अकल्पनीय जगाचे रहस्य : भाग १

एका असामान्य जगाची गोष्ट!
"प्लीज सोडाऽऽ मला.. हे बघा डॉक्टर मी वेडा नाही आहे. मला काहीही झालेले नाहीये आहे. मला या वैयक्तिक सेशन्सची काहीच गरज नाहीये." कबीरचा संयम संपला होता. गेल्या अर्ध्या तासांपासून तो डॉक्टर अवस्थींना एकच गोष्ट वारंवार सांगायचा प्रयत्न करत होता परंतु डॉक्टर अवस्थी मात्र एकामागे एक प्रश्न विचारत होते नुसते ज्यामुळे कबीर खूपच वैतागला होता.

" मिस्टर कबीर शांत व्हा.. रिलॅक्स! " डॉक्टर अवस्थींनी कबीर समोर पाण्याचा ग्लास धरला तसा कबीरने तो ग्लास उचलून तोंडाला लावला आणि त्याने सगळे पाणी गटागटा पिऊन टाकले. रिकामा ग्लास पुन्हा टेबलवर ठेवताना कबीरने एक दीर्घ श्वास घेतला.

"थँक्स डॉक्टर! मी खरंच अगदी व्यवस्थित आहे. मला काहीही झाले नाहीये. गेल्या आठवड्यापासून मी माझ्या बायकोला, हेच समजवायचा खूप प्रयत्न करतोय पण तिला ते कळंतच नाहीये. मी फक्त तिच्यावर असलेल्या प्रेमापोटी इथे आलोय बाकी काही नाही.

डॉक्टर या सेशन्सची गरज माझ्यापेक्षा जास्त तिला आहे. अहो लग्न होऊन अजून आठवडा पण झाला नाही, अचानक तिला कायं झाले आहे कायं माहित? माझ नावं कबीर आहे तर ती मला आदित्य नावाने हाक मारते. मला पहिल्या दिवशी वाटले लग्नाची धावपळ म्हणून झाले असेल चुकून पण हे रोजच घडतयं. ती मात्र उलट मलाच जाब विचारतेय की मी का असं वागतोय म्हणून?

डॉक्टर अवस्थी तशी ती खूप छान मुलगी आहे पण का अशी वागतेय ते कळंत नाहीये. तुम्ही तिच्याशी बोला एकदा म्हणजे तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल. " कबीरने डॉक्टर अवस्थींसमोर त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

" ओके मिस्टर कबीर मी तुमच्या बायकोशी बोलून पाहतो. एक डॉक्टर म्हणून मी तुमची चौकशी करतोय रिलॅक्स व्हा!तुम्ही एक काम करा बाहेर वेटिंग रूम आहे तिथे बसा तोपर्यंत मी तुमच्या बायकोशी बोलतो."

"थँक्स डॉक्टर माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल!" कबीर एवढे बोलून बाहेर गेला तसे डॉक्टर अवस्थींनी डोळ्यांवरचा चष्मा बाजूला काढून क्षणभर डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला इतक्यात त्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये कोणाची तरी चाहूल लागली.

********

" ये नेहा बस "

" डॉक्टर अंकल कायं झालं? ", नेहाच्या बोलण्यातून काळजी स्पष्टपणे जाणवत होती.

" नेहा हे बघ तू माझ्या जिवलग मित्राची मुलगी असलीस तरीही मला माझ्या मुलीसारखीच आहेस. मी शहरात नव्हतो म्हणून तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही पण तुला भेटायचे ठरवले होते आणि आज आपली अशी भेट होतेय मलाच थोड वाईट वाटतयं.

पण तु मला मुलीसारखी आहेस म्हणूनच तुझ्यासमोर मला कुठल्याही प्रकारचा पडदा नाही ठेवायचा. मला ही केस थोडी वेगळी वाटतेयं.

कबीरचे म्हणणे आहे की प्रॉब्लेम त्याला नाही तुला आहे. तु एक आठवड्यापासून विचित्र वागतेयं असं म्हणणं आहे त्याचं आणि म्हणूनच त्याने मला आत्ता तुझ्याशी बोलण्याचा सल्ला दिला अर्थात आपली जुनी ओळख आहे हे मी अजूनपर्यंत त्याला कळू दिले नाहीये "

" डॉक्टर अंकल अहो मी नाही तो विचित्र वागतोय. लग्न होण्यापूर्वी तो ठीक होता पण लग्न झाल्यापासून सारखा स्वतःला कबीर आणि मला नेहा ऐवजी शर्वरी अशी हाक मारत असतो. मला तर काही कळेनासे झाले आहे त्याचे वागणे अगदी अकल्पनीय आहे. डॉक्टर अंकल अजून एक आठवडा तर झाला आहे लग्न होऊन.

मला पप्पांना ही सांगता येत नाहीये कारण ते बिझनेस टूरसाठी गेले आहेत म्हणून मी तुमच्याकडे आले अंकल. "

" रिलॅक्स बेटा! हे बघं मला तुला काही विचारायचे आहे. "

" डॉक्टर अंकल तुम्हाला जे विचारायचे आहे ते विचारा " नेहा अगदी निर्विकारपणे बोलली.

" मला एक सांग बेटा तू कबीरला कधीपासून ओळखतेस? यापूर्वी तो असा वागला होता कायं?", डॉक्टर अवस्थींना विचारले.

" डॉक्टर अंकल तुम्हाला माहितच आहे की पप्पांचे किती सोशल वर्किंग चालू असते तर मी एकदा पप्पांसोबत एका अनाथाश्रमात गेले होते तिथेच माझी पहिल्यांदा आदित्य सोबत ओळख झाली होती. एरवी माझ्यासारखी सुंदर मुलगी दिसली की मुलं लगेचच बोलायला, ओळख वाढवायला प्रयत्न करतात मला मात्र याने इग्नोर करणं आवडलं नाही आणि त्याच्याविषयी रहस्य निर्माण होऊ लागले म्हणून पप्पांसोबत मी पुन्हा पुन्हा तिथे जाऊन त्याच्याशी ओळख वाढवायला लागले पण तो फार बोलायचा नाहीच काही.

त्याच्या आदराने बोलण्याने आणि समंजसपणाने मी कधी प्रेमात पडले ते कळलेच नाही मला. आदित्य लहानपणापासून त्या अनाथाश्रमात वाढला, खूप लहान असताना त्याला कोणीतरी आणून ठेवले होते. त्याने तिथेच शिक्षण घेतले आणि त्या अनाथाश्रमाच्या नियमानुसार अठरा वर्षानंतर बाहेर पडून स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर नोकरी मिळवली पण तो जिथे वाढला त्या जागेशी असलेली नाळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणूनच नोकर सांभाळून तो स्वतः त्या अनाथाश्रमाच्या कामांत लक्ष देतो.

खूप चांगला आहे आदित्य डॉक्टर अंकल त्याला मी दोन वर्षापासून ओळखते. यापूर्वी तो असा कधीच वागला नाही. किती खूश होता तो लग्नाच्या दिवशी मग त्यानंतरच कायं झालं ते कळत नाही आहे मला " बोलता बोलता नेहाला हुंदका अनावर झाला तसे डॉक्टर अंकलने तिचे सांत्वन केले.

" नेहा तु काळजी करू नको मी आहे ना, मी लक्ष देईन. नक्की कायं प्रकार आहे हे पहायला हवे एकदा. तुम्ही दोघे आता घरी जा फक्त जाण्यापूर्वी आदित्यला माझ्याकडे पाठवून दे मला काही बोलायचं आहे त्याच्याशी." डॉक्टर अवस्थींचा निरोप घेऊन नेहा तिथून बाहेर पडली.

डॉक्टर अवस्थी टेबलवर हातांची बोटे वाजवत आदित्यच्या येण्याची वाट पाहू लागले.

क्रमशः

कबीर की आदित्य? नक्की कायं प्रकार आहे हा? नेहा खरं बोलतेय की कबीर? बापरे किती गोंधळ आहे. नक्की कायं कारण आहे कबीर च्या वागण्यामागे हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all