Login

एक रात्र मंतरलेली (भाग४)

रहस्यमय भयकथा

"कोण आहे तिकडे?" पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. थोडंसं दबक्या पावलाने तो पुढे जाऊ लागला. अचानक एक मुलगी समोर आली. तो फार घाबरला. त्याला दरदरून घाम फुटला. तो खोलीत जाण्यासाठी परत निघाला.

" मला एकटीला सोडून कुठे निघालास?"
राघव आश्चर्यचकित झाला.  तो इकडेतिकडे पाहू लागला.

"राघव, काय झाले? "

"तुला माझे नाव कसे माहित?"

"मला तुझ्या सगळ्या मित्रांची नांव माहिती आहे."

"काय...,?"

"बापरे ! कोण कुठली मुलगी? आपल्याला कशी ओळखते?"

"अरे, किती प्रश्न पडतात तुला. चल माझ्या मागे‌"
तिने हाताने त्याला खुणावत मागे  येण्याचा  इशारा केला. राघव सुध्दा भारावलेल्या नजरेने तिच्या मागे जाऊ लागला. हळुहळु चालत तो निघाला. हाॅटेलच्या पायऱ्या उतरून तो जंगलाच्या दिशेने निघाला. भान हरपून तो फक्त तिच्या मागे मागे जात होता. सर्वत्र काळोख पसरला होता. रात्रीच्या अंधारात रात किड्यांची  किरकिर जाणवत होती. कुठेतरी एखाद्या प्राण्याचे विव्हळणे, पायाखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा आवाज, अंगावर झोंबणारा गार वारा. अशा परिस्थितीत कितीतरी वेळ तो  तिच्या मागे चालत होता. कितीदा त्याला परत जावेसे वाटत होते. पण त्याच्या मनावर त्या मुलीने ताबा मिळवला होता. जंगलात बरेच आत गेल्यावर एका गुहेमध्ये ती शिरली. तो सुद्धा तिच्या मागे गुहेत शिरला. गुहेत शिरताच त्याच्या डोळ्यावर लख्ख प्रकाश पडला. त्या प्रकाशाने त्याचे डोळे दिपले. त्याने डोळ्यावर हात ठेवला. तेवढ्यात ती मुलगी कुठे गेली कळलेच नाही.

"बस....खाली बस." अचानक एक पुरूषी आवाज त्याला ऐकायला आला.

"बस म्हटले ना."
त्यामुळे अचानक तो खाली बसला. कोणी बसायला सांगितले? का सांगितले? कोण मनुष्य आहे? त्याला काहीच समजले‌ नाही. एखाद्या कठपुतली प्रमाणे तो वागत होता.

पण त्याला तिथे मळमळल्या सारखे वाटत होते. तिथे कसला तरी उग्र दर्प दरवळत होता. त्याला  काही ठिकाणी रक्ताचा सडा पडलेला दिसला.  तर काही ठिकाणी हाड आणि मांसाचे ढीग पडले होते. हे सगळं पाहून त्याला उलटी आली आणि अचानक तो बेशुद्ध पडला. किती वेळ कुणास ठाऊक?

काही वेळानंतर त्याला जाग आली तर त्याच्या गळ्यात छोट्या छोट्या कवट्यांची माळ आणि जंगली फुलांच्या माळा घालून त्याला सजवले होते. त्याचे हात आणि पाय साखळदंडाने बांधले होते. कसले मंत्र त्याच्या कानावर पडत होते.

"ओम फट् स्वाहा, स्वाहा एवढंच काय ते समजल.

"त्याच्या समोर एक यज्ञकुंड धगधगत होते. तुपाची धार सतत ओतत होते. कापराचा वास दरवळू लागला होता. उदबत्त्या लावल्या होत्या.

'आता माझा बळी जाणार का? काय चाललंय सगळं ? मला कोणीतरी सोडवा.' पण त्याचा आवाज निघतच नव्हता. साखळदंडाने बांधल्यामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते. अचानक त्याच्या समोर चार पाच भोंदूगिरी करणारे बाबा समोर आले.

'आता हे कोण?  छातीपर्यंत वाढलेली दाढी, लांब केस, त्यांचे विचित्र कपडे बघून त्याला वेगळेच वाटू लागले. मुख्य म्हणजे त्यांच्या हातात काही हत्यारे होती. हे पाहून राघव प्रचंड घाबरला. काय चाललंय सगळं ? राघवच डोक सुन्न झाले होते.

ते लोक फेर धरून नाचू लागले. प्रत्येक मंत्रानंतर समोर ठेवलेल्या पत्रावळीवरचे कुंकू आणि भस्माचे टिळे त्याला लावले जात होते. जोरजोरात मंत्रांचे जयघोष केले जात होते. अशातच राघवच्या घशाला कोरड पडली होती. मन बोलत होते पण शब्द फुटत नव्हते. काय करू आणि काय नको. अशी त्याची  अवस्था झाली होती. आपल्या सोबत पुढे काय घडणार? '

आज जिवंत पणी तो त्याच्याच मरणाचा सोहळा बघत होता.