Login

एका हाताने टाळी वाजत नाही (भाग_१)

जलद कथा
१...

"हे काय? आई बाबा. तुम्ही कधी आलात! एखाद्या फोन केला असता तर मी लवकर आले असते."

सविता ताई आणि अनिलराव खाली मान घालून बसले होते.

"बर बसा तुम्ही. मी फ्रेश होऊन येते."

तेवढ्यात अजिंक्य खोलीतून बाहेर येतो. सोबतच तिचे सासु सासरे सुध्दा बाहेर येतात. सगळ्यांचा तिच्याकडे बघण्याचा रोख बदलेला असतो.

"अरे! तुम्ही सगळे एकत्र ! काय झालं? कोणीच का बोलत नाही. अहो , आज तुम्ही लवकर आलात? "

"हो, तुझ्या आईबाबांना बोलावले होते? "

"का?"

"दिवसेंदिवस दिवस तुझं बेताल वागणे आम्हाला सहन होत नाही आणि म्हणूनच हे सांगायला तुझ्या आईबाबांना इथे बोलावून घेतले." कांचनताई

"पण सासुबाई, मी काय केले? की तुम्ही लगेच माझ्या आई बाबांना बोलावून घेतले?"

"मेघना, तोंड वर करून काय बोलते?" अजिंक्य

"साॅरी, अजिंक्य. पण नेमकं काय केलं मी? कळेल का मला."

"ते तू आई सोबत काल खूप भांडली."

"मी भांडली. पण सुरूवात कोणी केली ते नाही विचारणार?"

'मी फक्त म्हटले की आज घर जरा अस्तव्यस्त आहे. कोणी आले तर काय म्हणेल? कपडे, भांडी, रद्दी पेपर... " कांचनताई

"बस एवढंच म्हणाल्या तुम्ही."

"मग आणखी काय म्हणाली? "

"मेघना, कधीपासून बघतोय आम्ही? तू अशी नव्हतीस. आता वाद घालायला केव्हापासून शिकली ग ?" सविता ताई

"तुझ्यामुळे आमची मान शरमेने खाली गेली." अनिलराव

"बाबा, तुमची मान खाली जाईल असे मी कधी वागेल का?" मेघनाच्या डोळ्यात अश्रू होते.

"मग असं तुझ्या सासरी बोलावून आमचा आदर सत्कार करत आहे का?"

"हल्ली असंच उलट बोलायला लागली आहे. ते काही नाही. त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे." इतका वेळ शांत असलेले अजिंक्यने वडील कमलाकर राव बोलले.

"बाबा, निर्णय आणि कसला?"

"हे बघ अजिंक्य, काल जे घडलं. ते परत या घरात घडता कामा नये. मेघनाने कधी आवाज चढवलेला आम्ही खपवून घेणार नाही. तिने आईला उलट उत्तर द्यायचे नाही. तिने या घराची शिस्त पाळायलाच हवी. अन्यथा या घराचे दरवाजे तिच्यासाठी उघडे आहे. ती उद्या सकाळीच तिच्या आईबाबांसोबत जाऊ शकते. तेही कायमची. " कमलाकर राव

"पण बाबा माझी सुध्दा बाजू तुम्ही ऐकून घ्या. कारण टाळी एका हाताने वाजत नाही. कारण हे माझे सुध्दा घर आहे. तुम्ही माझी माणसं आहात. माझे तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम आहे." अश्रूंनी तिच्या मनात काहुर दाटला होता. स्वतः च्या डोळ्यांसमोर संसाराची विस्कटलेली घडी दिसू लागली. तिचे मन अस्थिर झाले होते.

"पण तू आईशी वाद का घालते? तिचा मान का ठेवत नाही. त्यामुळे बाबांच्या निर्णयाशी मी सहमत आहे." अजिंक्य

"अहो, तुम्ही खरं काय आहे ते जाणून न घेता माझ्यावर आरोप करत आहात. माझे म्हणणे तुम्ही ऐकल्याशिवाय मी हे घर सोडून जाणार नाही."

कमलाकरराव, कांचनताई मी काय म्हणतो. एकदा मेघनाला सुध्दा तिची बाजू मांडू द्यावी." अनिलराव

"हो तुम्ही तुमच्या मुलीचीच बाजू घ्याल." कांचनताई

"अहो, तसं नाही. आमची मुलगी चुकत असेल तर तुम्ही सांगाल ते आम्ही करू. पण एकदा तिचे म्हणणे ऐकून घेतले तर बरं होईल. "

"ठीक आहे बाई. सांग एकदाचं तुझं म्हणणं."

©® अश्विनी मिश्रीकोटकर

0

🎭 Series Post

View all