आजी : कुटुंबाचं आगळ
भाग ३
मागील भागात मीरा आणि शरयू अंगणात बसून गप्पा मारत होते. मीरा शरयूला म्हणाली, " आई, जशी आपण या रोपाची काळजी घेतली तशीच आम्ही सगळे तुझी काळजी घेऊ आणि या आजारातून बाहेर काढू. "
दारात उभं राहून ऐकणाऱ्या आजीला खूप बरं वाटले. खरचं लहान लहान म्हणता म्हणता मीरा कधी मोठी झाली काळलच नाही.
आजीने दोघींना जेवणासाठी आवाज दिला तेंव्हा दोघी भानावर आल्या. "अरे आजी कधी आली कळलच नाही. चल जेवायला जाऊ. "
जेवण झाल्यावर शरयू औषध घेऊन झोपली. मीरा क्लासला निघून गेली.
दुपारी चहा घेताना आजी आणि शरयू दोघीच घरी होत्या . तेंव्हा आजी ने बोलायला सुरवात केली , " हे बघ शरयू , आताच्या काळात हा आजार एवढा मोठा नाही . त्यावर औषध निघालीयत त्यामुळे तू बरी होशील पण हि औषध कधी लागू पडतील जेंव्हा तू मनाने ठरवशील की आपल्याला यातून लवकर बरं व्हायचे आहे. "
" पण आई , मी यातून बरी नाही झाली तर ...... " असं म्हणून ती रडू लागली . आजीने तिला मन मोकळं होईपर्यंत रडू दिले मग म्हणाली , " हे बघ , आधी तू नकारात्मक विचार करू नको. रोहन , मीरा यांच्याकडे बघ . त्यांना तुझी अजून गरज आहे . त्यांच्यासाठी तू सकारात्मक विचार कर . "
" आई तेच विचार येत राहतात . मग कसे ?? "
" त्यासाठी मी आज तुझ्यासाठी ग्रंथालयातून काही पुस्तक आणली आहेत . आपण दोघी दुपारी वाचत जाऊ . मी अमोद ला सांगितलंय रोज ऑफिस मधून आल्यावर तुला फिरायला म्हणजे गप्पा मारत चालायला घेऊन जा . त्यात तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल, मीरा, रोहन बद्दल खूप गप्पा मारा . निसर्गाचा आनंद घेत फिरा. सकाळी एक दिवस मीरा एक दिवस रोहन बरोबर एक चक्कर मारून याची. मग तू आणि मी ध्यान करायचे . असं मी आता ठरवलय तूपण तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या घटनांचा विचार कर पण तो फक्त सकारात्मक विचार."
" हे मला जमेल ?"
आजी ने तिला मांडीवर झोपून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली , " बाळा , हि तुझी आई बरोबर आहेच की . आणि मला हे सगळं जमणार आहे असाच विचार कर मनामध्ये . रात्री झोपताना पण असच विचार कर म्हणजे उद्यापासून हे सगळं चालू करता येईल .
हे आपल्याला मुलांसाठी करायचे आहे. त्यांच्यासाठी च मला जगायचय असा विचार करून सुरवात कर . सगळं एका दिवशी नाही जमणार हळूहळू जमेल. सहा महिने लागले तरी चालतील. तर आपण उद्यापासून सुरूवात करू. तू उद्या मीरा बरोबर फिरून ये , आपण दुपारी पुस्तक वाचू . चालेल . "
" हो नक्की प्रयत्न करेन . आई आता काय करू मनांत विचार येऊ नये म्हणून ?" तेव्हढ्यात दाराची बेल वाजली म्हणून आजी दार उघडायला गेली .
रोहन आत येत म्हणाला , " काय करताय सासू - सुना ? आज काय चहाची पार्टी करताय कि काय ?"
शरयू लगेच म्हणाली , " तुला काय आम्ही काही करू सासू सुना . आला लगेच आम्हाला दृष्ट लावायला . " रोहन आई कडे बघतच राहिला .
आई आणि आजी एकदम म्हणाल्या , काय रे काय झाले ? असा का बघतोयस ? "
" अगं आजी , बघ ना आई नेहमी सारखी बोलायला लागली. महिना होत आला असेल आई अशी माझ्याशी मजा मस्तीत करत बोललीच नव्हती. " असं म्हणत त्याने आईला मिठी मारली.
" आई, अशी च आनंदी रहा. घरात आल्यावर तुझा हसरा चेहरा बघितला ना की खूप छान वाटतं. एक सांगू ? "
" बोल ना "
" हे बघ तू ना तुला खूप काही झालाय अस वाटून घेऊच नकोस. अशीच हसत खेळत रहा. म्हणजे तू लवकर बरी होशील. " हे गंभीर चेहऱ्याने म्हणाला.
पुढे हसत म्हणाला, " लवकर बरी झालीस की तुझ्या हातची पावभाजी करून या पामराला खायला घालं म्हणजे देव तुझं भल करेल. "
आईने लगेच चापट ठेऊन दिली . हसत त्याला परत मिठी मारत आईंन कडे बघू लागली. आईंनी डोळ्यांनीच सांगितले की ," बघ हेच मी तूला समजवत होते. "
आई म्हणाल्या , " शरयू, जा जरा वेळ आराम कर. "
" आई, झोप नाही येत तर मी स्वयंपाक घरात बसून गप्पा मारते तुमच्या शी. "
रोहन मध्येच म्हणाला, " तुमच्या सासू सूनांच्या गप्पांमध्ये या पामराला थोडा चहा द्याल का ?" असं म्हटल्यावर सगळेच हसायला लागले.
घरातील वातावरण काही काळ तरी आनंदी होते. सगळीकडे सकारत्मकता दिसून येत होती.
आजी ने परत एकदा चहाचे आधण ठेवले. तिघांनी मिळून गप्पा मारत चहा घेतला. नंतर आजीने बळबळ शरयूला आराम करायला पाठवले.
शरयू आत आली खरं पण तिला काही केल्या झोप लागत नव्हती . झालेल्या गोष्टींचा विचार करत होती . आपण खरंच आई म्हणतायत तसा विचार करून जगलो तर होईलं का सगळं नीट . मी यातून बाहेर नक्की पडेल का ? खरंच माझ्या मुलांना जशी मी पाहिजे तशी होईन का अजून मला काही झाले तर ... ....... ... .......
तेवढ्यात अमोद आला त्याने पहिले कि शरयू कोणत्यातरी गहन विचारात आहे. तिचं आपल्याकडे लक्ष पण नाही . आपण आवरून येऊ मग तिच्याशी बोलू असं ठरवून अमोद न आवाज करता आवरायला गेला .
बघूया पुढच्या भागात शरयू काय ठरवतीय ते
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा