Login

एका हाताने टाळी वाजत नाही (भाग-२)

जलद कथा
२...

काय सांगायचे असेल मेघनाला...

पाहूया पुढे...

"आई, बाबा मी माझ्या सासू सासऱ्यांचा नेहमीच आदर करत आली. अजूनही करते. पण प्रत्येक वेळी त्यांनी माझ्या माहेरच्या लोकांचा उद्धार केलेला मी सहन करणार नाही. हो माझ्या ट्यूशन मुळे कधी कधी कामासाठी थोडा उशीर होतो. पण मी ते काम पुर्ण करते. पण म्हणून माहेरच्या लोकांचा अपमान का करायचा? माहेरच्या लोकांची शिकवण आणि संस्कार काढायचे?"

"आई, तू असं काय बोललीस हिला. की ही तुला उलटून बोलली आणि तुमचे भांडण झाले."

"अरे काही नाही बोलली."

"नाही कसं. " मेघना

"हे असं बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मी सतत दुर्लक्ष करत होते. पण आता पाणी डोक्यावरून चालले. त्या दिवशी आपल्याला मावशीकडे जायचे होते. तेव्हा मी तयारी करत होती. तुम्ही पुढे निघून गेले. अचानक आईबाबांनी तब्येतीचे निमित्त काढून सोबत येण्यास नकार दिला. ऐनवेळी मला त्यांनी सगळा स्वयंपाक करायला लावला. मी कढी खिचडी करायचे ठरवले. तर तेही नको म्हणाल्या. दोन भाज्या कर. एक सुकी आणि एक रस्सा भाजी, पोळी, वरण भात, कोशिंबीर इतकं सगळं ऐनवेळी करायला सांगितले. त्यासाठी मला काही वेळ लागणार की नाही. बर तेही ठीक. अर्धा स्वयंपाक तयार करत असतांनाच मी स्वतः ची तयारी सुध्दा करत होते. पण माझ्या तयार होण्याच्या वेळेसच त्यांनी बडबड सुरु केली. तुझे हात लवकर चालत नाही. किती हळुबाई आहे. आत्तापर्यंत आम्ही दहा जणांचा स्वयंपाक केला असता. सजणं_ मुरडत महत्वाचे की सासू सासऱ्यांची काळजी. माहेरी हेच शिकवलं का तुला. त्यात... तुमचे फोनवर फोन येऊ लागले. निघाले का? म्हणून."

"पण तू हे सगळं आधी का नाही सांगितले?" अजिंक्य

"तुम्ही माझ कधी ऐकून घेतले का? माझ्यावर थोडा तरी विश्वास दाखवला का? त्यात एवढी बडबड ऐकून माझ डोकं दुखायला लागलं. माझा तयार होण्याचा मुडच निघून गेला. कसाबसा झटपट स्वयंपाक आटोपला आणि मी रिक्षा बुक केली. तर त्यावेळी सुध्दा ही दोघे आधीच्या आधी रिक्षात येऊन बसले. मी म्हटले, आई बाबा तुम्ही तर येणार नव्हता ना! मला घरी स्वयंपाक करायला लावला आणि अचानक कसं काय येत आहात? तर म्हणतात कशा? अगं सुमेला वाईट वाटेल आम्ही‌ नाही आलो तर."

"मी अजून काही विचारायच्या आतच त्यांनी तोंड वाकडे केले. मी काही उगाचच भांडत नाही आणि सासु सासऱ्यां सोबत मी स्वतः भांडेल. एवढी माझी हिंमतही नाही. पण सतत माहेरच्या लोकांचा उद्धार करून यांना काय समाधान मिळते कुणास ठाऊक!"

"पण एकदा तरी मला विश्वासाने मनातल सांगायचं ना. "

"जाऊ द्या. एक गोष्ट असेल तर. अशा अनेक गोष्टी आपल्या घरात रोज घडत असतात. मी काय काय ऐकून घेते. हे तुम्हाला माहीत नाही. तिच्या आवाजात कंप होता. डोळ्यात पाणी आले होते.

"तीन वर्षांपासून मी जे सहन केले ते आता होत नाही. तुम्ही तुमचा निर्णय कळवा. मी आत आहे‌. चला आई बाबा थोडावेळ तुम्ही आत बसा.