Login

अजब गजब लग्न भाग - 40

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 40


राज आवरून आजोबांजवळ आला. मनात खूप काही बोलायचं होतं, पण शब्द अजून जुळत नव्हते. तो काही बोलणार इतक्यातच आजोबा बोलायला लागले.

“राज, आज मी ऑफिसला येणार आहे,” आजोबा शांतपणे म्हणाले.

राज थोडा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला.
“हो, आपण दोघं सोबतच जाऊ,” राज म्हणाला.

“आधी नाश्ता करून घेऊया,” आजोबा म्हणाले.
त्यांनी लगेच नाश्ता लावायला सांगितला.

थोड्याच वेळात टेबलावर नाश्ता आला. दोघंही शांतपणे बसून नाश्ता करत होते. राज अधूनमधून आजोबांकडे पाहत होता. आजोबा काहीतरी गंभीर विचारात असल्यासारखे वाटत होते.

घरात शांतता होती, पण त्या शांततेत येणाऱ्या वेळेत काहीतरी मोठं घडणार आहे, याची चाहूल राजच्या मनाला लागून राहिली होती.

पाखी सकाळी उठली. रोजच्यासारखं सगळं आवरून घेतलं. मनात थोडी घाई होती, तरीही ती आधी आजोबांना भेटायला गेली.

“आजोबा,” म्हणत ती त्यांच्या जवळ बसली.
आजोबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. दोघांमध्ये थोड्या गप्पा झाल्या. ऑफिस, काम, तब्येत… सगळ्यावर हलकंफुलकं बोलणं झालं.

“काम नीट कर, आणि स्वतःची काळजी घे,” आजोबांनी सांगितलं.

पाखीने हसत मान डोलावली. आजोबांचा आशीर्वाद घेतला आणि मग ऑफिससाठी निघून गेली.
नव्या दिवसाची, नव्या घडामोडींची सुरुवात झाली होती.


पाखी ऑफिसला पोहोचली.
नेहमीप्रमाणे तिने सगळ्यांना हसून गुडमॉर्निंग केलं. तिच्या चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास होता. बॅग ठेवून ती आपल्या डेस्ककडे गेली आणि कामाला लागली.

थोड्याच वेळात तिचं लक्ष केबिनकडे गेलं. राज अजून आलेला नव्हता. कालच्या पार्टीचे क्षण नकळत आठवले. तिने स्वतःलाच सावरलं आणि फाइल्स तपासायला सुरुवात केली.

तेवढ्यात गणेश आला.
“गुडमॉर्निंग पाखी,” तो म्हणाला.
“गुडमॉर्निंग,” पाखी हसत म्हणाली.

ऑफिसमध्ये पुन्हा एकदा कामाचा गडबडीतला दिवस सुरू झाला होता, पण आज काहीतरी वेगळं घडणार आहे, असं नकळत पाखीला वाटत होतं.

राज आज नेहमीपेक्षा थोडा लवकर ऑफिसमध्ये आला.
सगळे त्याला गुडमॉर्निंग म्हणत होते, तो मान हलवून सरळ केबिनमध्ये गेला. मनात मात्र काहीतरी वेगळाच विचार चालू होता.

दुसऱ्या बाजूने आजोबा ऑफिसमध्ये आले. कोणी फारसं लक्ष दिलं नाही, कारण ते शांतपणे, कुणालाही न सांगता आले होते. आज त्यांना फक्त एकच गोष्ट पाहायची होती  ती म्हणजे पाखी.

आजोबा दूर उभे राहून सगळं निरीक्षण करत होते.
पाखी आपल्या डेस्कवर बसून काम करत होती. कोणी काही विचारायला आलं, की ती हसून, शांतपणे उत्तर देत होती. कुणाशीही मोठेपणा नाही, कुणाशीही लहानपणा नाही  सगळ्यांशी समान वागणूक.

एक सहकारी फाइलसाठी आला.
“पाखी, हे आजच हवं आहे,” तो म्हणाला.
“हो, लगेच देते,” पाखी म्हणाली आणि काम नीट करून फाइल त्याच्या हातात दिली.

कुणी चहा विचारला, तर नम्र नकार. कुणी मदत मागितली, तर लगेच होकार.
तिच्या बोलण्यात गोडवा होता, पण कामात स्पष्टपणा.

आजोबांच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधानाचं हसू आलं.
हीच ती… ते मनात म्हणाले.
स्वतःच्या पायावर उभी असलेली, सगळ्यांशी नीट वागणारी, आणि कुठेही दिखाऊपणा नाही.

थोड्याच वेळात राज केबिनमधून बाहेर आला. त्याची नजर नकळत पाखीकडे गेली.
पाखी फाइलमध्ये गुंतलेली होती… आणि आजोबा हे सगळं शांतपणे पाहत होते.

आजोबांना खात्री झाली होती
राजसाठी योग्य व्यक्ती कोण आहे, याचं उत्तर त्यांच्या डोळ्यांसमोर उभं होतं.


क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all