.

त्यामुळे ऑफिसमधले सगळेच तिला आपलीशी मानू लागले होते.
कोणी चहा आणून द्यायचं,
कोणी फाईल वेळेआधीच तिच्या टेबलवर ठेवायचं,
तर कोणी म्हणायचं,
“पाखी, काही लागलं तर सांग हं…”

ती कुणावर हुकूम चालवत नव्हती,
पण तिच्या स्वभावामुळे सगळेच तिच्यासाठी काही ना काही करत होते.

तिच्या साधेपणात, त्या हसऱ्या बोलण्यात
आणि प्रामाणिक मेहनतीत एक वेगळंच आकर्षण होतं.
पाखीला हे सगळं मिळत होतं  कोणत्याही अपेक्षेशिवाय
फक्त प्रेमामुळे…


पाखीचे दिवस आता एक ठराविक पण समाधान देणाऱ्या लयीने पुढे जात होते.
सकाळी वेळेवर ऑफिस, कामात पूर्ण लक्ष, आणि संध्याकाळी आजोबांकडे जाण्याची ओढ, हे तिचं जग होतं. थकवा असायचा, पण तक्रार नाही. कारण तिच्या कष्टांना आता ओळख मिळत होती.

ऑफिसमध्ये राज तिच्याकडे वरवर पाहून दुर्लक्ष करत असला, तरी आत कुठेतरी तो अस्वस्थ होत होता. पाखी हसत-खेळत काम करताना, गणेशसोबत चर्चा करताना, इतर स्टाफशी आपुलकीने बोलताना पाहिलं की त्याला नकळत राग येई.
“मी तिच्यापासून दूर राहायचं ठरवलंय… पण तीच समोर का येते?”
राज स्वतःलाच प्रश्न विचारायचा.

एका दिवशी महत्त्वाची मीटिंग होती. काही कागदपत्रं वेळेवर तयार नव्हती. सगळे गडबडीत होते.
तेव्हा पाखी पुढे आली.
“सर, मी कालच हे सगळे डेटा अपडेट करून ठेवले होते,”
असं म्हणत तिने फाईल राजसमोर ठेवली.

राज थोडा आश्चर्यचकित झाला.
तो फक्त एक क्षण तिच्याकडे पाहत राहिला.
“गुड वर्क,” एवढंच बोलला… पण त्या दोन शब्दांत पहिल्यांदा कौतुक होतं.

पाखीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं.
तिला माहिती होतं हा जॉब, ही जबाबदारी, हे सगळं तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

त्या संध्याकाळी घरी जाताना पाखी आजोबांना म्हणाली,
“आजोबा, मला वाटतं मी हळूहळू स्वतःच्या पायावर उभी राहतेय.”

आजोबा हसले.
“तू उभी राहतेयसच नाहीस पाखी… तू तर चालायला लागलीयस.”
दोघे पण हसले.

दूर कुठेतरी, त्याच क्षणी राजही विचारात होता.
काम, यश, जबाबदाऱ्या सगळं असूनही मनात एक रिकामी जागा होती.
आणि त्या जागेचं नाव, तो स्वतःलाही सांगू शकत नव्हता.

पण नियती हळूहळू दोघांना समोरासमोर आणायची तयारी करत होती…
खूप प्रश्न, खूप गोंधळ आणि एका न सांगितलेल्या नात्यासह.




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all