अकल्पनीय जगाचे रहस्य : भाग ३ (अंतिम भाग)

एका असामान्य जगाची गोष्ट!
"हे बघं कबीर आता तुला शर्वरी बरी व्हावी असे वाटत असेल तर तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील."

"डॉक्टर मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे."

"गुड.. कबीर सर्वात अगोदर तू तुझे डोळे बंद कर आणि मी जे म्हणतोय ते ऐकं." डॉक्टर अवस्थींनी कबीरला डोळे करायला सांगितले.

" आता तुला फक्त आणि फक्त माझा आवाज ऐकू येतोय. तुला माझे ऐकायचे आहे " खुर्चीवरून उठत डॉक्टर अवस्थी कबीर जवळ गेले आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला.

पुढची पाच - दहा मिनिटं तशीच शांततेत गेली.

डॉक्टर अवस्थींनी आता त्याच्या डोक्यावरचा हात काढला. खुर्चीचे व्हील फिरवले, बटण दाबून खुर्ची मागे सरकवली आणि कबीरची मान उचलून त्याच्या डोक्याखाली उशी ठेवली. आता कबीर त्या आराम खुर्चीवर झोपलेल्या अवस्थेत होता.

"कबीरऽऽ" डॉक्टर अवस्थींनी तो पूर्णपणे त्यांच्या वशमध्ये आला आहे की नाही हे पाहिले. खात्री होताच त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.

"आता मला सांग तुझे नाव कायं आहे?"

"कबीर"

"नाही हे तुझे नाव नाही. आता आपल्याला थोडे मागे म्हणजे तू लहान होतास त्या काळात जायचे आहे."

"होऽऽ" कबीर त्यांच्या हो ला हो करत होता.

"मला सांग आता तुझे खरे नाव कायं आहे?"

"आदित्य" कबीरने अखेर सांगितले तसे डॉक्टर अवस्थींच्या चेहर्‍यावर एक गूढ हास्य पसरलं.

पुढे तीन तास डॉक्टर अवस्थी आदित्यला प्रश्न विचारत राहिले आणि आदित्य त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत राहिला. सेशन्स रूममध्ये असलेल्या एका छोट्याश्या रूममध्ये बसून नेहा मात्र काचेतून त्या दोघांना पाहत अस्वस्थ होत होती.

जवळपास साडेतीन तासानंतर डॉक्टर अवस्थी बाहेर आले तशी नेहा त्यांच्या पाठोपाठच त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांच्या समोरील खुर्चीवर बसली.

"नेहा मला तुझी अवस्था कळतेय. मी अगोदर म्हटले तसे ही केस थोडीशी वेगळी आहे फक्त आता मी जे काही सांगेल ते ऐकून घे आणि शांत रहा."

"हो" नेहाचा निर्धार बघून डॉक्टर अवस्थींनी बोलायला सुरुवात केली.

"नेहा मला एक सांग तुला मनाचे जग ही संकल्पना माहित आहे का?"

"नाही डॉक्टर अंकल " डॉक्टर अवस्थींनी नेहा चे उत्तर ऐकून एक दीर्घ श्वास घेतला आणि ते पुढे बोलायला लागले.

" हे बघं नेहा कसं असतं आपलं हे जग असतं आपण या जगात वावरतो पण काही व्यक्ती एखाद्या विशिष्ट घटनेमुळे स्वतःचे एक वेगळेच जग तयार करतात आणि त्या जगात ते कायम वावरत असतात जे जग मुळात अस्तित्वात नसतंच. हे जग म्हणजे एक अकल्पनीय गूढ आहे.

*अण्वांश जग* म्हणजे मनाचे जग हे एक असे जग आहे यापासून सामान्य व्यक्ती सहसा अनभिज्ञ असते.

काल मी तुला आदित्यच्या अनाथाश्रमाविषयी विचारले आणि त्यांचा नंबर देखील मागितला मला ठाऊक आहे तुला माझे कालचे वागणे चमत्कारिक वाटले असेल जरा पण काहीवेळा व्यक्तीच्या वागण्यामागे त्याच्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या घटनेचा अंश असतो. मला आदित्य विषयी असे काही कळाले आहे ज्या गोष्टी तुला माहित नसतील आणि खरंतर संबंध ही येत नाही.

नेहा आदित्य लहानपणापासून खूप शांत आणि अबोल. तो इतर मुलांशी फार बोलायचा नाही फक्त एक व्यक्ती होती ज्याच्याशी आदित्यचे सूर जुळले होते तो म्हणजे तिथे अनाथाश्रमात त्यांना शिकवायला येणारा त्यांचा शिक्षक कबीर.

हो कबीर तिथे आवड म्हणून शिकवायला जात होता आणि त्याने सर्व मुलांना आपलेसे केले होते पण आदित्यशी त्याचीही जरा वेगळीच नाळ जुळली होती जणू. आदित्य कबीर सोबतच तासंतास असायचा. कबीरचे लग्न झाले तेव्हा त्याची बायको शर्वरी देखील त्या मुलांना आवड म्हणून शिक्षण देण्यासाठी तिथे येऊ लागली आणि आदित्यचा कबीर बरोबर जुळला तसाच नकळतपणे शर्वरी सोबत ही मायेचा धागा जुळला गेला.

नेहा आदित्य लहानपणापासून अनाथाश्रमात वाढला त्यामुळे साहजिकच त्याला प्रेम, कुटुंब या गोष्टी माहित नव्हत्या पण त्याच्या कळत्या वयात कबीर आणि शर्वरी त्याच्या आयुष्यात आले आणि त्याला या गोष्टींची ओळख झाली. पण पुढे कबीरला शहरातून नोकरी सांगून आली आणि तो शहर सोडून गेला तेव्हा मात्र आदित्य पूर्ण एकटा पडला. कबीरच जाणं त्याला सहन झालं नाही.

पुढे तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि त्याच्या मनांत घर, लग्न म्हटल्यावर कबीर आणि शर्वरी समोर आले आणि त्याच्या मनाने एक वेगळे जग निर्माण केले कारण त्याला त्या दोघांसारखे कुटूंब हवे होते. तुमचे लग्न झाले आणि आदित्य त्याने निर्माण केलेल्या त्या जगात चालायला लागला. स्वतःला कबीर आणि तुला शर्वरी समजायला लागला.

आदित्यची यात चूक नाही कारण त्याच्याही नकळत तो एका समांतर विश्वात वावरतोय हे त्यालाही ठाऊक नाही. त्याने कबीरचा 'मुखवटा' स्वतःवर चढवला आहे हे त्यालाही ठाऊक नाही. काही अजून सेशन्स घ्यावे लागतील पण आदित्य बरा होईल. आता खरी कसोटी तुझी आहे कारण आता आदित्य बरा होईपर्यंत तुला तुझे हे जग सोडून त्याच्या विश्वात जावे लागणार आहे जिथे त्याने स्वतः चे एक वेगळे जग निर्माण केले आहे. तुला जमेल का कबीरची शर्वरी व्हायला? "

" हो डॉक्टर अंकल." शर्वरीचा ठाम निर्धार पाहून डॉक्टर अवस्थींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला प्रेमाने.

***********

( एक तासानंतर... )

" कबीर ये आतमध्ये. तुझी शर्वरी ठीक आहे काही दिवस अजून माझ्याकडे घेऊन ये मी बोलावले की. कधीकधी तणावामुळे होते असे बाकी ती ठीक आहे. " डॉक्टर अवस्थी कबीर संमोहातून बाहेर आल्यावर त्याच्याशी बोलत होते.

"हो डॉक्टर मी घेऊन येईन नक्कीच.. थँक्यू!" कबीर म्हणून तिथून तो बाहेर पडला पण डॉक्टर अवस्थींसाठी आता तो आदित्य होता त्यांचा एक पेशंट ज्याला त्याच्या या अण्वांश जगातून लवकरचं बाहेर काढायचे होते.

कबीर बाहेर गेला तेव्हा नेहा वाट पाहत होती कबीरची. आता त्याला बरे करण्यासाठी ती त्याच्याबरोबर त्याच्या बहुविश्वी अण्वांश जगांत शर्वरी म्हणून त्याच्या सोबतीने चालणार होती.