अकल्पनीय जगाचे रहस्य : भाग २

एका असामान्य जगाची गोष्ट!
"ये कबीर आतमध्ये ये"

"डॉक्टर कायं झालं? तुम्ही बोलला का नेहाशी?" कबीरने खुर्चीवर बसत अधीरतेने डॉक्टर अवस्थींना विचारले.

"हो कबीर बोललो मी. हे बघ असं कर उद्या तुम्ही दोघे दुपारी या माझ्याकडे मग तेव्हाच मी तुला सविस्तर सांगेन"

"ठीक आहे डॉक्टर येऊ मी" कबीरने डॉक्टरांचा निरोप घेत विचारले.

" हो ठीक आहे " कबीर बाहेर गेला पण डॉक्टर अवस्थी मात्र तो नजरेआड होईपर्यंत त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे एकटक पाहत राहिले.

'नेहाला मी अगदी लहानपणापासून ओळखतो त्यामुळे ती खोटं बोलेल किंवा तिला काही आजार असेल याची शक्यता नाहीच शिवाय तिने या कबीर म्हणजेच आदित्य विषयी जे काही सांगितले ते ऐकून नक्की कळत नाही आहे की नेमकं कायं प्रकरण आहे हे?' डॉक्टर अवस्थी बराचवेळ विचार करत राहिले.

काहीवेळ ते तसेच शांतपणे डोळे मिटून बसून राहिले. थोड्यावेळाने त्यांनी स्वतःसाठी एक कॉफी मागवली ती पिऊन त्यांना थोडे बरे वाटायला लागले तेव्हा त्यांनी नेहाला फोन केला.

"हॅलो नेहा"

"डॉक्टर अंकल बोला ना" आणि पुढे डॉक्टर अवस्थींनी नेहाला नेमके असे कायं विचारले ठाऊक नाही पण क्षणांतच तिच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले होते.

"कायं झालं कोणाचा फोन होता शर्वरी?" नेहाने फोन खाली ठेवला तेवढ्यात कबीर तिच्यासमोर येऊन उभा राहिला.

"अरे ती माझी मैत्रीण नाही का स्मिता तिचा फोन होता."

"सगळे ठीक आहे ना? नाही म्हणजे तुझा चेहरा काहीतरी वेगळेच सांगतोय म्हणून विचारले." कबीरने नेहाचा हात हातात घेऊन विचारले.

" हो सगळे ठीक आहे. खूप झोप येत आहे बाकी काही नाही." स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडवून घेत नेहा बेडरूममध्ये निघून गेली.

दुसर्‍या दिवशी दुपारी दोघेही अगदी नियमित वेळेत डॉक्टर अवस्थींच्या हॉस्पिटलमध्ये पोहचले. डॉक्टर अवस्थींनी नेहाला अगोदर बोलावून घेतले त्यांच्या कॅबिनमध्ये एकटेच.

" डॉक्टर अंकलऽऽ " डॉक्टर अवस्थींना आवाज देत नेहा त्यांच्या कॅबिनमध्ये शिरली तेव्हा त्यांनी तिला बसायला सांगितले.

"हे बघं नेहा मी खूप विचार केला. काल म्हटले तसे ही केस थोडी वेगळी आहे. काही गोष्टी आपण विचार करतो त्याच्या पलिकडे असतात. सत्य जाणून घेण्यासाठी बरेचदा सेशन्स करताना काहीवेळा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी, त्या व्यक्तीला बोलते करण्यासाठी त्याच्या आयुष्यातील काही घटनांचा आढावा त्याच्याकडून घ्यावा लागतो आणि त्यासाठी संमोहन ही एक प्रकिया आहे ज्यामुळे त्या व्यक्तीला काही काळ मागे किंवा एखाद्या ठराविक घटनेपाशी पुन्हा न्यावे लागते.

आज आदित्यकडून नेमके त्याच्या वागण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी मला त्याच्यावर संमोहन ही प्रक्रिया करावी लागणार आहे. या प्रकियेदरम्यान त्याच्याकडून नेमके कायं सत्य बाहेर येईल किंवा कदाचित सत्य बाहेर येणारही नाही कारण यापेक्षा भयाण असे काहीतरी असू शकते.

हे बघं मला तुला घाबरायचे नाही आहे पण परिस्थितीपासून अनभिज्ञ ठेवून तुला अंधारात देखील ठेवायचे नाही आहे. मनाची तयारी कर आणि खंबीर रहा " नेहाच्या पाठीवर थोपटून डॉक्टर अवस्थींनी तिला एकंदर परिस्थिती समजावून सांगितली.

" डॉक्टर अंकल तुम्ही काल फोनवर का ते सगळे विचारत होता हे कळतंय मला आता. माझ्या आदित्यला कायं झालं आहे हे कळणार असेल तर काहीही करायची आणि काहीही ऐकायची माझ्या मनाने तयार केली आहे तुम्ही करा जे तुम्हाला योग्य वाटेल ते." एवढे बोलून नेहाने एक दीर्घ श्वास घेतला ते डॉक्टर अवस्थींना तिचे कौतुक वाटले.

त्यांनी नेहाला सेशन्स रूमच्या आतमध्ये असलेल्या लहान रूममध्ये जाऊन थांबायला सांगितले आणि आता त्यांनी फोन करून रिसेप्शनिस्टला "कबीरला आत पाठवून दे" अशी सुचना दिली.

"हे कायं शर्वरी कुठे गेली?" कबीरने आत येताच विचारले.

"कबीर ती आहे इथेच मला आता तुझ्याशी थोडे बोलायचे आहे जर शर्वरी बरी व्हायला हवी असे तुला मनापासून वाटतं असेल तर तुला आता माझे ऐकावे लागेल थोडे."

"डॉक्टर मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे. बोलाऽऽ"

"कबीर आपण आतमध्ये जाऊया" असे म्हणतं डॉक्टर अवस्थींनी त्याला सेशन्स रूममध्ये नेले.

"डॉक्टर आपण इथे का आलोय पुन्हा? आज कुठले सेशन नाही ना?"

"कबीर आज कुठलेही सेशन नाही पण मला जेव्हाही काही विचारायचे किंवा जाणून घ्यायचे असते मी इथेच येतो कारण ही खास रूम मी त्यासाठी बनवली आहे. या रूममध्ये असलेली शांतता माझ्या कामात अडथळा येऊ देत नाही तसंही कॅबिन मध्ये फोन सतत वाजत राहतात. " डॉक्टर अवस्थींनी कबीरला असे काही पटवून दिले की त्याला ही खरेच वाटले.

"कबीर बस इथे. " कबीरला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगून डॉक्टर अवस्थी त्याच्यासमोर येऊन बसले तसा कबीर ते नक्की कायं करणार आहेत पुढे याची वाट पाहू लागला.

क्रमशः

डॉक्टर अवस्थींनी नेहाला फोनवर नक्की कायं बरं विचारले असेल? या संमोहन प्रक्रियेतून कुठले सत्य बाहेर येणार आहे हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all